करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..  coronafight@expressindia.com 

सौरभ भोर, नाशिक : करोना विषाणूचा आपल्या जीवनात प्रवेश झाला आणि आपले जगणेच बदलून गेले. सतत बाहेर हिंडणारे आपण घरात कोंडले गेलो. करोनाची नकारात्मक बाजू तर वेगळी सांगण्याची गरज नाही, पण काही सकारात्मक गोष्टीही घडत आहेत. मानवप्राणी घरातच आहे, त्यामुळे प्रदूषण कमी झाले आहे. नद्या स्वच्छ झाल्या आहेत. वन्यप्राणी मोकळेपणाने फिरू लागले आहेत. पंजाबमधून खूप खूप वर्षांनतर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत आहेत, असे म्हणतात. के वळ मानव घरात बसल्याने या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत.

माझ्या वैयक्तिक आयुष्यातही करोनाने माझा दिनक्रम बदलून टाकला आहे. सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत आहे,ऑफिसच्या कामानंतर उरलेल्या वेळात मी नवे काही शिकू  पाहत आहे, करू पाहत आहे. नुकताच मी चहा बनवायला शिकलो आहे. माझ्या दिवसाची सुरुवात ‘लोकसत्ता’नेच होते. प्रत्यक्ष वृत्तपत्र हाती आले नाही तरी ई-आवृत्ती पाहत होतोच. प्रादेशिक-आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान, मानसशास्त्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संपादकीय, संस्कृतवाणी यांसारख्या इतर अनेक वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील परिपूर्ण माहितीने ‘लोकसत्ता’तून वाचन म्हणजे जणू मेंदूला पौष्टिक खुराकच. करोनामुळे थांबलेले अर्थचक्र, त्याचे परिणाम, तेलाच्या दरातील घट, कोसळलेले शेअरबाजार, घटलेले जीडीपी या सगळ्याविषयी आधीही कु तूहल होतेच, पण आता ते आणखीच वाढले. ते शमवण्यासाठी ‘लोकसत्ता’चे वाचन हवेच. सोबतच मी अच्युत गोडबोले यांनी लिहिलेली काही पुस्तके ही वाचत आहे. करोनाच्या विळख्यातून जगाला वाचवणारे वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र यांविषयीही अधिक माहिती मिळवत आहे. मी विद्युत अभियांत्रिकीतील पदवीधर आहे, त्यामुळे त्यासंबंधीही बरीच माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेत असतो. अर्थशास्त्र, जीवशास्त्र यांसारख्या शाळेत कं टाळवाण्या भासणाऱ्या विषयांमध्ये कु तूहल निर्माण होण्यास एक विषाणू कारणीभूत ठरतो, ही मौजेची बाब आहे. या सगळ्यासोबत जुन्या मालिका, वेबसीरिज यांचीही उजळणी सुरू आहे. एकंदरीतच या विषाणूने एकविसाव्या शतकातील वेगवान आणि धावपळीच्या जीवनाला ‘बळजबरीचा’ का होईना पण निवांतपणा दिला. प्रत्येकाला आरोग्याबद्दल जागरूक केले तसेच स्वछता आणि स्वयंशिस्तीचेही महत्त्व अधोरेखित केले. त्यामुळेच मला वाटते, की या विषाणूपश्चात मानवाच्या जीवन जगण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल झालेला दिसेल, किमान माझ्या तरी नक्कीच. त्यासाठी आपणही योगदान देऊनच, पण सध्या घरातच राहू!

रामनवमीचा अनोखा सोहळा

शुभांगी बर्वे : करोना, करोना, करोना.. सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी एकच शब्द. या करोनाने साऱ्यांचीच दाणादाण उडवली आहे आणि बुद्धिमान अशा माणूस नावाच्या प्राण्याचे पाय जमिनीवरही आणले आहे.  २२ मार्चला आपल्या पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू जाहीर केला आणि वैद्यकीय सेवा, पोलीस यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संध्याकाळी टाळ्या आणि घंटानादही करायला सांगितले. चिपळूण येथील आमच्या चैतन्य या इमारतीमधील सारे जण बरोबर पाच वाजता आपापल्या गॅलऱ्यांमध्ये आलो आणि सुरक्षित अंतर पाळून घंटानाद केला. टाळ्या वाजवल्या. आमच्या चैतन्यमधील वातावरण कायमचे चैतन्यमयच असते. सारे सण उत्सव आम्ही जमून साजरे करतो. आमच्या इमारतीची रचना चौसोपी वाडय़ासारखी आहे. तीन बाजूंनी घरे, एका बाजूला भिंत आणि मध्ये चौकोनी मोठ्ठा, मोकळा चौक. त्यामुळे नुसते दारात उभे राहिले तरी एकमेकांशी छान गप्पा होतात. टाळेबंदीच्या या काळात सगळेच घरात मग आपापल्या दारात उभे राहून गप्पा होतात. पार पहिल्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यापर्यंत गप्पांचे फड रंगतात. हशा पिकतो.

