करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव.. 

coronafight@expressindia.com

प्रणिता आपटे-जोशी : गुढीपाडवा हा आपला महत्त्वाचा सण, नव्या वर्षांचे स्वागत करण्यासाठी सारेचजण नटूनथटून तयार होतो. नववर्षांची शोभायात्रा काढतो. पण यंदा यातले काहीच करता येणार नव्हते. कारण करोनामुळे घराच्या बाहेरच पडायचे नव्हते. आमच्या साथ साथ परिवारामध्ये एकूण ६०० कुटुंबं आहेत. सर्वाचाच हिरमोड झाला होता. मग एकमेकांना नुसतेच संदेश पाठवण्यापेक्षा आम्ही ठरवले की, काहीतरी वेगळा उपक्रम घ्यायचा. त्यासाठी छायाचित्रांची स्पर्धा ठेवली. खरेतर ती ठेवताना आमच्याही मनात काही शंका होत्या. म्हणजे या संकटाच्या काळात आपण अशी मजा करायची का, पण मग विचार केला, सध्याच्या काळात घरात राहणे महत्त्वाचे आहे. शिवाय प्रत्येकाने सकारात्मकही राहणे ही गरज आहे. कारण एकूणच वातावरण नकारात्मक असल्याने किमान कुटुंबात तरी सकारात्मकता राखणे गरजेचे होते. शिवाय घरातच राहून आपले छायाचित्र पाठवण्यामुळे कोणालाच त्रास होणार नव्हता. सामाजिक जीवनात सरकारने घातलेल्या कोणत्याही निर्बंधांचे उल्लंघन केले जाणार नव्हते. त्यामुळे मग गटावर पोस्ट टाकली, की साऱ्यांनी छान नटूनथटून सुंदर छायाचित्रं काढावी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी ५ वाजायच्या आत ती गटावर पाठवावी. या छायाचित्रात सारे कुटुंब दिसले पाहिजे, असा नियम होता. त्याप्रमाणे साऱ्यांनी छायाचित्रे पाठवल्यावर त्यावर सर्वानी मतदान करावे. ते मतदानही गुप्त राखण्यासाठी वेगळ्या एका क्रमांकावर घेतले. ही सारी प्रक्रिया संध्याकाळी ८ वाजेपर्यंत चालली. शेवटी निकाल जाहीर झाले. या निकालादरम्यान अनेक सदस्यांनी छान कलाकौशल्याचे कार्यक्रम सादर करून त्याचे व्हिडीओही पाठवले. त्यात धम्माल आली. शेवटी गटावरच ऑनलाइन असा एक आभासी बक्षीस समारंभ पार पडला. सगळा कार्यक्रम मस्त पार पडला. गुढीपाडव्याचा सारा दिवसच आनंदी झाला. आता करोनाचे संकट टळल्यानंतर जेव्हा केव्हा परत भेटू तेव्हा दणक्यात हा समारंभ पार पाडू असा आम्ही सर्वानी नियम केला आहे. एकूणच करोनाकाळातही असे काही उपक्रम करत आम्ही हे दिवस आनंदी करण्याच्या प्रयत्नांत आहोत.

