News Flash

रम्य आंद्रा खोरे

कुसूर हा घाट हाडाच्या पर्यटकांना माहीत आहे. हा घाट येतो मावळमध्ये.

(संग्रहित छायाचित्र)

ओंकार वर्तले

आपल्या मराठीत एक म्हण आहे, ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये. या म्हणीप्रमाणे आपण तसे वागतोही. पण तरीही काही भटक्यांची पावले ही नदीच्या मुळाकडे वळतातच. नदीचे मूळ असते कसे..? किंवा नदीचा प्रवास असतो तरी कसा? या प्रश्नाचे उत्तर अशा भटक्यांच्या शोधक बुद्धीला अस्वस्थ करत असते. आणि मग सुरू होते अनोखी भटकंती.. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने.

आजही सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत विविध नद्यांची उगमस्थाने दडलेली आहेत. त्याचं सौंदर्य आपल्याला अक्षरश: भुरळ पाडतं. असंच एक अनवट ठिकाण रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या प्राचीन कुसूर घाटवाटेजवळ दडलं आहे.

कुसूर हा घाट हाडाच्या पर्यटकांना माहीत आहे. हा घाट येतो मावळमध्ये. सह्याद्रीच्या रांगडय़ा सौंदर्याचं दर्शन या घाटाच्या प्रत्येक फ्रेममधून घडतं. याच घाटवाटेजवळ आंद्रा नदी उगम पावते आणि पूर्वेकडे वाहते. त्यामुळे या भागाला आंद्रेचं खोरं असं म्हटलं जातं. या अविस्मरणीय अनुभवासाठी आंद्रा नदीचा प्रवास करायला हवा आणि तिच्या सहवासाने संपन्न झालेलं आंद्रा खोरं एकदा तरी पाहायलाच हवं.

आंद्रा खोरं म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये असणार महत्त्वाचं खोरं. या नदीची लांबी भलेही याच तालुक्यात असणाऱ्या इंद्रायणी आणि पवना या नद्यांच्या तुलनेत कमी असेल, तरी या नदीचं महत्त्व काही कमी होत नाही. कारण या नदीचा इतिहास अगदी सातवाहन काळापर्यंत जातो. म्हणूनच इतिहासकार आणि अभ्यासक यांच्या दृष्टीने हे खोरं तसं प्राचीनच. या खोऱ्याला अगदी शिवकाळात आणि आजही ‘आंदर मावळ’ म्हटलं जात. शिवरायांच्या बारा मावळांपैकी एक असलेलं हे मावळ. स. अ. जोगळेकर म्हणतात की आंदर हा आंध्र शब्दाचा अपभ्रंश असावा. या भागात आंद्रा नदी भिवपुरीच्या डोंगरात (कर्जत तालुका आणि मावळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या डोंगरात म्हणजेच खांडीजवळ) उगम पावते आणि राजपुरी येथे इंद्रायणी नदीला मिळते. या दरम्यान या नदीवर ठोकळवाडी आणि आंद्रा या नावाची धरणं बांधली आहेत. ही धरणं डोळ्यांचं पारणं फेडतात. पूर्वीच्या काळी नालासोपारा हे कोकणातलं महत्त्वाचं बंदर होतं. समुद्रामार्गे आलेला माल या ठिकाणाहून घाटमाथ्यावरील प्रदेशात जात असे. म्हणजेच नालासोपारा हे महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. तेव्हा हा व्यापार नालासोपारा-भिवपुरी-कुसुरघाट मार्गे आंद्रा खोऱ्यातून पुढे  पुण्यापर्यंत होत असे.

कुसुर घाट ही प्राचीन घाटवाट. या घाटाच्या  खाणाखुणा आजही पाहायला मिळतात. कुसूर ते भिवपुरी हा एकदिवसाचा सुंदर ट्रेक आहे. या भागात तत्कालीन साधकांनी-तपस्वींनी- बौद्ध भिक्खूंनी खोदलेल्या निगडे, कल्हाट, कांब्रे येथील लेण्या इथे कलांचीही जोपासना होत असल्याची साक्ष देतात. या ठिकाणच्या लेण्या सर्वसामान्यांपासून दूर राहिल्या आहेत. यातील कांब्रे लेणी जास्तच देखणी आहेत.

कल्हाटजवळच्या डोंगरावर उभं असलेलं तासूबाई देवीचं मंदिर तर खूपच सुंदर आहे. या ठिकाणावरून दिसणारा आंदर मावळचा कॅनव्हास लाजवाबच! या ठिकाणी तासन-तास बसावसं वाटतं.

टाकवे-खांडी-कुसूर-पिंपरी-कुणे-निगडे-भोयर-कशाळ-फाळने-राजपुरी-किवळे ही याच खोऱ्यातील देखणी गावं. सह्यद्रीचा परिसस्पर्श झाला की गावं कशी देखणी होतात याचीच ही मूर्तिमंत उदाहरणे.

पावसाळ्यात इथे अक्षरश: स्वर्गच अवतरतो. मावळचा हा दुर्गम भाग इथल्या भटकंतीत आवर्जून पाहावा. हा भाग शब्दश: सह्यद्रीच्या अजस्रतेने वेढलेला आहे. त्यामुळे या भागात निसर्ग सौंदर्याची लयलूट पाहायला मिळते. इथे चारही महिने धुवांधार पाऊसपडत असतो. त्यामुळे या भागात असंख्य धबधबे पाहायला मिळतात. किंबहुना केवळ पावसात भिजण्यासाठी आणि धबधबे पाहण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले या आंदर मावळाकडे वळतात. खांडी-इंगळून-परीटेवाडी-माऊ इथले धबधबे तर प्रसिद्धच आहेत.

तसं पाहिलं तर आजच्या काळात नदी आणि तिचं खोरं पाहणं हे केवळ दिवास्वप्नंच ठरावं, एवढं आपण नद्यांना प्रदूषित करून ठेवलं आहे. पण आपल्या सुदैवाने अजूनही काही नद्यांची खोरी पाहण्यासारखी राहिली आहेत. आंद्रा हे त्यापैकीच एक. मंदिरं, जंगलं, लेणी, धरणं, निसर्गरम्य खेडी, धबधबे या साऱ्यांसाठी हे खोरं वैशिष्टय़पूर्ण आहे. पर्यटनाची वेगळी दृष्टी लाभावी आणि नदीच्या संवर्धनाची जाणीव व्हावी, म्हणून आंद्रा खोऱ्यात एकदा तरी जायलाच हवं. तो एक संपन्न करणारा अनुभव ठरेल.

ovartale@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 12:13 am

Web Title: pune sahyadri mountain ranges kusur ghat abn 97
Next Stories
1 ट्रिपटिप्स : ट्रेकिंगला जाताय?
2 राजस्थानी छाछ राबडी, कढी कचोरी
3 परदेशी पक्वान्न : चिकन तेरियाकी
Just Now!
X