करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..  coronafight@expressindia.com

जी. पी. वाघमारे-कांडलीकर, नांदेड : मागील काही महिन्यांपासून संपूर्ण जग करोना विषाणूशी हिमतीने मुकाबला करीत आहे. टाळेबंदी झालेली आहे. के वळ अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी दिसत आहेत. या उदासीन आणि नकारात्मक वातावरणाला कसे सामोरे जावे, याचा विचार करू लागलो. मी निवृत्त होऊन बरीच वर्षे झालीत. रोज सकाळी बाहेर फे रफटका मारत असे, पण आता गच्चीवरच फे रफटका मारतो. त्यासाठी नातवंडांच्या मदतीने गच्चीवरील सामान नीट लावले. गच्ची छानपैकी झाडून घेतली.

माझ्यासोबत आकांक्षा, अभिनव, मृणाल ही नातवंडेदेखील योगासने करतात. मी निवृत्तीनंतर माझे आत्मचरित्रसुद्धा लिहिले होते. तेव्हापासून मला लिखाणाची गोडी लागली. या टाळेबंदीच्या काळात मी पुन्हा एकदा माझी पुस्तके  आणि लिखाण वाचून काढले.

मला वर्तमानपत्रांतील महत्त्वाच्या गोष्टी, घटना यांची कात्रणे संग्रहित करण्याचा छंद आहे. ती कात्रणे असलेल्या डायऱ्या काढून त्या वाचायचे ठरवले. ते वाचताना जगातील सर्वात उंच इमारत, चंद्रावर भारताचा झेंडा, ए मेरे वतन के  लोगों हे गीत अशा किती तरी गोष्टी सापडल्या. मग माझ्या मुलांनाही ही कात्रणे वाचायला दिली.

या कात्रणांतील वेगवेगळे विषय आणि त्याची माहिती वाचताना साऱ्यांचाच वेळ छान मजेत गेला. टाळेबंदीच्या काळात एकू णच रोज असे वेगवेगळे उपक्रम शोधत आम्ही सारे आपला वेळ आनंदात घालवत आहोत.

इतिहासाचा अभ्यास

भागवत बाळासाहेब गीते : टाळेबंदी जाहीर झाली आणि काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला. बराच विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे आपल्या समाजात अनेक चुकीच्या गोष्टी होत असतात. त्यातही समाजमाध्यमांवर अनेक महापुरुषांच्या, नेत्यांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टींचा जाणूनबुजून प्रसार के ला जातो. अनेक जण चुकीच्या पद्धतीने इतिहासाचे सादरीकरण करतात, त्याचे चुकीचे दाखले देतात. ही गोष्ट कु ठे तरी सलत होती. मग म्हटले आता वेळ मिळाला आहे, तर रोज अभ्यास करून विविध पुस्तकांचे दाखले देऊन इतिहासाचे खरेखुरे सादरीकरण करावे. हा प्रयत्न साऱ्या समाजमाध्यमांत पोहोचणार नाही, याची जाणीव होती, पण किमान आपल्या ओळखीच्या व्यक्तींपर्यंत तरी पोहोचवावा असे ठरवले. रोज एक  व्यक्ती निवडून त्यांच्या कार्याबद्दल लिहू लागलो.  यानिमित्ताने माझा अभ्यासही झाला आणि काही चांगले के ल्याचे समाधानही मिळाले.

आम्ही सावित्रीच्या लेकी

रिता जोहरापूरकर, कारंजा(लाड) जि. वाशिम

लॉकडाऊन सुरू झाले तसे घरातील सर्व मदतनीसांना महिनाभराचा किराणा आणि पगार देऊन कामाची सुट्टी दिली. पंधराएक दिवसांनी वरकामात मदत करणाऱ्या मावशीबाईंचा फोन आला. म्हणाली, ‘‘बाई आम्ही पगार, राशन घेऊन घरी आरामात बसलोय,  तुम्ही मात्र सारी कामे एकटय़ाने करताय. कसेतरीच वाटत आहे. रिकामे बसून बसून डोके  चालेनासे झाले आहे. मी येऊ का कामाला? सगळी काळजी घेईन मी.’’ खरेतर मलाही एकटीने कामाचा भार वाहणे, जडच जात होते. शिवाय मावशीबाईंच्या घरची परिस्थितीपण तशी बिकटच आहे. मावशींच्या पगारावरच घर चालते. नवरा, दोन्ही मुले दारूच्या आहारी. त्यामुळे त्या वातावरणातून त्यांनी बाहेर पडणेही गरजेचेच होते. आमच्या मावशींना लिहिता-वाचता येत नाही.