स्वावलंबनाचे धडे

माधुरी शिंदे, पुणे : मी आणि माझे पती दोघेही नोकरदार. त्यामुळे दोन्ही मुले पाळणाघरात. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर पाळणाघर बंद आहे. मला घरून काम करण्याची मुभा असली तरी पती रुग्णालयात नोकरीस असल्यामुळे त्यांना ही  सवलत नाही.  रोजचा धावपळीचा दिवस करोनामुळे काहीसा संथ झाला आहे. कारण प्रवासातच खूप वेळ जात असे. कामाच्या व्यापातून व्यायाम, वाचन, घरगुती कामे यासाठी विशेष वेळ मिळत नसे. पण सध्या मात्र त्यातील बऱ्याच गोष्टी करता येत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणेच सकाळी उठून कामाला लागण्याचा लगबगीचा वेळ मी घरातच योगासने, प्राणायाम, सूर्य नमस्कार घालण्यासाठी  देत आहे. माझ्या पतींना वाचनाचे वेड असल्यामुळे घरात ‘पुस्तकांचा कप्पा’ आवर्जून करून घेतला आहे. त्यामुळे कुटुंबात वाचनसंस्कृती आहेच. हीच संस्कृती भावी पिढय़ांमध्ये उतरावी, यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत असतो.  श्यामची आई, विनूची आई, अजिंक्य मी, बोक्या सातबंडे, साने गुरुजींच्या गोड गोष्टी, एक होता काव्‍‌र्हर, अ‍ॅनिमल फार्म आदी पुस्तके मुलांना वाचनासाठी उपलब्ध करून दिली आहेत. मुलेसुद्धा वाचनाचा अनुभव घेत आहेत म्हणून विशेष आनंद झाला. त्यामुळे मुले वाचनात मस्त आणि मी कामात व्यस्त. घरकामातील मदतनीस ताईंना पूर्ण पगारी सुट्टी दिली आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, घराची स्वच्छता अधिक कार्यालयीन कामांचा थोडासा ताण सुरुवातीला जाणवत असे. पण ही कामे आम्ही कुटुंबीयांनी आता वाटून घेतली आहेत. त्यानिमित्ताने खरेतर मदतनीस ताईच्या श्रमाचे मोल अधिकच जाणवत आहे.

शाळेला सुट्टी असूनही बाहेर खेळायला का जाता येत नाही? हे सुरुवातीला मुलांना समजावणे जड जात होते. पण नंतर हळूहळू मुलांना त्यामागचे कारण समजले आणि त्यांनीही हट्ट करणे सोडून दिले. दोन्ही मुले आता कामातही खूप मदत करतात. कांदा, मिरची, लिंबे चिरणे, भाज्या निवडणे, आपले आपण कपडे धुणे, ते वाळत टाकणे, घडय़ा करणे. जेवणाची भांडीही घासायला शिकत आहेत. हे स्वावलंबनाचे बाळकडू मुलांना खूपच आवडत आहे.

सध्या आम्ही नियमितपणे वेगवेगळ्या भाज्यांचे सूप करत असतो. जास्तीतजास्त पौष्टिक अन्नपदार्थ तयार करण्यावर भर दिला जात आहे. मुलांना आता पोळ्याही करायला शिकवत आहे. कधी भारताचा नकाशा तयार होतो तर कधी जगाचा..पण मुलांना जाम धम्माल येते आहे. आपल्या हाताने केलेली पोळी म्हणून अधिकची अर्धी गट्टम करत आहेत. शिवाय अन्नाचे महत्त्वही पटत आहे. टीव्ही, मोबाइलला मुले जशी काही विसरूनच गेली आहेत. त्यामुळे मला विशेष आनंद आणि समाधान वाटत आहे.

एकमेकां साहाय्य करू..

शुभदा अघोर, : प्रभारी मुख्याध्यापिका (विजय लक्ष्मण संस्थेचे प्रगती विद्यालय कर्णबधिरांसाठी, दादर) विजय शिक्षण संस्था गेली साठ वर्षे कर्णबधिरांच्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्था शिक्षणाबरोबर पुनर्वसनाचे कामही अव्याहतपणे करत आहे.

