05 August 2020

News Flash

करोनाष्टक : माणुसकीचे महत्त्व

कायम घरातून बाहेर पडल्यावर नकळत करोना तर होणार नाही ना, अशी भीती प्रत्येकालाच वाटत होती.

करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..  coronafight@expressindia.com

 डॉ. श्यामसुंदर मिरजकर,  मु. पो. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली : माझा भाऊ इस्लामपूर येथे एका रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात १ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान दाखल होता. त्याला  मेंदू, यकृत आणि बरगडय़ांची दुखापत झाली होती. त्या काळात इस्लामपुरात करोनाचे तब्बल २६ रुग्ण सापडल्याने सगळीकडेच भीतीचे वातावरण होते. कायम घरातून बाहेर पडल्यावर नकळत करोना तर होणार नाही ना, अशी भीती प्रत्येकालाच वाटत होती. दवाखान्यातही अगदी गरज असलेले रुग्णच येत होते, तिथेच अतिदक्षता विभागाच्या बाहेर एक ताई उदास चेहऱ्याने बसलेल्या दिसत असत. थोडी चौकशी केल्यावर कळले की, त्या दुसऱ्याच्या शेतावर काम करून रोजगार मिळवीत. अल्पभूधारक शेतकरी कु टुंबातील त्या ताईंचे पती अतिदक्षता विभागात होते. गावाकडे त्यांचे घर होते. इथे शहरात के वळ एकच नातेवाईक होते, पण त्यांनीही या कसोटीच्या काळात पाठ फिरवली होती. गावाकडून कधी जेवणाचा डबा येत असे, कधी नाही. हे लक्षात आल्यावर माझ्या भावाची पत्नी दीपाली या थोडा अधिकचा डबा घेऊन जात. तसेच डॉ. योगेश वाठारकर यांनी अडचणीत असणाऱ्या सर्व रुग्णांना आणि नातेवाईकांना दवाखान्यात चहा, नाश्ता, जेवणाची सोय केली. त्यामुळे त्यांची वेळ भागून जात असे; परंतु आर्थिक विवंचनेने त्या बाई पार कोलमडून गेल्या होत्या. एक दिवस तर त्यांच्याकडे औषधांसाठीही पैसे नव्हते. तोवर माझे बंधू अतिदक्षता विभागातून बाहेर आले होते. भावाने आणि मी मिळून तिला जमेल तशी मदत के ली. ती मदत पाहून त्या स्त्रीच्या डोळ्यांत पाणी आले. जवळच्या नातेवाईकांनी पाठ फिरवल्याने त्यांना खरोखरच रडू आवरत नव्हते. यानिमित्ताने एक विचार मनात आला, या करोनाला तर एक वेळ आपण पळवून लावू, त्यावर प्रतिबंधात्मक लसही शोधून काढू; पण आपल्या माणसांच्या गरजेच्या वेळी त्यांच्याकडे पाठ फिरवण्याच्या या वृत्तीला काय म्हणावे, बरे? या प्रवृत्तीवर इलाज कसा करावा? टाळेबंदीच्या काळात आपण सारे घरात जरूर बसू; पण माणुसकीला विसरू नये. कारण माणुसकी असेल तरच मानव असेल.