मागे एकदा त्यांचे बँके त खाते उघडून दिले होते,  तेव्हा मला हे लक्षात आले होते. मग ठरवले, सध्या वेळ आहे तर ही शिकवणी सुरू करायला हरकत नाही. अंकलिपी आणि पाटी शोधली. पेन्सिली होत्याच. सुरुवातीला मावशी तयार होत नव्हत्या. आता या वयात शिकू न काय करायचे, असे म्हणत होत्या, पण या वेळी मी त्यांचे काहीएक ऐकू न घेतले नाही. म्हटले फक्त १५ मिनिटांचा अभ्यास आहे, पण तो करायचाच आहे. मग हो-नाही करत मावशीही तयार झाल्या. रोज अक्षरे गिरवल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मावशींनी स्वत:ची सही करता आली, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि अभ्यासाची गोडी त्यांना लागली. आमच्या या विद्यार्थिनी ताई आता दिवसेंदिवस प्रगती करत आहेत. मी घरचा अभ्यास जरी नाही दिला तरी मावशी आपणहून काही ना काही लिहून आणत असतात. वाचून दाखवतात, अडलेले शब्द, वाक्य विचारतात. मी याआधीही शिकवणी वर्ग घेत होते. पण या वेळच्या शिकवणी वर्गाने मला विशेष समाधान आणि आनंद मिळत आहे.

आजीची माया

अंबादास त्रिंबक वामन, मु. उंदरखेल (आष्टी, बीड) : आपल्या सगळ्यांचेच जीवन आता धावपळीचे झाले आहे. या धावपळीत आपल्या माणसांसाठी वेळ मिळणे फारच कठीण झाले आहे. लहानपणी मी आणि माझी बहीण आम्ही आईच्या आईकडे म्हणजे आमच्या आजीकडे राहायला होतो. त्यानंतर मी अभियांत्रिकी शिक्षणाकरिता औरंगाबादला आलो आणि आजीबरोबरच्या भेटी कमी होऊ लागल्या. खूप दिवस वाटत होते, की जरा निवांतपणे आजीकडे जावे. तिच्यासह वेळ घालवावा. टाळेबंदीच्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण झाली. या काळात आजीशी खूप गप्पा मारतो. तिच्याकडून जुन्या काळातल्या गोष्टी ऐकतो. तिचे पाय चेपून देतो. मला वाटते, टाळेबंदीमुळे आपण सारे घरातच आहोत, तेव्हा आपल्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींना समजून घेण्याची ही फार छान संधी आहे.

 

टीव्हीला सुट्टी

पूजा रमेश चव्हाण, सांताक्रूझ : सध्या घरात बसल्या बसल्या बहुतांश लोक टीव्हीच पाहताना दिसतात. आम्ही मात्र या टीव्हीला सुट्टी दिली आहे. मध्यंतरी परीक्षांच्या काळामुळे घरचा टीव्ही बंद होता, पण त्यानंतर लगेच टाळेबंदी सुरू झाली. त्यामुळे टीव्ही बंदच आहे. या काळात  सारे मिळून एकत्र बसलो. कामे वाटून घेतली. आपल्या कु टुंबाचे पुढील आयुष्याचे नियोजन कसे असावे, याबद्दल चर्चा के ली. खरेतर यापूर्वी वाचन-लेखनाची आवड नव्हती पण या सुट्टीत ती आपोआपच लागली. सध्या मी भगवद्गीता वाचत आहे. त्यातील आवडती वचनेही लिहून ठेवत आहे. चित्रकलेचे ऑनलाइन धडेही घेत आहे.

