करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..  coronafight@expressindia.com

मंजुश्री सुतार, विरार : करोनाकाळात घरात बसून काय करावे, हा प्रश्न प्रत्येकासमोरच आहे. मग टीव्ही, घरकाम, कु टुंबांसोबत गप्पा, मोबाइल, नवे खाद्यपदार्थ बनवणे, खाणे यापलीकडे काय करता येईल, असा विचार करत होते. मग एक वेगळीच कल्पना सुचली, ती म्हणजे सोशल मीडियावरून बालगीतांना उजळणी देता येण्याची. त्यासाठी काही निवडक गाणी शोधली. त्याचे व्हिडीओ करून समाजमाध्यमांवर पोस्ट केले.

या गाण्यांबरोबर थोडासा अभिनयही मी के ला आहे, कारण नुसतीच गाणी वाचायची नव्हती तर त्यावर मुलांनी नाचणे, त्यांना ते आवडणे अपेक्षित होते. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बालक-पालकांचा वेळ छान जावा, आपल्या बालसाहित्याची सर्वानाच पुन्हा ओळख व्हावी, हाच माझा हेतू होता आणि तो साध्य होताना पाहून बरे वाटले.

मन:स्वास्थ्य महत्त्वाचे

अमृता आर्ते, ठाणे : खरे तर आपण सारे कायम सुट्टीची वाट पाहात असतो. एखाद्या सणा-समारंभाला जोडून सुट्टय़ा येतायत का, याची आतुरतेने वाट पाहात असतो. त्या सुट्टीमुळे छान ताजेतवाने होऊन नव्या दमाने धावपळ करायला सज्ज होतो. पण जेव्हा हीच सुट्टी संपायचे नाव घेत नाही, तेव्हा मात्र सारेच कं टाळतात. आमच्याकडेही असेच झाले. करोनामुळे घरात बंदिस्त झाल्याने सगळेच कं टाळले. मुलीही घरीच. मग काय टीव्ही, लॅपटॉप, मोबाइल चालूच. खायचे आणि झोपायचे.

कंटाळा आला असे म्हणत या खोलीतून त्या खोलीत फिरणाऱ्या मुलींना कशात तरी गुंतवायला हवे, हे लक्षात घेऊन मी त्यांच्या कलेकलेने कामाला लावले. यूटय़ूब पाहून फुले बनव, फोटो कोलाज करावे, कधी एखादी पाककृती बघून ती करायची तर कधी आपल्याच पाककृतीचा यूटय़ूब स्टाइलने व्हिडीओ बनवायचा. थोडीथोडी साफसफाई के ली. कपाटातले जुने अल्बम काढले. हा बघ कसा दिसतोय, ती ताई बघ.. अशा गप्पा रंगू लागल्या. फोटो चाळता चाळता जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर काही नाती नव्याने उमगली.

ठाणे येथे माझे उपाहारगृह आहे. तिथे माझ्या हाताखाली सहा महिला आहेत. ज्या आपापले संसार, मुले, त्यांच्या शाळा, अभ्यास सगळे सांभाळत दिवसभर पोटापाण्यासाठी झटत असतात. दिवसभर ग्राहकांची गर्दी असली तरी मनाला एक समाधान असते, हाताला काम असते, बोलायला एकमेकींची संगत असते आणि महिनाअखेरीस येणाऱ्या पगारामध्ये नवीन स्वप्नांची आस असते. या टाळेबंदीमुळे आम्ही एकमेकींपासून दूर आहोत, पण मनाने एकत्र आहोत. मोबाइलवर वेगवेगळ्या अ‍ॅप्सची त्यांना ओळख करून दिली. त्या माध्यमातून आमच्या गप्पा सुरू झाल्या. मग उपाहारगृहाची सुरक्षितता, स्वच्छता, आग लागली तर घ्यायची काळजी अशा अनेक गोष्टींची आम्ही नव्याने ओळख करून घेतली. त्यावर एकमेकींशी बोललो. काहीवेळा एकमेकींना नव्या पाककृती दाखवतो. खेळ खेळतो. त्यांचे मन:स्वास्थ्य या माध्यमातून टिकू न राहते आणि माझेही.