अन्नपूर्णेचा वसा

निरुता भाटवडेकर, दादर : करोनाने आपल्या सर्वानाच जणू खिंडीत पकडले आहे. तो कधी जाणार ते काही माहिती नाही; परंतु आपले वेळापत्रक मात्र सारेच विस्कटून गेले. रोज संध्याकाळी सुप्रसिद्ध शिवाजी पार्कला फे री व्हायची. ती बंद झाली. मग आवारातच मुखपट्टी लावून फिरू लागलो. घरातील कामे स्वत:च करायची होती; पण त्याची सवय असल्याने ते जड गेले नाही. बाहेरच्या शांत वातावरणाने नकळत मनात डोकावणे सहज शक्य झाले. चैत्रातील बहरलेली झाडे, सकाळची पक्ष्यांची किलबिल सुखावत होती. आपण निसर्गाला किती गृहीत धरतो आहे, याची बोचरी जाणीव होत होती. एक प्रकारे सारे गृहकै देतच. अशा वेळी बाहेर जाणे नाही. आपण के वळ हौसेमौजेसाठी कपडय़ांवर किती खर्च करतो, याचा साक्षात्कार झाला. याच काळात काही कारणाने दुरावलेल्या नातेवाईकांशी संवादही साधला. घरचे वाचनालय तर अगदी वेळेवर मदतीला आले. खूप पुस्तके  वाचली, इतरांनाही दिली. काही दिवसांपूर्वी आमच्या मार्गावरील तीन इमारतींमधील १६ जणींनी मिळून मुंबईतील विविध विभागांतील गरजूंसाठी खिचडी देण्याचा उपक्रम चालू केला. ही कल्पना अनघा पवार यांची. संवाद सुलभीकरणासाठी कोविड फू ड हेल्प ग्रुप बनवला गेला. रोज सकाळी १०० खिचडीचे डबे मुंबईत निरनिराळ्या भागांत रवाना होऊ लागले. या उपक्रमाने मानसिक समाधान तर दिलेच, शिवाय वेळेचा सदुपयोगही झाला. या काळात इमारतीमधील सारेच रहिवासी एकत्र आले. या काळाने आपल्याला बरेच काही शिकवले आहे. नात्यांची, निसर्गाची जपणूक करायला शिकवले आहे. गरजा कमी करायला शिकवले आहे.

आम्ही बाई मैत्रिणी जोडीच्या

पल्लवी चेंबूरकर : करोनामुळे सुरू झालेल्या टाळेबंदीला आता चाळीस दिवस झाले. सुरुवातीला मोकळा वेळ मिळाल्यावर घरातील आवराआवर करणे, दूरदर्शनवर चित्रपट पाहाणे, कॅरम, पत्ते खेळणे इत्यादी करण्यात गेले; पण जसजशी रुग्णसंख्या वाढू लागली तसा मनावरचा ताण वाढू लागला. कशातच मन रमेना. अशा वेळी माझी एक वहिनी, सुबोधिनी म्हात्रे हिने एक कल्पना मांडली. महिला दिनाच्या निमित्ताने तिने आम्हा, नणंदा, भावजयांचा समाजमाध्यमांवर एक गट तयार केला होता. त्यावरच तिने सुचवले की, रोज प्रत्येकाने एक साधा उपक्रम गटात टाकायचा आणि सगळ्यांनी तो पूर्ण करायचा. त्याप्रमाणे आम्ही आजपर्यंत कधी गमतीदार, तर कधी उद्बोधक असे अनेक उपक्रम केले. कधी शाळेतील आपल्याला आवडलेली कविता म्हणून दाखवणे, कधी लहानपणी केलेली चित्रकला आणि कातरकाम आठवून कागदाच्या विविध वस्तू बनवणे, मेंदी काढणे, कधी आपल्या नावातले आद्याक्षर घेऊन ते कलात्मक रीतीने सजवणे. काही वेळा तर ‘होम मिनिस्टर’च्या धर्तीवर नावातली अक्षराने किंवा कधी एखादा रंग घेऊन त्याप्रमाणे घरातील वस्तू जमवून फोटो टाकले. एकदा तर ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ या उपक्रमात काही जणींनी घरी कम्पोस्ट, कोकोपीट बनवणे, कलिंगडाचा पांढरा भाग वापरून थालीपीठ करणे, प्लास्टिकच्या दुधाच्या बाटल्या वापरून बाल्कनीत बगिचा करणे इत्यादी प्रात्यक्षिके दिली. कधी मन:शांतीसाठी प्रत्येकाने एक एक स्तोत्र म्हटले. सगळ्यात छान उपक्रम म्हणजे आपल्या नावातील एक एक अक्षर घेऊन करोना आणि टाळेबंदीबाबत एखादी चांगली घोषणा लिहिणे. यात सगळ्यांचीच कल्पनाशक्ती अगदी बहरून आली होती. घरातील खेळाचा व्हिडीओ टाकण्याच्या उपक्रमात कॅरम, पत्ते, सापशिडीबरोबरच ठिक्कर, कांदाफोडी यांसारखे जुने खेळही पाहायला मिळाले. एके दिवशी प्रत्येकीने करोनामुळे आपल्या आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल सांगितले. अक्षयतृतीयेला कुटुंबातील सर्व सदस्यांनी मराठमोळे कपडे घालून फोटो काढून पाठवले. या आमच्या ग्रुपमध्ये चाळीस ते पंचाऐंशी वयोगटातील महिला आहेत आणि प्रत्येक जण हिरिरीने दररोजच्या उपक्रमात भाग घेतात. माझे ऐंशी वर्षांचे आईवडील अलिबाग येथे असतात. आईने या गटासाठी व्हॉटस्अ‍ॅप शिकून घेतले. आता तीसुद्धा आमच्या उपक्रमात जमेल तशी सहभागी होते. तिच्या तिघी बहिणी, वय वर्षे अनुक्रमे पंचाऐशी, पंचाहत्तर, सत्तर यादेखील उत्साहाने सामील होतात. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील दोघी बहिणी त्याच्या वेगवेगळ्या वेळा जुळवून आनंदाने भाग घेतात. ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे त्या आपले ऑफिस आणि घरकाम सांभाळून आपला त्या दिवसाचा उपक्रम पूर्ण करतात. आमच्यातील सुनीता जुकर प्रशिक्षित योगशिक्षक आहे. ती दररोज आम्हाला योगासने शिकवते. सुबोधिनीने मन:शांतीसाठी ॐकार शिकवले. एकू णच या उपक्रमाने आमच्या साऱ्यांच्या मनातील निराशा पार पळून गेली आहे.  दिवस सकारात्मक होत चालले आहेत. सगळ्या जणी इतक्या लांब राहतो, पण या उपक्रमाने अगदी आजोळच्या घरी जमून गप्पा मारतो आहे, असेच वाटते.

