06 April 2020

News Flash

पेटटॉक : आपले आणि परके

दरवर्षी वाघांची संख्या किती वाढली याकडे प्राणिप्रेमी डोळे लावून बसलेले असतात.

रसिका मुळय़े rasika.mulye@expressindia.com

भारतातील हौशी प्राणिप्रेमींच्या कैदेत परदेशी पक्षी आणि प्राणी आहेत. तसेच भारतातील प्राणी हे परदेशी नागरिकांच्या कैदेत आहेत.

वाढत्या सुबत्तेबरोबर भारतातील प्राणीपालनाचा छंद वाढू लागला. भारतातील वन्यप्राण्यांना पाळण्यास बंदी आल्यानंतर पाळीव असणाऱ्या कुत्री, मांजरी यांच्या जोडीला घरात परदेशी प्राण्यांचा शिरकाव झाला. एक्झॉटिक प्राणी, पक्षी, मासे यांची मोठी बाजारपेठ उभी राहिली. त्यावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरून निर्बंध आल्यानंतरही या बाजाराचा आवाका कमी झाला नाही. आलेल्या र्निबधांबरोबर अवैध मार्गाने ही बाजारपेठ वाढली. भारतातील हौशी प्राणिप्रेमींच्या कैदेत परदेशी पक्षी आणि प्राणी आहेत. तसेच भारतातील प्राणी हे परदेशी नागरिकांच्या कैदेत आहेत.

दरवर्षी वाघांची संख्या किती वाढली याकडे प्राणिप्रेमी डोळे लावून बसलेले असतात. दरवर्षी काही शेकडय़ाने वाघांचा आकडा वाढला तरी आनंदोत्सव साजरा केला जातो. मात्र भारतातील जंगलातील वाघांपेक्षा दुप्पट वाघ हे अमेरिकेत पाळीव आहेत. अमेरिकेतील अनेक प्रांतांत वाघ सर्रास पाळले जातात. वाघाच्या संवर्धनाकडे जगाचे लक्ष असल्यामुळे तुलनेने त्याच्या तस्करीला काहीसा आळा बसला आहे. त्यामुळे पाळीव असलेले बहुतेक वाघ हे निसर्गात वाढलेले नाहीत. ते केप्टिव्ह ब्रीडिंगमध्ये आहेत. संकेतस्थळांवर परदेशी पक्षी पाळण्याच्या जाहिराती झळकत असतात तशा परदेशात वाघाच्या बछडय़ांच्या जाहिराती अनेक संकेतस्थळांवर पाहायला मिळतात. शिकारी आणि प्रतिष्ठेसाठी पिंजऱ्यात वन्यप्राणी कोंडून ठेवण्याच्या हौशीपोटी १९३२ साली भारतातून नामशेष झालेला चित्ता पुन्हा भारतात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातून नाहीसा झालेला हा चित्ता परदेशातील अनेक घरांमध्ये विशेषत: अरबी देशांमध्ये पाळीव म्हणून विसावला आहे. खवल्या मांजर, साळींदर, भारतीय घुबडे, हॉर्नबिल्स, स्टारबॅक कासवे असे अनेक प्राणी परदेशातील प्राणी पालकत्वाची हौस भागवण्यासाठी अवैध मार्गाने भारताबाहेर जातात. त्याविषयी संतापही व्यक्त केला जातो. प्राण्यांची तस्करी थांबवण्याची मागणी सातत्याने होत असते. मात्र त्याच वेळी परदेशात नैसर्गिक वातावरणात नामशेष होण्याच्या मार्गावर असणारे अनेक प्राणी, पक्षी भारतातील प्राणी पालकांच्या पिंजऱ्यात आहेत हेही लक्षात घ्यायला हवे.

प्राण्यांच्या खरेदी-विक्रीच्या काळाबाजारात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागत असल्याचे वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांनी नमूद केले आहे. शेकडो कोटी रुपयांची उलाढाल भारतात या बाजारात होते. बाजारात सर्रास पिंजऱ्यात कोंडून ठेवलेले परदेशी पक्षी दिसतात. यातील लव्हबर्डस हे मूळचे ऑस्ट्रेलियाचे. ऑस्ट्रेलियामध्ये आता या पक्ष्यांचे अस्तित्व धोकादायक पातळीवर आहे. मोठे रुबाबदार मकाव पोपट हा अमेरिका, मेक्सिकोतील करडय़ा रंगाचा पोपट हा आफ्रिकेतील याप्रमाणेच माकडे, कासवे, साप, इग्वाना, खारी अशा अनेक परदेशी प्राण्यांची विक्री होते. हे अनेक प्राणी, पक्षी त्यांच्या मूळ अधिवासामध्ये महत्त्वाचे आहेत. तेथील त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र, ते आपल्या येथील जंगलांमधील नाहीत म्हणून त्यांना पिंजऱ्यांत कोंडले जाते. भारतीय वन्यजीव कायद्यानुसार फक्त भारतीय प्रजातींच्या वन्यजीवांना पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. परदेशी वन्यजीवांना पाळण्यास बंदी नाही याचा अर्थ परवानगी आहे असे गृहीत धरून त्यांची खरेदी-विक्री होत असते. एके काळी आणलेल्या प्राणी-पक्ष्यांच्या पुढील पिढय़ा भारतातच वाढवून त्यांची खरेदी-विक्री केल्याचे सांगितले जाते.

जागतिक कराराचे पालन नाही

प्रत्येक देशाने त्यांच्याकडील अस्तित्व धोक्यात आलेल्या प्राणी आणि पक्ष्यांची यादी जाहीर केली. त्यानंतर जगातील साधारण ३७ हजार प्रजातींच्या संवर्धनासाठी एक जागतिक करार करण्यात आला. ‘द कन्व्हेन्शन ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेन्जर्ड स्पिसीज ऑफ वाइल्ड फाऊना अँड फ्लोरा’ हा तो करार. कराराची अंमलबजावणी होण्यासाठी १९७५ साल उजाडले. सध्या भारतासह जगातील १८३ देशांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. यातील विरोधाभास असा की, भारताने १९७६ साली या कराराला समंती दिली. मात्र, त्यानंतर पुढील दशकात भारतातील परदेशी प्राणी-पक्ष्यांची बाजारपेठ अधिक फोफावलेली दिसते. म्हणजेच आपण करार तर केला, मात्र त्याचे पालन गांभीर्याने होत नसल्याचे यातून समोर येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 12:58 am

Web Title: rasika mulye article on foreign pet animals zws 70
Next Stories
1 पूर्णब्रह्म : इंडियन स्वीट व्हेगन ब्रेड
2 परीक्षा : ताप की यशाचा मार्ग?
3 मनोमनी : प्रेमाची (आभासी) भावना!
Just Now!
X