थंडीच्या या मोसमात हा एक सोपा, चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ. पण तो खायचा नाही तर प्यायचा आहे. सरबरं हा एक खीरीचा प्रकार आहे. पण ही खीर पौष्टिक आहे.

साहित्य-

अर्धी वाटी मेथीदाणे, अर्धी वाटी तांदूळ, एक वाटी किसलेला गूळ, एक वाटी ओला नारळ खोवून, अर्धा छोटा चमचा वेलची पूड किंवा जायफळ पूड.

कृती-

मेथी दाणे व तांदूळ मिक्सरला वाटून त्याची जाडसर भरड करून घ्यावी. पातेल्यात ५-६ वाटय़ा पाणी घ्यावे. त्यात ही भरड शिजवून घ्यावी. नंतर यात गूळ आणि नारळ टाकून छान मिसळून घ्यावे. सर्वात शेवटी वेलची पूड किंवा जायफळ घालून गॅस बंद करावा. हे सरबरं गरमगरमच प्यावे. यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि थंडी पळून जाते. याची चव कडूगोड अशीच असते. पण जर तुम्हाला कडू चव फारशी सोसत नसेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही तांदळाचे प्रमाण वाढवू शकता किंवा गुळाचे प्रमाणही वाढवता येईल.