करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

अशोक अळवणी, पुणे : करोनामुळे आपली अवघडलेली अवस्था झाली आहे, हे खरेच, पण या काळात काळजी घ्यायची. त्रास करून घ्यायचा नाही. मनोबल वाढवायचे. असे आम्ही उभयतांनी ठरवले होते. आम्ही ज्येष्ठ नागरिक. मी वय वर्षे ७७ तर पत्नी ७०. त्यामुळे विशेष काळजी घेतो. शेजाऱ्यांशी थोडा संवाद, फोनवरील गप्पा यात थोडा वेळ जात होता, पण बराच वेळ उरत होता. आम्हा वृद्धांचा आवडता उद्योग म्हणजे, स्मरणरंजन. त्याचा विचार करताना आठवले की आपल्याकडे अनेक छायाचित्र संग्रह आहेत. त्यांची नीट मांडणी करायची. जवळपास साडेतीन हजार छायाचित्रे आहेत.  लहान-मोठे ऐंशीपेक्षा जास्त अल्बम आहेत. वरच्या फडताळातील अल्बम खाली काढले. धूळ झटकली. कापडाने पुसून काढले. इतके सारे अल्बम, पण एकमेकांत सरमिसळ झाली आहे. विशिष्ट अल्बम शोधावा म्हटले, तर ते सहज शक्य नाही. म्हणून सारे कालानुक्रमे लावले. पुन्हा लक्षात आले की, एखाद्या वर्षांतील ३-४ अल्बम आहेत. शिवाय एकदा कॅमेऱ्यात रोल घातल्यावर ३६- ४० छायाचित्रे निघाली होती. पण त्यांचे प्रसंग निरनिराळे, उद्देश निराळे. तेव्हा आम्ही छायाचित्रांचे वर्गीकरण करायचे ठरवले. कृष्णधवल, रंगीत, निरनिराळ्या प्रसंगांचे, विवाहापूर्व, विवाहोत्तर, कन्येच्या बालपणातील, तिच्या विवाहापूर्वीचे, विवाहानंतरचे, वेगवेगळ्या नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे, नातींच्या जन्माचे, बारशाचे, वाढदिवसांचे. आम्ही बरेच पर्यटनही के लेले आहे. त्याचीही छायाचित्रे होतीच. भारतातील सहली, परदेशातील सहली, जवळच्या, लांबच्या सहली. कौटुंबिक सहली अशा अनेक प्रकारांत वर्गीकरण झाले. नोकरीच्या कार्यकाळात मला परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवले गेले तेव्हाची छायाचित्रे वेगळी काढली. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री अण्णा डांगे यांच्याबरोबरच्या अभ्यासदौऱ्याचे. ग्रामीण भागात पाणीपुरवठाविषयक प्रशिक्षण कार्यक्रमांचे, नोकरीदरम्यान वरिष्ठांच्या भेटींचे, निवृत्तीचे, इ. सर्व छायाचित्रांचे छान वर्गीकरण झाले. काही जुनी छायाचित्रे एकमेकांना चिकटली होती ती सोडविली. काही खराब झाली होती. दुरुस्तीसाठी ती वेगळी करून ठेवली. या साऱ्या उपक्रमात १० दिवस गेले. आता ग्रंथालयाप्रमाणे या अल्बमना क्रमांक द्यायचे आहेत. त्यांची सूची करायची आहे. या अल्बमच्या निमित्ताने साठीशांत, वास्तुशांत, लग्नसोहळे अशा अनेक कार्यक्रमांना आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. नातवंडांच्या बाललीळांचा एक प्रकारे पुन:प्रत्यय या छायाचित्रांनी दिला. पर्यटनातील अनेक सुंदर दृश्यं आठवून मनाला उभारी मिळाली.  एकू ण या उपक्रमात वेळही चांगला गेला आणि करोनाची काळजी, भीती काही काळापुरती का होईना, हद्दपार झाली. हेही नसे थोडके!