संस्थेच्या दोन शाळा असून साधना विद्यालय दादर पूर्व व प्रगती विद्यालय पश्चिम येथे आहेत. १६ मार्चपासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरता शासनाने खबरदारी म्हणून शाळा बंदचे आदेश दिले होते त्याप्रमाणे शाळा बंद झाल्या. या सगळ्यात परीक्षा होणार की नाही हे माहीत नव्हते. सरावात खंड पडला की आमची ही कर्णबधिर मुले विसरतात आणि म्हणूनच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक शिक्षकाने आपल्या वर्गाचे व्हॉट्सअ‍ॅप गट तयार केले व त्यावर मुलांचा अभ्यास सुरू झाला. अभ्यासाबरोबर मुलांच्या सर्जनशीलतेकडे व एकाग्रतेकडे ही लक्ष दिले गेले. याकरता शिक्षक स्वत: ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य बनवू लागले आणि ते मुलांना पाठवू लागले. मुलांनीही त्यातून प्रेरणा घेऊन टाकाऊतून टिकाऊ असे शैक्षणिक साहित्य बनवले. कोणी पाढय़ाचे चक्र बनवले, करोना आजारात काय काळजी घ्यावी याची चित्रं काढली तर कोणी एकवचन, अनेकवचन यावर काम केले. विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत करोना आजाराबाबत आमच्या सरांनी व्हिडीओ तयार केला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या श्रवणयंत्राची व प्रोसेसरची कशी काळजी घ्यावी याबाबतही वाचाउपचारतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याबरोबर शाळेतील समाजसेविका ताई सांकेतिक भाषेत करोनाबाबत घ्यावयाची काळजी, उपाय व समुपदेशन हेसुद्धा करत होतीच. विद्यार्थी व शिक्षकांनी या विशेष सुट्टीत उल्लेखनीय काम केले होते. त्याची एक तीन मिनिटांची चित्रफीत तयार करून ती आमच्या संस्थेच्या पदाधिकारी वर्ग, देणगीदार व हितचिंतकांना पाठवली. सगळ्या शिक्षक व विद्यार्थी वर्गाचे कौतुक केले. हे सगळं होत असताना एक प्रश्न मात्र मनात भेडसावत होता, मुलांच्या आरोग्याची चिंता होतीच, पण त्यापेक्षा अधिक त्यांच्या रोजच्या अन्नाची चिंता होती, कारण बहुतांशी पालक हे छोटे- मोठे काम करणारे होते. त्यांचे हातावरचे पोट, काम बंद, पैसे नाहीत मग कुटुंबाला पोसणार कसे? विचारचक्र सुरू झाले. शाळेच्या गटावर एका ज्येष्ठ सरांनी आमच्या कर्मचाऱ्यांनाच मदतीचे आवाहन केले आणि कामाला सुरुवात झाली. संस्था अनेक वर्ष माजी विद्यार्थ्यांबरोबर काम करत आहे. त्या गटावरही गरजू विद्यार्थ्यांना काही मदत हवी आहे का याची विचारणा करण्यात आल; त्यात शाळेच्या समाजसेविका रिबेलोताई यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली.

शाळेच्या जवळ राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आम्ही दादरमधील आमच्या देणगीदारांना मदतीचे आवाहन केले. त्यांनी मदतीचा हात दिला. चार जणांच्या कुटुंबाला एक महिना पुरेल अशा गृहोपयोगी वस्तूंचे अंदाजे हजार रुपये कि मतीचे संच तयार करून पालकांना देण्यात आले. या कार्यात शाळेतील शिक्षक, लिपिक, वाचातज्ज्ञ, समाजसेविका सर्वानीच आपआपल्या परीने खारीचा वाटा उचलला. आमच्या शाळेतील विशेष शिक्षक  लिंगायत यांचा या कार्यात सिंहाचा वाटा आहे. शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत देण्याकरता देणगीदारांचे हितैशी मदतीला आले. गरजू विद्यार्थ्यांना रोजच्या गरजेचे सामान मिळत होते. गरज नसलेले पालक प्रामाणिकपणे आम्हाला गरज नको हेही सांगत होते, ही बाब महत्त्वाची आणि मुद्दाम नमूद करावी, अशी आहे. संस्थेने ज्ञानदानाबरोबर अन्नदानाचे हे व्रत सफलपणे पूर्ण केले आहे असे मी म्हणेन. मदत मिळाल्यावर एका पालकाचा अतिशय बोलका व मनाला हळवा करणारा अभिप्राय म्हणजे ‘ताई, आपने हमें लक्ष्मणजी की संजीवनी भेजी है। आपको चरणस्पर्श, आपका धन्यवाद!

