29 February 2020

News Flash

राहा फिट : वर्षां ऋतू आणि आरोग्य

उघडय़ावरील पदार्थ खाणे, चुकीचा जड आहार घेणे यामुळे वर्षां ऋतूत अनेकांचे पोट बिघडत राहते.

डॉ. अविनाश सुपे

वर्षां ऋतू म्हणजे जून महिन्याचा उत्तरार्ध. वर्षां ऋतूत शरीराचे व्यवहार हळूहळू बदलत असतात. ग्रीष्म ऋतूत म्हणजे उन्हाळ्यात शरीरातील वातदोष वाढलेला असतो. या बिघडलेल्या वातदोषाला वर्षांऋतूतील थंडाव्याची जोड मिळाली की तो चेकाळतोच!  जोडीला मंदावलेली पचनक्रिया तर असतेच. वर्षांऋतूचे वैशिष्ट म्हणजे या ऋतूत पित्तसंचयाला सुरुवात होते. त्यामुळे वर्षांऋतूत म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेक आजार उद्भवण्याची संभावना असते.

तळे, विहिरी, तलावांवर नवे पाणी येते. नवे पाणी म्हणजे जमिनीवरील सर्व मलमूत्र आपल्यासोबत वाहून आणणारे पाणी. रोगजंतूंचा भरपूर साठा असणारे पाणी, याशिवाय पावसाबरोबर माश्याही वाढतात. पाणी आणि अन्नपदार्थावर घोंघावणाऱ्या माश्यांच्या उपद्रवामुळे हगवणीसारखे आजार, उलटय़ा, जुलाब सुरू होतात. पोट बिघडणे, अपचन होणे, आव पडणे अशा तक्रारी या काळात सुरू होतात. यालाच आपण म्हणतो, ‘नवं पाणी बाधलं!’ डॉक्टरांकडे या काळात बहुतांश रुग्ण हे पोटाच्या तक्रारीचे असतात. उघडय़ावरील पदार्थ खाणे, चुकीचा जड आहार घेणे यामुळे वर्षां ऋतूत अनेकांचे पोट बिघडत राहते.

पावसाळ्याच्या सुरुवातीला आभाळ भरून येते, गार वारा सुटतो. त्यामुळे या पावसाच्या थंडी वाऱ्यात सांधेदुखी बळावते. पन्नाशी उलटलेल्या लोकांचे सांधे कुरकुरायला लागतात. गारठा व पावसात भिजण्याने सर्दी-पडशाला आमंत्रण मिळते. या थंड वातावरणात दमेकऱ्यांचा दमादेखील अनेकदा बळावतो. शिवाय पावसात आपण वापरतो प्लॅस्टिक चपला किंवा बूट. या प्लॅस्टिक बुटात पाणी साचून राहिल्याने पायाला चिखल्या होऊ लागतात. पावसाळ्यात पावसाचे पाणी जिथे-तिथे साठून राहते. या साठलेल्या पाण्यात उंदीर, कुत्रे यांचे मलमूत्र मिसळले जाते. पावसाच्या पाण्यात चालल्यास व शरीरावरील जखमेत पाणी गेल्यास किंवा पावसाचे पाणी अनावधानाने पोटात गेल्यास लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. या काळात प्रामुख्याने डेंग्यू, मलेरिया, ताप व इतर आजारांचा प्रादुर्भाव वाढलेला असतो. या सर्व आजारांकडे दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते. तेव्हा वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू करावेत.

विहार

* पायात चप्पल न घालता अजिबात फिरू नये.

*  दुपारची झोप या ऋतूत शक्यतो टाळावी.

*  पायात चिखल्या होऊ नये म्हणून पाय कोरडे ठेवावेत. त्यांना पावडर लावावी.

*  पायाला निलगिरीचे तेल वा वेखंड, कापूर याचे शुद्ध तेल वापरावे. हातापायाच्या तळव्यांना हे लावावे.

*  घरामध्ये हवा शुद्धीसाठी चंदन, वाळा, कापूर, उदी यांचा धूप करावा.

*  साचलेल्या पाण्यात शक्यतो जाऊ नये.  मुलांना तर या पाण्यात अजिबात खेळू देऊ नये.

First Published on July 9, 2019 7:53 am

Web Title: rainy seasons and health monsoon health tips zws 70
Next Stories
1 काळजी उतारवयातली : पावसाळ्यात आरोग्याची काळजी
2 योगस्नेह : पश्चिम नमस्कारासन
3 आरोग्यदायी : आहार कॉर्न चाट
X
Just Now!
X