– गौरव टिकू

(लेखक ‘ट्रॅन्शन इंडिया’ या कंपनीचे ‘सीएमओ’ आहेत.)

तंत्रज्ञानाशी निगडित गोष्टींबाबत बोलायचे झाले तर कोणत्याही गॅजेटपेक्षा अधिक उलथापालथ ही स्मार्टफोनच्या क्षेत्रात होत असते. नुकत्याच सरलेल्या वर्षांत भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेने अतिशय कमी किमतीतील स्मार्टफोनचा अनुभव घेतला. त्यामुळे फीचर फोनला पर्याय म्हणूनही स्मार्टफोनकडे पाहिले जाऊ लागले आहे. आता नव्या वर्षांत स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात आणखी मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ते बदल कोणते?

भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ बनली आहे. भारतीय मोबाइल ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याउलट भारतापेक्षा आघाडीवर असलेल्या चीन आणि अमेरिका या देशांतील स्मार्टफोन बाजारपेठा आता घसरणीला लागल्या आहेत. या बाजारपेठांतील ग्राहकसंख्या २०१९ मध्ये कमी होण्याची किंवा तितकीच राहण्याची संख्या आहे. तसे झाल्यास २०१९ मध्ये भारत ही स्मार्टफोनची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनू शकेल, असा ‘काऊंटरपॉइंट रिसर्च’ या संस्थेचा अहवालही सांगतो.

अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या बाजारपेठेत नावीन्याला अधिक महत्त्व लाभणार आहे. गतवर्षी अधिक क्षमतेचे आणि अधिक मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यांकडे ग्राहकांचा कल होता. या वाढत्या मागणीकडे लक्ष पुरवून स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनीही कमी किमतीतील पण चांगले कॅमेरे असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले. गतवर्षी चर्चेत राहिलेला आणखी एक ट्रेंड म्हणजे ‘नॉच स्क्रीन’ अर्थात काठोकाठ व्यापणाऱ्या डिस्प्लेचा. अशा फोननीही गेल्या वर्षी भारतीय बाजारात वेगळे स्थान निर्माण केले. आता नवीन वर्षांला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षांत आपल्याला काय नवीन तंत्रज्ञान स्मार्टफोन आपलेसे करेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे. तंत्रज्ञानातील बदलांचा अंतर्भाव करून येणारे स्मार्टफोन उच्च किंमत श्रेणीत येतीलच. पण बहुसंख्य भारतीय ग्राहकांना परवडणाऱ्या, म्हणजेच सात ते १५ हजार रुपयांच्या किंमतश्रेणीतील स्मार्टफोनमध्ये काय नवीन ट्रेण्ड येतील, हे आपण पाहू या.

चांगल्या अल्गोरिदमसह सक्षम कॅमेरा –

२०१८ मध्ये एआय हे मोबाइल डिव्हाइसेसचे मुख्य वैशिष्टय़ होते आणि त्यामुळे स्मार्टफोन्स अधिक अंतज्र्ञानी बनले. ऑटो-सीन डिटेक्शन, ब्युटी मोड आणि चेहरा अनलॉक यांसारख्या वैशिष्टय़ांमुळे उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव अधिक वैयक्तिकृत आणि खरा बनला. २०१९ मध्ये एआय-सक्षम कॅमेरे भारताच्या बाजारपेठेत महत्त्वाची भूमिका पार पाडणार असून एक बाजारपेठ म्हणून स्मार्टफोन कॅमेरा तंत्रज्ञानात सुधारणा करण्याकडे आपले लक्ष केंद्रित करता येईल. शटर दाबल्यानंतर वापरकर्त्यांच्या आवश्यकतेनुसार, सर्व उपलब्ध प्रतिमा डेटा एकत्र करून संग्रहित करण्याची आणि त्या प्रतिमांचा अर्थ लावून अचूकपणे प्रदर्शन करण्याची क्षमता कॅमेऱ्यांमध्ये असेल.

ऑगमेंटेड रियलिटी हा यापुढे अजिबात चर्चेचा विषय ठरणार नाही. एआर इमोजी दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होणार आहेत. यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांना त्यांचे अ‍ॅनिमेटेड अवतार तयार करण्याची संधी मिळते. त्यांच्या स्मार्टफोनवरून मिळणाऱ्या समग्र मनोरंजनाचीही रेलचेल यापुढे अशीच सुरू राहणार आहे.

खोल ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’

‘एआय अ‍ॅप्लिकेशन्स’ यापुढे अधिक लोकप्रिय बनणार असून ही ‘अ‍ॅप्लिकेशन्स’ कॅमेरापासून हार्डवेअपर्यंत विस्तारित होतील. फोनच्या प्रत्येक पैलूवर एआय-आधारित डिजिटल साहाय्यक, सुरक्षा व्यवस्था, बॅटरी व्यवस्थापन आणि ‘इन-बिल्ट न्यूरल प्रोसेसर’सारख्या अनुप्रयोगांची संख्या वाढवली जाईल. हे अनुप्रयोग वापरकर्त्यांच्या वर्तन पद्धतीसह जोडलेले असून त्या डिव्हाइसवर वापरकर्त्यांचा प्रवास मॅप केला जाईल. यातून सर्च टाइम कमी होऊन डिव्हाइसची कार्यक्षमता वाढू शकेल आणि ग्राहकांना वैयक्तिकृत अनुभवही मिळू शकेल.

