|| बापू बैलकर

गेले दहा महिने वाहन बाजारात मंदीसदृश परिस्थिती आहे. यासाठी अनेक कारणे सांगितली जात होती. यात सरकारच्या ‘भारत स्टेज ६ (बीएस-६) धोरणाचाही फटका बसला असल्याचे बोलले जात होते. खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही याला दुजोरा दिला होता. मात्र भारतील खरेदीदारांनी ‘बीएस-६’ वाहनांना गेल्या काही दिवसांत पसंती दिली आहे. ग्राहकांनी आपण पर्यावरणाविषयी सजग असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

सध्या प्रदूषण हा आपल्या देशासमोरील मोठा प्रश्न आहे. शहरांतील प्रदूषण वाढीसाठी इतर घटकांसह वाहनांमुळे होणारे प्रदूषण हेही मोठे आहे. यामुळे केंद्र सरकारने आपल्या वाहन धोरणात काही बदल केले आहेत. यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी पोषक वातावरण व ‘बीएस ४’ऐवजी ‘बीएस ६’ इंजिन मानांकन असलेली वाहनेच यापुढे निर्मिती व विक्रीवर बंधने आणली आहेत. केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने २०१७ रोजी अधिसूचना काढत १ एप्रिल २०२० नंतर ‘बीएस ६’ वाहनांचीच निर्मिती करता येऊ शकते असे आदेश पारित केले आहेत. यामुळे वाहन उद्योगात नकारात्मकता दिसून येत होती. त्यात आर्थिक मंदीमुळे वाहन उद्योगावर संकट निर्माण झाले होते. वाहन उद्योगातील आर्थिक मंदीसाठी ‘बीएस ६’ धोरणही कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. यामुळे वाहनांच्या किमतीत वाढ होऊन खरेदीदार याकडे पाठ फिरवतील असा सूर आळवला जात होता. मात्र गेल्या काही महिन्यात भारतीय बाजारात आलेल्या ‘बीएस ६’ वाहनांच्या विक्रीचा आकडा पाहता खरेदीदारांनी या वाहनांचे स्वागतच केले आहे. त्यामुळे वाहन उद्योजकांनीही याचे स्वागत केले आहे.

भारतातील वाहन उद्योगातील आघाडीची कार कंपनी मारुती सुझुकीने आतापर्यंत बीएस ६ मानांकन असलेल्या आठ कार बाजारात आणल्या आहेत. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता चांगला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. वाहन खरेदीदार हा तंत्रस्नेही असून तो पर्यावरणाबाबतही सजग आहे. त्यामुळे वाढलेल्या किमतीपेक्षा तो आधुनिक वाहनांना पसंती देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नुकत्याच भारतील वाहन बाजारात प्रवेश केलेल्या किआ सेल्टोल आणि एमजी मोटारने आपल्या एसयूव्ही कार बाजारात आणल्या आहेत. त्या बीएस ६ मानांकन प्राप्त असून त्यांना भारतातील ग्राहकांनी डोक्यावर घेतले आहे. किआ सेल्टोसने तर ऑक्टोबरमध्ये विक्री झालेल्या टॉप टेन वाहनांच्या यादीत प्रवेश केला आहे. रेनोल्टच्या बीएस ६ ट्रायबरची तर दोन महिन्यात दहा हजार कारची विक्री झाली आहे.

दुचाकी बनविणाऱ्या भारतातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिरो मोटारसायकल आणि स्कूटर्सतर्फे नुकतेच बीएस ६ मानांकन प्राप्त केलेली आपली ब्रॅन्ड दुचाकी अ‍ॅक्टीव्हा बाजारात आणली आहे. बीएस ६ मुळे तिची किंमत ८ ते ९ हजारांपर्यंत वाढत आहे. मात्र दुचाकी खरेदीदारांनी तिला चांगली पसंती दिल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. हिरो मोटार्सने अलीकडेच त्यांची स्प्लेंडर ही बीएस ६ आयस्मार्ट बाजारात आणली आहे.

 

काय आहे ‘बीएस ६’

बीएस म्हणजे भारत स्टेज. युरोपीय प्रदूषण मानांकनावर आधारित भारतातही वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे वाहन प्रदूषण मर्यादा असलेले ‘भारत स्टेज’ हे मानांकन २००० पासून भारतात लागू केले आहे. यात वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाच्या मर्यादा ठरविल्या जातात. या मर्यादेपेक्षा जास्त प्रदूषण करणारे वाहन विक्री व निर्मिती करण्यावर बंदी असते. सध्या भारतात ‘बीएस ४’ मानांकन लागू आहे. मात्र शहरांतीलल वाढते प्रदूषण पाहता ही गंभीर समस्या होत असून यात वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणाचाही मोठा वाटा आहे. यामुळे केंद्र सरकारने यापुढे ‘बीएस ५’ ऐवजी ‘बीएस ६’ हे मानांकन लागू केले आहे.१ एप्रिल२०२० पासून फक्त ‘बीएस ६’ मानांकन प्राप्त वाहनांची निर्मिती वाहन उद्योग करू शकतात. वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पेट्रोल व डिझेल इंधनामुळे चार प्रकारचे प्रदुषण होत असते. यात कार्बन मोनोऑक्साईड, हायड्रो कार्बन, नायट्रोजन मोनोऑक्साइड व सुक्ष्म धुलीकण याचा समावेश आहे. सध्या ‘बीएस ४’ मुळे होणाऱ्या या विविध प्रकारच्या प्रदूषणात ‘बीएस ६’मुळे ७० ते ८० टक्के प्रदूषण कमी होणार आहे.

 

बीएस ६ वाहनांना मिळालेला प्रतिसाद

गेले दहा महिने वाहन उद्योगात मंदीसदृशा परिस्थिती आहे. दसरा दिवाळी हा सण वाहन उद्योगासाठी महत्त्वाचा मानला जातो. खरेदीदार या आर्थिक मंदीत वाहन खरेदीकडे कसे पाहतात याकडे लक्ष लागले होते. मात्र ऑक्टोबरमध्ये झालेल्या वाहन विक्रीमुळे वाहन उद्योगाला दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये ‘बीएस ६’ मानांकन असलेल्या वाहनांना कसा प्रतिसाद मिळाला हे पाहू.