स्वत:तील अर्जुनाचा शोध

मेघना जैन : कोणताही खेळ म्हटले की मैदान हवेच; पण करोनामुळे मैदानाची उणीव प्रत्येक खेळाडूलाच भासत असणार. पण आम्ही काही खेळाडू मात्र याही परिस्थितीत हरलो नाही. टाळेबंदीची घोषणा होताच आमचे गुरू सर शांताराम आईर यांनी लगेच आम्हाला आमचे नेमबाजीचे साहित्य घरी घेऊन जाण्याचा संदेश पाठवला. आम्ही सारे नेमबाज. आम्हाला तर स्पर्धेच्या तयारीसाठी शूटिंग रेंज असणे गरजेचे आहे; पण टाळेबंदीत तर ते शक्य नव्हते. मग आमच्या गुरूंनी दिनचर्या आखून दिली. नेमबाजीला पूरक असे व्यायाम प्रकार आणि योग प्रकार शिकवले. ध्यान आणि स्वयंप्रेरणेच्या प्रकारांचाही रोज सराव करू लागलो. याआधी के वळ शारीरिक प्रशिक्षणावर लक्ष के ंद्रित करत होतो. आता खऱ्या अर्थाने मानसिक तयारीवर लक्ष के ंद्रित करू लागलो. मा. भीष्मराज बामही कायम सांगत असत, खेळामध्ये ९९.९ टक्के  वाटा हा मनाच्या शक्तीचा असतो. तेच लक्षात घेऊन शांताराम आईर सरांनी खेळाचे विशेष तंत्र बनवून दिले आणि ते प्रत्येकाच्या वेगळेपणानुसार ते विकसित करवून घेतले. ज्यांना आपले क्रीडासाहित्य घरी नेण्याची संधी मिळाली नाही, ते ठरावीक  वजनी वस्तू हातात पकडून आपल्या हाती नेमबाजीचे शस्त्रच आहे, अशी कल्पना करून सराव करतात. दररोज काय के ले याचा अहवाल सरांना द्यावा लागतो. ऑनलाइन मीटिंग्जमधून सुधारणांसाठी मार्गदर्शन के ले जाते.