यंदा आम्ही अनोख्या पद्धतीने रामनवमी साजरी केली. दरवर्षी प्रत्येक जण आपापल्या गावी जाऊन ती साजरी करतो. यंदा मात्र सारेच घरी होतो. आमच्या  इमारतीतील आपटे काका-काकूंकडे रामाचे नवरात्र बसते. त्यांच्याकडे रामनवमीची आरती, पूजा होतेच. मग सगळ्यांनी मिळून ती करायची असे ठरले. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या गॅलरीत येऊन दारातूनच आरती करायची, असे ठरले. बरोब्बर १२.१० मिनिटांचा मुहूर्त ठरवला. गॅलरीतूनच हाका मारून निरोप गेले.  रामनवमीचा दिवस उजाडला.  खालच्या चौकात साफसफाई करून रामाची तसबीर ठेवली. मेहता वहिनींनी त्याभोवती सुंदर रांगोळी काढली. समई लावली.  सारे जण ठेवणीतले कपडे घालून तयार झाले. १२.१० वाजता आरती सुरू झाली. साऱ्या इमारतीने आपल्या घराच्या दारात उभे राहून ही आरती केली. रामरक्षा म्हटली. रामाचे भजन के ले. साऱ्यांनाच खूप छान वाटले. दरवर्षी मी माहेरी या उत्सवासाठी जाते, यंदा करोनामुळे तो उत्सवच स्थगित करण्यात आला, पण इमारतीमध्ये साजऱ्या झालेल्या या रामनवमीने मनाला समाधान दिले.

या काळात प्रत्येक जण काही ना काही छंद जोपासतो आहे. भावे काकू निवृत्तीनंतर चित्रकलेची राहून गेलेली आवड जोपासत आहेत.  मी माझा लिखाणाचा छंद जोपासते आहे. आम्ही काही महिला दुपारच्या वेळेत रामचरित मानसगान वाचतो. अर्थात अंतर राखूनच. वरच्या मजल्यावरील जावकर काका संगीतप्रेमी आहेत, त्यांच्या घरून तबलापेटीचे सूर ऐकू येत असतात. मुलांचे घरातच पत्ते, कॅ रम चालू असते. इमारतीमधली पुरुषमंडळी आळीपाळीने बिल्डिंगच्या बागेला पाणी देणे, साफसफाई करणे ही कामे करतात. संध्याकाळी इमारतीखालच्या बागेत, मधल्या चौकात, गच्चीवर फे ऱ्या मारण्यासाठी बरेच जण उतरतात. परंतु जागा ऐसपैस आणि भरपूर असल्याने गर्दी होत नाही. तरीही आम्ही सारे जण मुखपट्टी लावून आणि सुरक्षित अंतर राखूनच हा फे रफटका मारतो. एकू णच करोना काळातही आम्ही सारे सकारात्मक राहत आहोत. आता तर रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त झाल्याची बातमी नुकतीच वाचली, त्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे.

छायाचित्रांच्या रंगीत आठवणी

ऋषीकेश बबन भगत, पाथर्डी, अहमदनगर : सुरुवातीला २१ दिवसांसाठी केलेली टाळेबंदी मग तर थेट ३ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. खरेतर सुरुवातीचे दिवस मस्त गेले. मी पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये शिकत  होतो. करोनाची चाहूल लागल्यावर मी लवकरच पुण्याहून आमच्या गावी पाथर्डीला आलो. त्यानंतर दोनच दिवसांत राष्ट्रीय पातळीवर टाळेबंदी जाहीर करण्यात आली. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच व्यवसाय बंद करण्यात आले. शहरात आमचे एक उपाहारगृह आहे. इतर वेळी त्याच्या कामात दिवस कसा जातो ते कळतच नाही. आता मात्र दिवसभर घरातच बसून राहावे लागणार होते.

करमणुकीसाठी मग घरातील फोटोंचा एक जुना अल्बम बघायला काढला. माझे काका विजय भगत हे फोटोग्राफर आहेत, त्यामुळे आमच्याकडे खूप फोटो आहेत. पूर्वी मोबाइल नव्हता त्यामुळे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरची आवश्यकता असायची. आमच्या घरातच एक फोटोग्राफर असल्यामुळे आमच्या लहानपणीचे खूप फोटो काढलेले आहेत. हे सगळे फोटो बघताना खूप मजा आली. घरी आजी-आजोबा आहेत त्यामुळे त्यांच्याकडून हे फोटो पाहताना जुन्या आठवणी ऐकायला मिळतात, त्यामुळे अधिकच मनोरंजक होते. हे लहानपणीचे जुने फोटो पाहताना मला एक कल्पना सुचली. ती म्हणजे या जुन्या फोटोप्रमाणे उभे राहून नवा फोटो काढायचा. घरात सर्वाना ही कल्पना आवडली. नवा फोटो आणि जुना फोटो एकत्र पाहिल्यावर गंमत लक्षात येते. लहानपणी सर्व भावंडांत उंच असलेली माझी मोठी बहीण आज आम्हा सगळ्यांपेक्षा लहान दिसते आणि लहानपणी सगळ्यात छोटुसा दिसणारा माझा लहान भाऊ आज सर्वात उंच दिसतो. असे बरेच गमतीशीर फोटो आम्ही काढले आहेत. या उपक्रमात वेळही छान जातो आणि आठवणीही गोड जमा होतात.