या संचारबंदीच्या काळात शासनाच्या आदेशाप्रमाणे ‘घरात राहा सुरक्षित राहा’ याप्रमाणे घरात राहून विद्यार्थी वर्ग व शिक्षक आपापल्या गटात अभ्यासाचे व शैक्षणिक साहित्य बनवण्याचे कार्य करत आहेत व गरजू विद्यार्थी पालकांनाही अन्नधान्याची मदत शाळेचे कर्मचारी करत आहेत.

आपल्या समाजात अनेक दयावान व सामाजिक बांधिलकी जपणारे लोक आहेत त्यामुळेच या वैश्विक संकटातून आपण निश्चितपणे बाहेर पडू असा विश्वास वाटतो.

आठवणींचा सोहळा

प्रा. डॉ. राजाभाऊ मुणघाटे, गडचिरोली : करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती केवळ भयंकर आहे. घरी बसून कंटाळा आला होता. तेव्हा पहिल्या आठवडय़ात स्वयंपाकघरात जाऊन काहीबाही रांधून प्रसारमाध्यमांवर फोटोबिटो टाकून झाल्यावर मग पुस्तकांकडे मोर्चा वळविला. काय करावे, असा यक्ष प्रश्न सतत पडायला लागला. व्हॉट्सअ‍ॅपवरील तेच ते संदेश कंटाळवाणे वाटू लागले. आमचा जवळच्या नातेवाईकांचा एक व्हॉट्सअ‍ॅप समूह आहे. तिथे आम्ही सारे भाऊ-बहिणी आणि प्रत्येकाचे जोडीदार असा सारा परिवार आहे. मला एक दिवस सुचले की आपले दिवंगत वडील आत्ताच्या काळात असते, तर कसे बोलले असते. वडिलांची सगळी स्वभाववैशिष्टय़े लक्षात घेऊन त्यांच्या सहकाऱ्याबरोबरचा एक काल्पनिक संवाद मी लिहिला आणि गटावर पाठवला. वडिलांची लकब, त्यांची विनोदी शैली हे सारे त्या संभाषणात उतरले होते. गटावर हा संदेश अतिशय आवडला. सर्वानी स्तुती केली. त्यानिमित्ताने जुन्या आठवणी निघाल्या. मग काय हा सिलसिलाच सुरू झाला. प्रत्येकानेच असे त्यांच्या-त्यांच्या जवळच्या व्यक्तीबद्दल (ज्या आता हयात नाहीत.) लिहिले आणि गटावर पाठवले. त्यातून खूप धमाल आली. गेलेल्या व्यक्तींच्या अनेक आठवणी निघाल्या. हा आठवणींचा सोहळाही सुखावणारा होता. बाहेर नकारात्मक वातावरण असताना समूहावरचे वातावरण मात्र सकारात्मक आणि आनंदी आहे.

मोडी लिपी  शिकले

माधुरी बर्वे, तारापूर : करोनामुळे आपण सारेच घरात अडकलो आहे. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही वेगळे करत आहे. मी मोडी लिपी शिकले. ऑनलाइन मोडी लिपी शिकवण्याचा सात दिवसांचा अभ्यासक्रम होता. त्यानंतर परीक्षा द्यायची होती आणि त्याचे प्रमाणपत्रही मिळणार होते. नवीन काही करायला मला कायमच आवडते. त्यामुळे मी लगेचच हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ठरवले. माझ्या एका मैत्रिणीलाही मोडी शिकायचे होते. आम्ही दोघींनी मिळून अभ्यासक्रमासाठी नोंदणी के ली. माझ्या या मैेत्रीणबाईंचे वय ७५ आहे. परंतु त्यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा होता. दररोज दुपारी नवे प्रश्न दिले गेले की आमचा फोन होत असे. एकमेकीला काय अडले, काय समजले हे सारे बोलत असू. जिला जे समजले असेल ती दुसरीला समजावत असे. त्यातूनही काही शंका राहिल्या तर शिक्षक होतेच. दोघींनी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण के ला. टाळेबंदीच्या या काळात काहीतरी चांगले के ल्याचे समाधान मिळाले.