स्टायलिश स्मार्टफोन

या वर्षी स्मार्टफोन डिझाइनमध्ये आणखी प्रगती झाली. स्क्रीन्स १८:९ किंवा १९:९ गुणोत्तर प्रमाणांपेक्षा उंच झाल्या आणि ‘नॉच’ यशस्वीपणे मध्य-श्रेणी विभागातला अत्यंत आकर्षक असा प्रस्ताव बनला. मनोरंजक प्रगतीही स्मार्टफोन्सनी खूप गाठली असून ग्राहकांना रंगीबेरंगी निवडींसह अनेक ऑफर्समध्ये गेल्या काही महिन्यांत आकर्षक रंगही उपलब्ध झाले. २०१९ मध्ये पुन्हा एकदा ग्राहकांना स्मार्टफोन डिझाइन्सबद्दल उत्सुकता राहणार आहे. या क्षेत्रात सुधारणा आणि नवीन विकासासाठी प्रचंड संधी आहेत.

कॅमेरा लेन्स वाढणार?

स्मार्टफोनमधला कॅमेरा हा दुय्यम मानला जात होता आणि साधारण दर्जाचे फोटो त्यातून येणे अपेक्षित होते, असा काळ फार वर्षांपूर्वीचा नाही. २०१८च्या शेवटाकडे आलो तर आपण पाहिले की डय़ुएल कॅमेरा ही ग्राहकांची मूलभूत गरज बनली असून कॅमेऱ्यातून विविध फंक्शन्स पार पाडली जातात. २०१९ मध्येही, शक्तिशाली कॅमेरा सेन्सर्ससह मल्टिपल लेन्सेसना अधिक प्रसिद्धी मिळण्याची शक्यता असून आपण यातून अधिक सखोल तपशील छायाचित्रात टिपू शकणार आहोत. परंतु किती कॅमेरे गरजेचे असतील आणि यातून आपल्याला खरोखरच काही वेगळे हाती लागणार आहे का.. असे म्हटले जाते की, उत्पादक अधिक चांगले फोटो काढता यावेत, यासाठी अशाच प्रकारचे नवे कॅमेरे स्मार्टफोन्समध्ये विकसित करणार असून विविध लेन्सेसमुळे टेलिफोटोकडून आपण आता स्मार्टफोनच्या वाईड अँगलकडे वाटचाल करणार आहोत. किंवा ऑप्टिकल झूम, डिजिटल झूम, वाइड-अँगल, बॅकग्राऊंड स्मूथिंग, अँटी-शेक उपाय, 3डी मॅपिंग आणि चांगली एचडीआर निर्मिती यांसारख्या वैशिष्टय़ांचा समावेश करून त्याऐवजी फक्त एकापेक्षा अनेक लेन्समधील डेटा एकत्र केला जाणार आहे, याबाबत साशंकता आहे. मोबाइल डिव्हाइसवरील प्रतिमा गुणवत्तेत सुधारणा करून डिजिटल कॅमेरा जवळजवळ अनावश्यक ठरविण्यासाठी ग्राहकांना उत्कृष्ट कॅमेरा ट्रेंड यंदा देण्यात येणार आहे.

‘नॉच’च्या पुढे काय?

स्मार्टफोनचा डिस्प्ले अधिक मोठा व्हावा आणि त्याचसोबत पुढच्या बाजूला असलेले स्पीकर, सेन्सर आणि फ्रंट कॅमेरा यांनाही पुरेशी जागा मिळावी, यासाठी ‘नॉच स्क्रीन’ डिस्प्लेचा पर्याय गेल्या वर्षी पहिल्यांदा वापरात आला. या वर्षी हा अनुभव आणखी एक पातळी पुढे जाणार आहे. ‘नॉचेस’ अधिक खोल असण्याची शक्यता असून फोनच्या पुढच्या भागात स्क्रीन अधिक खोलवर गेलेल्या आपल्याला कदाचित पाहायला मिळतील. परिणामी, सेल्फी कॅमेऱ्याला ही स्क्रीन अगदी योग्य अशी बनेल. परंतु, नॉच इतक्यात निघून जाणार नाही. जरी आपल्याला या गोष्टीचा कंटाळा येत असला तरीही, थोडय़ाशा डिझाइनसह फोन निर्माते आपल्याला आवश्यक असलेले सेल्फी कॅमेरे अत्यंत ‘बेझललेस’ पद्धतीने उपलब्ध करून देतात, याचे समाधान आहे.

तरीही, उत्पादक फूल स्क्रीन डिस्प्ले देण्यासाठी प्रयत्न  करत असल्यामुळे पुढचे वर्ष नॉचसाठी नक्कीच चांगले जाणार आहे. फ्रंट कॅमेऱ्यामध्येच फिंगर प्रिंट सेन्सर कसे बसवायचे याचाही विचार सुरू आहे. आता कॅमेरे एखाद्या खोबणीत लपवले जातील, असा काळ जवळ येत चालल्याने नॉचची गरजच उरणार नाही.