सुहास जोशी

नांदेड हे शिखांचे पवित्र तीर्थक्षेत्र. शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून हे ठिकाण ओळखले जाते. शीख धर्मीयांच्या अनेक धर्मशाळा, लंगर या ठिकाणी आहेत. किंबहुना गोदा तीरावरील गुरुद्वाराजवळील रस्त्यावर गेले असता आपण पंजाबमध्येच गेल्याचा भास होतो. अर्थातच येथे खाण्यापिण्याची देखील चंगळच आहे. शाकाहारी, मांसाहारी दोन्ही प्रकारच्या खाद्यपदार्थाची रेलचेल आहे.

पण एक पेय आपले लक्ष वेधून घेते, ते म्हणजे डाळिंबाचा रस. नदीतीरावरील या गुरुद्वारा रस्त्यावर किमान १० गाडय़ांवर डाळिंबाच्या सोललेल्या दाण्यांचे ढीगच्या ढीग लागलेले असतात.

मोसंबी ज्युसचे गाडे जसे मुंबईत दिसतात तसेच हे प्रकरण. गाडय़ावरचा एक माणूस सतत डाळिंब सोलत असतो आणि दुसरा रस काढण्याचे काम करत असतो. शिखांचे हे आवडते पेय असल्याचे येथील विक्रेते सांगतात. दसऱ्याला शीख भाविकांची गर्दी खूप असते, तेव्हा या गाडय़ांची संख्या प्रचंड वाढते.

याशिवाय नांदेडमधील छोटय़ा छोटय़ा हॉटेलांमध्ये कढी भजी आणि वडय़ाबरोबर अगदी सरार्स दिली जाते. तेही अगदी स्वस्तात. आणि हल्ली सगळीकडेच दाल खिचडीच्या नावाखाली जो फोडणी घातलेला वरण भात मिळतो त्याऐवजी येथे मात्र मूग डाळ व्यवस्थित दिसणारी कोरडी खिचडी उत्तम मिळते.