टाळेबंदीचा अनुभव

डॉ. योगिता नाईक, कोल्हापूर.: मी डॉक्टर आहे, कोल्हापुरातील एका खासगी आरोग्य के ंद्रात काम करते. पहाटे उठून फे रफटका, मग योगासने, सर्व आवरून नंतर कामाच्या ठिकाणी पोहोचायचे असे नेहमीचे ठरलेले वेळापत्रक होते. करोनाचे संकट जगावर आलेले असताना त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून वाचत होते, पाहात होते पण हे संकट भारतात आलेले कळताच मात्र हादरून गेले. यासाठी काही नेमके औषध, लस नाही हेसुद्धा लक्षात आले. मग टाळेबंदीनंतर सारेच बंद झाले, परंतु मी डॉक्टर असल्याने मला कामाला जावेच लागणार होते, एक दिवस सुट्टी आणि एक दिवस डय़ुटी असे ठरले. या संधीचे सोने करायचे असे मी ठरवले. मग नेहमीचा फे रफटका गच्चीवर करू लागले. योगासने, प्राणायाम सारे सुरू होते. दिवसाचे नियोजनही आखले. दररोज मी एका नातेवाईकाला फोन करते, त्यांच्या घरची ख्यालीखुशाली विचारणे, त्यानंतर स्वयंपाकघरात छानसा पदार्थ करणे, ग्रंथवाचन करणे सुरू आहे.  मी योग विषयात पदविका घेतली आहे, त्यामुळे अनेक मैत्रिणींना ऑनलाइन मार्गदर्शन करते.  चित्रकलेच्या छंदाला आता वेळ देत आहे. करोनासंबंधी सर्व माहिती जमा करत आहे. करोनाने आपल्याला स्वच्छतेचा मोठा धडा घालून दिला आहे.  करोना गेल्यानंतरही त्या नियमांचे पालन के ले तर कदाचित पुन्हा एखादा नवीन करोना आला तरी आपण त्याला दूर पळवून लावू शकतो.

इतिहासाचा छंद

अक्षय सतीश भूमकर, पंढरपूर  : मी पुण्यात एका खासगी कंपनीत काम करतो. टाळेबंदीच्या काळात मात्र गावी आलो आहे. इथे वेळच वेळ आहे. आपल्या देशाला लाभलेला इतिहास जेवढा समजून घेऊ तेवढा कमीच आहे, परंतु मला लहानपणापासून या विषयात रुची आहे. त्यामुळे इतिहासविषयक बरेच साहित्य वाचत आहे. स्वातंत्र्यलढय़ातील भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, लाल लजपतराय अशा अनेक नेत्यांविषयी माहिती गोळा करत आहे. सोबतच भारतीय स्वातंत्र्यलढय़ाविषयीचे दृक्श्राव्य माध्यमातील माहितीपट, ऑडिओ बुक, इतिहासकारांची व्याख्याने सोबतच घरातही काही पुस्तके  आहेत, ती वाचतो आहे. या सगळ्या माध्यमातून या स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांविषयी, क्रांतिकारकांविषयी वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो. आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे, त्यामागे या माणसांचा त्याग आहे, ही जाणीव मनात जागृत होते आहे.  मला पर्यटनही विशेष आवडते. मग घरात बसूनच आंतरजालाद्वारे जगभ्रमंती करण्याची हौस पूर्ण करत आहे. एकू णच करोनाच्या या कठीण काळात घाबरून न जाता पुरेशी काळजी घेऊन हा काळ घालवत आहे.

लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती

आशीष निनगुरकर, वांबोरी, ता. राहुरी : करोना विषाणूमुळे सध्या भीषण परिस्थिती उद्भवली आहे. संपूर्ण देश बंद आहे. अशा वेळी घरात राहून काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. मी सध्या माझ्या गावी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आहे. गेल्या ११ वर्षांपासून मी मुंबईत डाक विभागात घाटकोपर येथे सेवेत आहे. गीतलेखन, कथालेखन ही माझी आवड आहे.  चित्रपटनिर्मितीचीही आवड आणि हौस आहे. सामाजिक प्रश्नांविषयी विशेष जिव्हाळा असल्याने यापूर्वी मी  ‘रायरंद’ या चित्रपटातून बहुरूपी व बालमजुरांची व्यथा तर ‘एक होतं पाणी’ या चित्रपटातून ग्रामीण भागातील पाण्याबद्दलचे दाहक वास्तव मांडले होते. काही लघुपट आणि माहितीपटही मी करत असतो. अनेक चित्रपट महोत्सवांमध्येही मी सहभाग घेतो.

महिनाभर घरीच असल्याने मला एक छान कल्पना सुचली. सरकारने आपल्या सर्वाना बरेच नियम घालून दिले आहेत, पण आपण ते पाळतोच असे नाही. हे नियम न पाळल्यास काय होऊ शकते, ते एका लघुपटाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय मी घेतला.  मोबाइलचा कॅ मेरा, घराचे लोके शन आणि कुटुंबीयांनाच कलाकार बनवत मी हा लघुपट पूर्ण के ला, अगदी घरातल्या घरात. मी या लघुपटाची कल्पना घरात ऐकवली आणि अवघ्या एक दिवसात ‘नियम’ नावाचा आमचा लघुपट तयार झाला. घरच्यांनी तो पाहिल्यावर त्यांच्याही डोळ्यांत पाणी आले आणि माझ्याही. हा लघुपट आम्ही घरातल्या घरातच चित्रित के ला आहे, त्यासाठी कु णीही घराबाहेर पडलेले नाही. त्यामुळे एकत्र येण्याची नको घाई, पुन्हा हा जन्म नाही.. असे म्हणत एक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही के ला आहे.

पत्रास कारण की..

डॉ. रवींद्र मुंजे, नाशिक : मी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवतो. गेली १३—१४ वर्षे शिक्षकी पेशात आहे. आतापर्यंत बरेचसे विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले. जेव्हा एखादा जुना विद्यार्थी मला फोन करतो, तेव्हा मला खूप आनंद होतो.  त्यामुळे मीही ठरवले, करोनाच्या या टाळेबंदीच्या काळात मी माझ्या पहिलीपासून पीएचडीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना, तसेच जीवनात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या गुरूंना सविस्तर पत्र लिहिणार, त्यांनी माझ्यावर जे संस्कार के ले, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे हे पत्र असेल. अर्थात ही सारी पत्रे व्हॉट्सअ‍ॅपवर लिहिली होती. त्यामध्ये या गुरुजनांच्या तब्येतीची विचारपूस होती, काळजी होती. ही पत्रे लिहिताना फार छान वाटले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हे के ल्यानंतर काही जणांनी माझ्या या पत्रसंदेशाला उत्तरेही दिली. काही जणांनी फोन के ले. अक्षरश: डोळ्यात आनंदाश्रू आले. गुरुजनांचे असे आशीर्वाद मिळाले, त्यामुळे मानसिक समाधान मिळाले. गुरुजनांना संदेश पाठवण्यासह मी माझ्या विद्यार्थ्यांनाही समाजमाध्यमांवरून वैयक्तिक संदेश पाठवतो आहे. रोज १० विद्यार्थ्यांची विचारपूस करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आपल्या शिक्षकांनी इतक्या वर्षांनंतर पाठवलेला हा संदेश पाहून विद्यार्थीही हरखून गेले होते. त्यातील अनेकांनी संदेश पाठवून माझे आभार मानले. या देवाणघेवाणीतून छान संवाद झाला तसेच यातील अनेक माजी विद्यार्थी सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठीही तयार आहेत. करोनाचे संकट टळल्यानंतर या संधीचा आम्ही सारेच शैक्षणिक प्रगतीसाठी या उपक्रमाचा फायदा करून घेऊ.