बेक करू या के क

युगंधरा वेतकर, डोंबिवली : जागतिकीकरणाचा माझ्यासारख्या गृहिणीला झालेला फायदा म्हणजे खाद्यसंस्कृतीची देवाण-घेवाण. त्यामुळेच मी के क, चॉकलेट्स यांसारखे परदेशी पदार्थ शिकू  शकले आणि माझा एक छोटासा उद्योग उभारू शकले. मी घरच्या घरी के क आणि चॉकलेट करून देते. गेली चार वर्षे हा लघुउद्योग सुरू आहे. करोनामुळे मात्र साऱ्याच समारंभांवर बंदी आणली. ती योग्यच होती पण त्यामुळे माझ्यासारख्या छोटय़ा उद्योजकांवर आर्थिक संकट आले. पण हा काळ लक्षात घेता आर्थिक नफा-तोटय़ाचा हिशोब करण्याची ही वेळ नाही हे मी माझ्या मनाला ठासून सांगितले. पण मार्ग निघतोच. मी राहात असलेले गृहसंकु ल बरेच मोठे आहे. करोनाकाळात सारे जण एकमेकांशी समाजमाध्यमांद्वारे जोडलेले आहोत. ऑनलाइनच संवाद होत असतो. त्यामुळे कोणाकडे वाढदिवस असेल तर ते सगळ्यांना समजतेच. पण या काळात एकत्र यायला बंदी असल्याने प्रत्यक्ष न भेटता शुभेच्छा मात्र फोनवरून दिल्या जातात. मग मी ठरवले की, या काळात मी आमच्या संकु लामधील वाढदिवस असलेल्या घरासाठी कुठलाही नफा न घेता घरी असलेल्या सामानातून केक बनवणार. अर्थात सामाजिक अंतराचे, साथसोवळ्याचे भान राखूनच. हा काळ कठीण आहे हे मान्य, पण अनेक घरांत लहान मुले असतात, त्यांना या साऱ्याची हौस असते. मग या हिरमुसलेल्या पिल्लांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद आणायचा प्रयत्न मी करत आहे. अर्थात सरकारने सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळूनच.

आत्मचि तनाचा काळ

वैभव जरे : करोनाच्या निमित्ताने ही जी सक्तीची सुट्टी मिळाली आहे, ती चांगल्या पद्धतीने घालवण्याचा निश्चय मी के लेला आहे. त्याप्रमाणे दिनचर्याही आखली आहे. या निवांत वेळेचा सदुपयोग मी आत्मशोधासाठी, आत्मचिंतनासाठी, आत्मसंयम वाढवण्यासाठी, आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी करत आहे. सोबतच योगासने, व्यायाम सुरू आहे. देवपूजा-ध्यानधारणाही करतो आहे. घरातील लहान मुलांसोबत बैठे खेळ खेळतो आहे. घरातील व्यक्तींशी संवाद वाढवतो आहे. मित्र-मंडळी, नातेवाईकांना आवर्जून फोन करून त्यांची चौकशी करत आहे. सोबतच वृत्तपत्र आहेच, प्रत्यक्ष नाही पण ऑनलाइन स्वरूपातील वृत्तपत्रांचा लाभ घेतो आहे. समाजमाध्यमांचा वापर करून माहिती मिळवत आहे.

जबाबदारीची जाणीव

नितीन नामदेव राणे, डहाणू : सध्या साऱ्यांनाच घरूनच काम करायचे आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचत आहे. मग मुलांसोबत सामाजिक विषयांवर, ताज्या घडामोडींवर चर्चा करतो. संत चरित्राचे वाचन करतो. शिवाय ‘लोकसत्ता’मधील अनेक सदरांवर चर्चाही करतो आहे.

मुलांना राष्ट्रीयत्वाची, सामाजिक बांधिलकीची ओळख करून देणे, ही महत्त्वाची शिकवण देत आहे. संपूर्ण देश या करोनाच्या प्रभावाखाली असताना जबाबदार  नागरिक म्हणून आपण काय करू शकतो, याचीही मी मुलांसोबत आवर्जून चर्चा केली.

त्यातील काही मुद्दे आमच्या गृहसंकु लाच्या सभेत मांडून काही उपाय योजले आहेत. गृहसंकु लातील कोणीच बाहेर येत नाही, सारे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधतो. करोनाशी लढण्यास आम्ही सारेच अशा प्रकारे सज्ज होत आहोत.

घर हे बंदिशाळा

श्रीपाद कुलकर्णी, पुणे : महाराष्ट्रात संचारबंदी ज्या दिवशी दुपारी लागू झाली तो अर्धा दिवस ऑफिसमध्ये जाऊन आल्यानंतर, मग देशभरातील टाळेबंदी जाहीर होताच घरातच बंदिवान झालो. संचारबंदी जाहीर होताच, गदिमांच्या ‘जग हे बंदिशाळा’च्या चालीवर काही ओळी स्फुरल्या. गदिमांची मनोमन माफी मागून गुणगुणल्याही आणि परिचितांना अग्रेषितही केल्या.