आपण मैदानावर जाऊ शकत नसलो तरी आपण कमी नाही. सध्या घरात बसूनही आपण आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवू शकतो, असा आत्मविश्वास सरांनी आमच्या मनांत जागवला आहे. घरात राहून सराव करताना अडचणी आल्या तरी मागे हटायचे नाही, खेळाडूंसाठी संयम वाढवण्याची हीच संधी असल्याची जाणीव सरांनी करून दिली आहे. मनाचा संयम वाढवत मानसिक सरावाकडे लक्ष देणे आम्ही सुरूके ले आहे. त्यामुळे मैदानावरील दबावाला सामोरे जाण्याचा सराव पक्का होतो आहे.  या टाळेबंदीचा आमच्या कामगिरीवर परिणाम होईल, अशी शंकाही आमच्या मनांत येत नाही.

कोणत्याही अडचणींवर मात करतो तोच खरा विजेता, ही भावना आता प्रबळ होत आहे. खेळाकडे के वळ स्पर्धा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन सरांनी बदलला आहे. संघभावना आणि इतर खेळाडूंबद्दल आदर वाढत आहे. ही सकारात्मकता घेऊन आम्ही सारे अर्जुन आमच्या द्रोणाचार्याच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्यभेद करण्यासाठी तयार होत आहोत.

वाचनाची गोडी

जयंत एकनाथ घेगडमल, बदलापूर : रोज सकाळची लगबग, घाई-गडबड बऱ्याच घरांत आता उरलीच नाही, कारण करोनामुळे सारे घरीच आहेत. कधी नव्हे ती घरातली मंडळी घरातच राहिली आहेत. कुणी घराची साफसफाई करत आहे, कुणी बागकाम करत आहे, कुणी आपले आवडते छंद जोपासत आहे, तर कुणी वाचन, लेखन, नृत्य, गायन यांचा आनंद घेत आहे. घरातील आबालवृद्ध कॅ रम, लुडो, पत्ते, सापशिडी या बैठय़ा खेळांचा आस्वाद घेत आहेत. आमच्या घरालाही या बदलाचे वारे लागले आहे. पुस्तकांकडे ढुंकू नही न पाहणारी माझी मुले आता वाचनात गुंगलेली दिसतात. मुलीने जवळपास आठशे पानांचे ‘मृत्युंजय’ वाचून काढले. ते आवडल्याने तिने मग कर्णाच्या आयुष्यावरील ‘राधेय’ हे पुस्तकही हातावेगळे के ले. ‘श्यामची आई’, ‘रणांगण’, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ही पुस्तके  तिच्या यादीत आहेत. मुलानेही ‘श्यामची आई’ वाचले. त्यानंतर ‘महामानव’ हाती घेतले आहे. या काळात आम्ही घर अगदी स्वच्छ के ले आहे. घरात रोज नवनवीन पदार्थ बनत आहेत.

वेळापत्रक आखले

अजय हेबाळकर, चंदगड, कोल्हापूर : बारावीची परीक्षाही संपली आणि मग टाळेबंदी जाहीर झाली. अभ्यास नाही, महाविद्यालय नाही. सगळा वेळ रिकामाचा. मग वेळ घालवण्यासाठी पहिल्यांदा मोबाइलचा वापर सुरू झाला; पण त्या अतिवापराचेही दुष्परिणाम जाणवू लागले. तेव्हा निश्चय के ला की, आता वेळापत्रक आखायला हवे. सकाळी साडेपाच ते सात व्यायाम. मग अकरा ते चार या वेळात ‘लोकसत्ता’ आणि इतर पुस्तकांचे वाचन. संध्याकाळी चारनंतर पोहणे, पतंग उडवणे. बाकीच्या वेळात डोंगरावरून चूर्ण, करवंद असा रानमेवा गोळा करणे, शेतातील मक्याची कणसे भाजून खाणे असा दिनक्रम ठरला आहे. या सगळ्यात दिवस कसा जातो, ते कळतच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 2:14 am

Web Title: readers creative activities at home in lockdown zws 70 2
Next Stories
1 तारांगण घरात : नव्या रूपात ‘चिवित्रा’
2 करोनाष्टक : वर्तमानपत्रांतील कात्रणांचा संग्रह
3 तारांगण घरात : वेबमालिका आणि वाचन
Just Now!
X