या मजामस्तीला जोड आहे ती घरच्या अन्नाची. आईने के लेला कोणताही पदार्थ मला आवडतोच. पुण्यात असल्याने आईच्या हातचे जेवायला मिळत नसे, आता ती संधी मिळाली आहे, त्याचा फायदा घेतो आहे. माझे बाबासुद्धा खूप सुंदर बासुंदी करतात, इतर वेळी कामाच्या व्यापात त्यांना जमत नाही, पण सध्या मात्र ते शक्य होते. मग एक दिवस बासुंदीचा बेत झाला. एकू णच जेवणाच्या बाबतीतही चंगळ सुरू आहे. आम्ही सध्या पुस्तक वाचनाचा उपक्रम सुरू के ला आहे, अर्थात घरातल्या घरात. पाहू, करोनावर मात करायची आहेच, त्यासाठी घरातही राहावे लागणार मग असे उपक्रम तर शोधावेच लागणार. एकू ण सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहोत.

बारसे ऑनलाइन

अपराजित वैभव भाकरे, ठाणे : मला २२ जानेवारी २०२०ला गोंडस मुलगी झाली. साहजिकच बाळंतपणानंतर मी माझ्या माहेरी ठाण्यातील घोडबंदरला राहायला गेले. शनिवार-रविवारी बाळाचे बाबा बाळाला भेटण्यास येत होते. बाळ थोडे मोठे झाल्यावर मगच त्याचे बारसे करायचे होते. २९ मार्च ही तारीखही ठरली. पण करोनाने सगळा घोळ घातला. वाढत्या टाळेबंदीच्या निर्णयाकडे पाहून मनात विचार आला, डिजिटल बारशाचा. घरीच बारसे करायचे आणि सगळ्यांना व्हिडीओ कॉलवरून दाखवायचे. मात्र हे परिवाराला, नातेवाईकांना, पालकांना कसे पटेल ते कळत नव्हते. पण आत्ताची स्थिती लक्षात घेता मुख्य म्हणजे बाळाची सुरक्षा विचारात घेतल्यावर सगळ्यांनीच आनंदाने हा पर्याय स्वीकारला. १८ एप्रिलची तारीख, वेळ ठरली. नामकरण संस्कारात कु ठलीही कसर राहू नये, यासाठी घरीच असलेल्या गोष्टींनी सजावट करायचे ठरवले. टीपॉयचा पाळणा बनवला. संपूर्ण बाळंतविडा, कुं ची वगैरे घरीच शिवली. बाळासाठीच्या या महत्त्वाच्या विधीमध्ये मी माझ्या हातांनी सारे करत होते. बाजारातील एकही नवी गोष्ट आणली नाही. बारशाचा दिवस उजाडला. घरी मी, बाळ, आई-बाबा (लीना आणि सुनील ढेंगळे) एवढेच होतो. ठरल्याप्रमाणे मुहूर्तानुसार सगळे नातेवाईक नटूनथटून व्हिडीओ कॉलसाठी जमले. अगदी ठाण्यातल्या ठाण्यात असूनही बाळाचे बाबासुद्धा आम्हाला ऑनलाइनच भेटले, कारण टाळेबंदीच्या आदेशाचे पूर्ण पालन करायचे होते. सर्वानी बाळाला शुभाशीर्वाद दिले. खूप छान समाधानकारक असा सोहळा संपन्न झाला. लेकीचे नाव आम्ही ‘अनाइका’ ठेवले आहे. पार्वतीदेवीच्या या नावाचा अर्थ आहे, संपूर्ण शक्ती.  हे सगळे मुद्दाम करोनाष्टक सदरात सांगण्याचे वैशिष्टय़ म्हणजे, आम्ही जसे घरात राहून सरकारच्या आदेशाचे पालन करतो आहे, तसे सर्वानीच करावे. कारण आपल्यासाठी पोलीस, माध्यमातील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी जिवाची बाजी लावून करोनाशी झुंज देत आहेत.  त्यांच्या कष्टाचे चीज करा. घरात राहा. सुरक्षित राहा.

निवांत कट्टा

विनायक दौलत टोपले, वांगण-सुरगाणा नाशिक : मी सध्या नाशिकला शिकत आहे. बरेच दिवस गावी गेलोच नव्हतो. होळीला सुट्टी होती म्हणून गावी आलो आणि करोनाचा कहर सुरू झाला. आमच्या क्लासलापण सुटय़ा होत्या. मग नाशिकला जाण्याचे कारणच उरले नाही. गावात वेळ मस्त जातो. इंटरनेटला रेंज मिळत नसल्याने जरा वाईट वाटत होते, पण यथावकाश अशी एक मस्त जागा शोधली की, जिथे इंटरनेट मस्त चालेल शिवाय तिथे निवांतपणाही होता. मग या जागेला नाव  दिले फे सबुक कट्टा. सोशल मीडियावरची सगळी मंडळी जिथे भेटतात, तो फेसबुक कट्टा. आता खरोखरच वेळ कसा जातो, ते कळत नाही.