माझा छंद पत्रलेखनाचा अन् कविकल्पनांत रमण्याचा. त्यासाठी वेळ देतादेताच घरातूनच काम आणि घरातले काम करण्याची कसरत चालू केली. ऑफिसचे काम अन् त्याचबरोबर सनदी लेखापाल शिखर संस्थेकडून प्रसारित होणारे ‘वेबिनार’ यांना वेळ द्यायचाच होता. पण  दूध, भाजीपाला, किराणा आणण्यासाठी कुटुंबातील एकानेच जायचे, म्हणजे मीच. घरी मदतनीस ताईला भरपगारी रजा असल्याने, जेवण झाल्यावर स्वत:ची भांडी, तसेच स्वयंपाकात वापरलेल्या भांडय़ांचे वाटप करून पती-पत्नी-कन्या यांनी वाटून घेतली आणि जणू ही भांडी लख्ख करण्याचा विडाच उचलला. तिघांनी वाटून घेतल्याने भांडय़ांचा पसाराही कमी होऊ लागला.  वॉशिंग मशीनचालकाचा किताब मला मिळाला आणि रोजच्या स्वच्छ कपडय़ांचे श्रेय घ्यायला मी मोकळा झालो. पत्नी व कन्येची कपडय़ांनी ओसंडणारी कपाटे, कन्येची पुस्तके , पेपरची रद्दी, पुस्तक मासिकांच्या उतरंडी यांच्या काटेकोर व्यवस्थापनाचे धडे गिरवले गेले. त्यामुळे आपल्याच वस्तू वेळच्या वेळी मिळण्याची खात्री वाटू लागली. बाहेरचे खाणे अजिबातच बंद झाल्याने पोटोबांची कु रकु रही थांबली होती. कन्या अभियांत्रिकीला आहे, पण तिलाही सुट्टी असल्याने तिचे पाककृतींचे प्रयोग सुरु झाले आहेत. मदतीला तिची आई आणि समाजमाध्यमे आहेतच. त्यातही अवघड समजला जाणारा सुरळीच्या वडय़ा हा सगळ्यांच्या आवडीचा आणि अतिशय निगुतीने, नाजूकपणे करायचा पदार्थ. पण लेकीने तो इतका उत्तम बनवला की तिचे फार कौतुक वाटले. दुपारी आंतरजालावर प्रथितयश गायकांचे दिलखुलास गायन, मराठी नाटके  यांचा आस्वाद घेत आहोत.  व्हिडीओ कॉलवरून नातवंडांशी संवाद साधतो. करोनाच्या नकारात्मक बातम्यांपासून जरा दूरच राहतो. पण सरकारने सांगितलेले सर्व नियम मात्र आवर्जून पाळतो.

इच्छा तेथे मार्ग

अशोक घाटे, हैद्राबाद : मी सध्या  ICAR—NAARM, हैद्राबाद या संस्थेत तात्पुरत्या कालावधीसाठी कार्यरत आहे. माझे मूळ गाव परभणीमधील रामपुरी. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मी नोकरीसाठी हैदराबादला आलो. करोनाची ही सक्तीची सुट्टी लागायच्या आधीच माझे वसतिगृहातील मित्र त्यांच्या गावी गेले होते. मग या साथसोवळ्याच्या काळात मी एकटाच असा अडकलेला.  खानावळही बंद होती. करावे तरी काय, नाही नाही ते विचार डोक्यात येऊ लागले. पण तेवढय़ात आई-दादांची आठवण झाली आणि तो विचार सोडला.

