वैद्य राजीव कानिटकर

पावसाळा हा ऋतू निसर्गात सर्वत्र हिरवळ पसरवणारा असला तरी येताना तो अनेक प्रकारचे विकारही घेऊन येतो. या रोगांपासून दूर राहण्यासाठी आपण काय खावे, कसे खावे आणि कसे राहावे यासाठी आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूची ऋतूचर्या सांगितली आहे.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

पाऊस पडायला लागल्यावर हवेतला दमटपणा वाढतो आणि शरीरात वातदोषही वाढतो. या काळात आपला जठराग्नी मंदावतो आणि पचनशक्ती कमी होते. परिणामी पोटाचे विकार या ऋतूत खूप वाढतात. एवढेच नाहीतर गजबजलेल्या शहरांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे निर्माण होणारी अस्वच्छता, प्रदूषण यांमुळे पोटाच्या विकाराबरोबरच सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, हिवताप, स्वाइन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस, कावीळ, उलटय़ा, जुलाब, विषमज्वर यांसारखे अनेक साथीचे रोगही बळावतात. त्यामुळे या सर्व विकारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे.

आहाराचा संबंध आजाराशी असतो. योग्य आहार तर कमी विकार त्यामुळे पावसाळ्यात आहारावर नियंत्रण ठेवले नाही तर विकारांना निमंत्रण नक्की आहे. पावसाळ्यात पचनशक्ती मंद असतेच, पण पुढे ‘ऑक्टोबर हीट’ म्हणजेच शरद ऋतू ज्यात पित्तदोषाचा प्रकोप होतो, त्या पित्ताची साठवणही पावसाळ्यात शरीरात व्हायला लागते. त्यामुळे पावसाळ्यातला आहार हा पचायल हलका, ताजा आणि गरमागरम असावा. आपल्याकडे चातुर्मासात पावसाळा असतो. शास्त्रकारांनी पचन नीट व्हावे यासाठीच चातुर्मासात विविध सणांच्या निमित्ताने उपाय करायला सांगितले आहेत. त्यायोगे पोटाला न पचलेले अन्न पचवायला वेळ मिळेल आणि उपासानिमित्ताने हलके आणि कमी प्रमाणात अन्न शरीरात जाईल. परंतु आपल्याकडे याच्या नेमके उलट घडते. उपवासाच्या थाळीत काय काय असते तर, साबुदाणा खिचडी, साबुदाणा-बटाटय़ाचे थालीपीठ किंवा वडे, शेंगदाण्याची आमटी, वेफर्स, बटाटय़ाचा चिवडा असलेली मिसळ! जुन्या पिढीची अजून एक पद्धत म्हणजे उपवास सोडण्यासाठी केली जाणारी श्रीखंड, खीर, पुरण, शिरा यांसारखी पक्वान्न्ो. असा उपवास शरीरासाठी नक्कीच फायदेशीर नाही.

उपवास करायचा असेल तर वरी तांदूळ, शिंगाडा पीठ, उपवासाची भाजणी, सुरण, लाल भोपळा, राजगिरा, फळे, सुंठ पावडर घालून गरम केलेले दूध, गोड ताक, घरचे लोणी, तूप या पदार्थाचा आहारात समावेश करावा.

मांसाहार शक्यतो या ऋतूत टाळायला हवा. पचनशक्ती कमी असताना तळलेले मासे, चिकन, मटण शक्यतो खाऊ नयेत. याऐवजी मूग, मटकी, मसूर, लाल चवळी, कुळीथ यांचा आहारात समावेश करावा. तुरीची आमटी शक्यतो दुपारच्या जेवणात खावी. उडदाची डाळ, बेसन, मैदा, छोले, राजमा, वांगे, बटाटा, पांढरी चवळी, वाल पावटा हे पदार्थ वातूळ म्हणजे शरीरातील विकृत वायू वाढविणारे आहेत. त्यामुळे त्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करावा. पालेभाज्यांमध्ये लाल माठ, चवळी, शेवग्याचा पाला किंवा टाकळ्याच्या पानांची भाजी खावी. परंतु पालक, मुळा, मेथी, शेपू, अंबाडी यांसारख्या भाज्या खाणे शक्यतो टाळावे.

गरम गरम पोळी, ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, आले. लसूण, हिंग, मोहरी, मेथी, हळद, कडुिलब, कोथिंबीर, ओला नारळ या सर्वाची फोडणी दिलेल्या फळभाज्या, आमसुलाचे सार किंवा सोलकढी, तूप, जिरे, लसणीचे फोडणी दिलेले ताक, डाळ-तांदुळाची खिचडी, दलिया, उकडय़ा तांदुळाचा भात, पुदिना, कोथिंबीर, आले, लसूण, जिरे यांची चटणी अशा पदार्थाचा रोजच्या जेवणात वापर करावा.

पावसाळ्यात उकळवून पाणी पिणे हे केव्हाही उपयोगी असते. अगदी फिल्टरमधून शुद्ध केलेले पाणी असले तरी १० ते १५ मिनिटे उकळवून आणि गाळून ते पाणी प्यावे. आहारातील अपथ्याप्रमाणेच पावसाळ्यातील बऱ्याच रोगांचे कारण हे दूषित पाणी असते. फ्रीजमध्ये ठेवलेले थंड पदार्थ, पेय, सरबते, पाणी याचा वापर कटाक्षाने टाळावा. लोणची, पापड हेदेखील पावसाळ्यात शक्यतो खाणे टाळावे. वात आणि कफविकार असलेल्या व्यक्तींनी तर पावसाळ्यात कायम कोमट पाणी पिणे (तापवून थंड झालेले नाही) निरोगी आरोग्यासाठी खूपच उपयोगी पडते. चहा करताना त्यात आले, गवती चहाची पाने जरूर घाला. दूध पिताना पाव चमचा हळद आणि सुंठीची पावडर घालून ते कोमटच प्यावे. पाऊस सुरू झाला की पहिल्या पावसानंतर हापूस आंबा खाऊ नये.

लोक सर्व पदार्थ खातात म्हणून तुम्हीही खाऊ नका. आपले राहणीमान, पचनशक्ती कशी आहे, आपल्या प्रकृतीला काय चालते, आपल्याला वयोमानानुसार काय पचू शकते याचा सारासार विचार करून कधी, काय आणि कसे खावे हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे.