राजेंद्र भट

आपल्या घरातील किंवा गॅलरीतील झाडांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. कीड का लागते आणि रोग का होतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. माती सशक्त नसेल, तर रोग होतात. झाडातील अन्नद्रव्यांचे संतुलन बिघडले असेल, तर रोग लागण्याची शक्यता जास्त असते. आपण झाडे लावण्यापूर्वी त्यांची प्रकाशाची आणि पाण्याची गरज समजून घेतली पाहिजे.

ज्या झाडांना काटे असतात त्यांची उन्हाची गरज अधिक असते आणि पाणी तुलनेने कमी लागते. गुलाबाचे झाड सावलीत लावले तर त्याला रोग होतात. या झाडाला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यप्रकाश आवश्यक असतो. उन्हामुळे प्रकाशसंश्लेषण होते. पण झाड जगणे आणि त्याला फुले-फळे येणे या दोन भिन्न घटना आहेत. पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, तरी झाड जगते, मात्र सूर्यप्रकाशाअभावी अन्ननिर्मिती न झाल्यामुळे फुले येत नाहीत. तसेच रोग आणि कीडसुद्धा लागते. तुळशीसारखी झाडे तर यामुळे मरतात. मातीत असणारे अ‍ॅरोबिक जिवाणू या अतिरिक्त पाण्यामुळे काम करू शकत नाहीत. त्यामुळे झाडाला मातीतून पुरेसे अन्न मिळत नाही. पाण्याचे अजीर्ण होऊन झाड मरते.

झाडांच्या कोवळ्या पानांवर कीड येते, तर जुन्या पानांवर रोग येतात. कोवळ्या पानांवर रस शोषणारे कीटक पानांच्या मागील भागावर असतात. तर वरील भागावर पाने कुरतडून खाणाऱ्या अळ्या दिसतात. त्या पाने खाऊन संपवतात. उदाहरणार्थ, लिंबू हे फुलपाखरांचे फूड प्लांट असते. त्यामुळे फुलपाखरे त्यावर अंडी घालतात. त्याच्या अंडी, अळी, कोश या अवस्था प्रत्येकी सात दिवसांच्या असतात. अळी सात दिवसांनंतर कोषात जाते. या अळ्या ट्वीझरने वेचून किंवा पाने कापून नियंत्रणात ठेवता येतात. रस शोषणाऱ्या कीटकांचे असे नसते. त्यांच्या अळ्या आणि प्रौढ कीटक हे डासांप्रमाणे पानात सोंड खुपसून आतील रस शोषून घेतात. विषाणूंचा प्रसार करतात. हे कीटक झाडांचे मोठे नुकसान करतात.