जवळ काय साहित्य आहे काय नाही याची खातरजमा केली. एकदा चहा होईल इतके च सामान होते. बाहेर किराणा मालाची दुकाने उघडी होती. पटकन जाऊन गरजेच्या वस्तू घेऊन आलो. पहिले एक-दोन दिवस जमेल तशी भाजी-भात करून खाल्ले. मग नंतर कं टाळा आला. चपाती करण्याचे ठरवले, पण पोळपाट, लाटणे नव्हते. मग शक्कल लढवली. पालथ्या थाळीचे के ले पोळपाट आणि पाइपच्या लहानशा तुकडय़ाचे के ले लाटणे. इतके  झाले पण तवा नव्हता. मग यूटय़ूबला शरण गेलो. तिथे चकोल्यांची पाककृती समजली. आपल्याकडील साधनांचा योग्य वापर करून जेवण बनवण्याचे धडे मिळाले. ते अमलात आणू लागलो आणि पोटाच्या भुके चा  प्रश्न सुटला. पण आता डोक्यालाही खाद्य द्यावे लागणार होते, कारण एकटा बसून करणार काय? मग काही संके तस्थळांवर शोधाशोध के ली. ऑनलाइन अभ्यासवर्गाची शोधाशोध के ली आणि प्रोग्रॅमिंग संदर्भातील एक अभ्यासक्रम निवडून त्याचे धडे घेण्यास सुरुवात के ली. सोबतच नेट परीक्षेची तयारीही करतो आहे. अभ्यास करून कं टाळा आल्यावर छंद आठवले. पुस्तके  वाचायला आवडतात मग ऑनलाइन पुस्तके  वाचली. मला चित्र रेखाटायलाही आवडतात. मग कागद-पेन्सिल घेतला आणि चित्रकलेला सुरुवात के ली. मोबाइलवर आसपासच्या परिसराची वेगवेगळ्या कोनातून छायाचित्रे टिपली. समाजमाध्यमांवर ती शेअर के ली. एकू ण हा सारा वेळ मी जमेल तितका आनंदात घालवण्याचा प्रयत्न करत आहे.

समृद्ध अडगळ

श्रीपाद टेंबे,  पुणे करोनामुळे सारेच घरी बसले. बहुतांश जण आता त्याला कं टाळले आहेत, मी मात्र नाही. दिवाळीमध्ये भरलेल्या पुस्तक प्रदर्शनांतून अनेक पुस्तके  घेतली होती. आज वाचू, उद्या वाचू करत दिवस गेले, महिने गेले परंतु ती पुस्तके वाचायला काही मुहूर्त लागत नव्हता. त्यामुळे ती आणल्यापासून तशीच कपाटात पडून होती. त्यावरची धूळ झटकायची संधी या सक्तीच्या सुट्टीमुळे मिळाली.

गेल्या तीन-चार वर्षांपासून वीज, मोबाइल, गॅस, इत्यादींची देयके कपाटातल्या एका कोपऱ्यात कशी तरी टाकू न दिलेली होती. त्याचा पसारा दिसत होता पण आवरायला वेळ होत नव्हता. त्या पसाऱ्याखाली एखाद्या देवस्थानातून आणलेल्या अंगाऱ्याच्या पुडीचा सुगंधही येत होता. बँकेच्या जुन्या खातेपुस्तिका आणि अनेक गोष्टी त्या पसाऱ्यात पडलेल्या होत्या. हे सगळे आवरून झाल्यावर म्हटले जरा थंड पाणी पिऊ तर फ्रीजच्या दाराची पट्टी काळी पडलेली दिसली. मग त्या सफाईला लागलो. त्यानंतर दिवाण आणि त्यावरील गाद्यांचा नंबर लागला. दिवाणातील सामान आवरताना तर धमालच झाली. इतक्या जुन्या जुन्या वस्तू पाहायला मिळाल्या की त्या स्मरणरंजनात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. एकमेकांना चिकटलेल्या चादरी, उशांच्या खोळी, छत्र्या, रेनकोट, घरात शोधून कधीही न मिळणाऱ्या वस्तू, नातवांचे कपडे, क्रिकेटची बॅट-बॉल, लुडो, सापशिडी, संगीताच्या कॅसेट्स, सीडीज आणि भरीसभर काही जुनी पण मन प्रसन्न करणारी पुस्तके . मनोरंजनाचा अख्खा खजिनाच होता जणू. अक्षरश: स्वर्गसुखाची अनुभूती झाली. ही सगळी कामे के ल्यानंतर जाणवले की,  खरे तर या सगळ्याला किती कमी वेळ लागतो पण आपण मात्र परत कधीतरी करू म्हणत हा, पसारा वाढवून ठेवतो. कामाच्या ठिकाणी सगळी कामे नियोजित वेळीच करतो आणि घरच्या आवश्यक अशा कामांची चालढकल करतो.