अभिनयाचे धडे

अभिषेक धात्रक, नांदेड : असे म्हणतात की, २१ दिवस काही गोष्टी सतत केल्या की त्याची आपल्याला सवय होते. टाळेबंदीमध्ये आपण सारे हेच अनुभवत आहोत. मला अभिनयाची आवड आहे. त्यामुळे या वेळात मी त्यावर काम करायला सुरुवात के ली. समाजमाध्यमांवर सध्या अनेक अभिनेते लाइव्ह येत असतात. त्यानिमित्ताने मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दिकीसारख्या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाबाबत नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यामुळे घरबसल्या अभिनयाचे धडे घेता आले. नुकतीच माझ्या एका मित्राने आपल्या पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘वर्दी में भगवान खडे हैं’ या शीर्षकाची छानशी  कविता लिहिली. मी त्या कवितेचे समाजमाध्यमांवरून सादरीकरण के ले. त्याला फार छान प्रतिसाद मिळाला. मी पुण्यात राहतो, पण सध्या टाळेबंदीमुळे घरी नांदेडला आलो आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दुर्मीळ योग या टाळेबंदीमुळे मिळाला. संध्याकाळी आपल्या माणसांत कॉफीचा आस्वाद घेण्याची मजा टपरीवरच्या चहात नाही हे आत्ता जाणवते आहे. तसेच मला बागकामाची आवड असल्यामुळे झाडांना पाणी घालणे हा दिनक्रमच झाला आहे. आणि हो, मी दररोज न चुकता ‘लोकसत्ता‘ आणि  The Indian Express ही दोन्ही वृत्तपत्रे वाचतो. आमच्या सकारात्मक अनुभवांना व्यासपीठ दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार. धन्यवाद!

ज्ञानप्राप्तीचा आनंद!

अनिल दौलत राजगुरू, शिक्षक : मी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत प्रशिक्षित शिक्षक म्हणून २७ वर्षे कार्यरत आहे. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात काय करावे, असा प्रश्न भेडसावत असताना माझ्यातील तंत्रस्नेही शिक्षक जागा झाला. माझ्या मनपाच्या विद्यार्थ्यांसाठी मी मोबाइलवर विविध प्रकारच्या चाचण्या, प्रश्नमंजूषा तयार करून शाळेच्या गटावरून पाठवू लागलो. पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. सोबतच रोज तासभर योगासने करू लागलो. दिवसभर काम करण्यासाठी चांगली ऊर्जा मिळू लागली. एका वेगळ्या वैद्यकीय उपचारपद्धतीचा एक ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण के ला. अशा प्रकारे या टाळेबंदीच्या काळात मी नवीन काही तरी शिकलो. तंत्रज्ञानाचा चांगला वापर के ला.

अमुचा बाग किती छान!

दिलीप अहिरे, नाशिक : करोनामुळे संपूर्ण जगभरातील वातावरण भयावह झाले आहे. करोनाला पळवून लावायचे असेल तर घरातच थांबणे आवश्यक असल्याने सर्वानीच घरातून आपली कामे सुरू केली; परंतु ज्यांना अजिबात काम नाही त्यांनी काय करावे? खूपच कं टाळा येत असल्याचे मुले म्हणू लागली. त्यामुळे काही तरी काम करावे म्हणून शोध सुरू झाला. जुन्या तेलाचे प्लास्टिकचे डबे बाहेर काढले. त्यांच्या वरचा भाग कापला. फरशी पुसण्याचे जुने मॉपकाढले. स्वच्छ केले. फर्निचर करताना फेव्हिकोल ज्या डब्यात आणले तेही काढले. सर्वामध्ये माती भरली. आधीच आणून ठेवलेली आणि इतस्तत: लावलेली फुलझाडे या सर्व प्रकारच्या डब्यात लावली. विविध कार्यक्रमांत मिळालेले पुष्पगुच्छ वाळल्यावर खालची प्लास्टिकची डबी काढून ठेवण्याची सवय कामी आली. त्यांचा उपयोग चिमण्यांसह इतर पक्ष्यांना दाणे आणि पाणी भरून ठेवण्यासाठी केला. दिवसभरात चिमण्या येतात. चिवचिव करतात. दाणे टिपतात. पाणी पितात. ते पाहून आनंद वाटतो. घरातील आवारातच सुंदर बगीचा तयार झाला आहे. मुलांना खूप छान वाटले. यामुळे टाकाऊतून टिकाऊ, फुलझाडे, त्यांची नावे, त्यांची उपयुक्तता अशी माहिती सहज अभ्यासता आली. ज्ञानात नक्कीच भर पडली. शिवाय घर आणि परिसर सुशोभित करता आला. आता दररोज मुले पाणी घालतात. झाडांची काळजी घेतात.