करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

सुभाष पुरोहित, पुणे :आयुष्यात ठरवलेली एखादी संकल्पना पूर्ण करता आली की, त्याचा आनंद अपूर्वच. माझे तसेच झाले. बऱ्याच दिवसांपासून फुलपाखरांची पैदास करण्याचे मनात होते. त्या दृष्टीने पूर्वतयारीही चालू होती. कॉमन मॉरमॉन जातीच्या फुलपाखरासाठी कढीपत्त्याचे रोपही तयार ठेवले होते. त्याची कु ंडी उघडय़ावर ठेवून वाट पाहत होतो आणि नुकताच तो अविस्मरणीय अनुभव आला. या फुलपाखराने या झाडावर अगदी बारीक पिवळ्या रंगाची अंडी माझ्या डोळ्यादेखतच घातली. नुकत्याच त्यातून अळ्या बाहेर आल्या आहेत. आता बुलबुल पक्ष्यापासून त्यांच्या संरक्षणासाठी बाल्कनीची जागा पडद्यांनी पूर्ण झाकून टाकली आहे.  रोजच त्यांच्या हालचाली पाहत राहताना वेळ कसा जातो तेच समजत नाही. हा संपूर्ण महिना आता या निसर्गाच्या अदभुत निर्मितीचा अनुभव घेत जाणार आहे.  कारण या फुलपाखरांचे जीवनचक्र पूर्ण एक महिन्याचे. या अळ्या मोठय़ा होतील, आठ दिवसांनी त्यांचे कोष होतील आणि त्यानंतर त्यातून अतिशय सुंदर फुलपाखरू (सोबतच्या छायाचित्रात दिसते तसे) जन्म घेईल. हा एक जन्मभर आठवावा असा ठेवा असणार आहे. निसर्ग म्हणजे नितांत आनंदाचा खजिना. त्यातून असे काही क्षण मिळवणे आपल्याच हातात असते. करोनामुळे मिळालेली संधी सार्थकी लागली असे वाटते. यापुढे फुलपाखरांच्या जगात स्वत:ला हरवून जाताना, त्यांच्या जीवनचक्रात सामावून जाताना कमालीचा आनंद अनुभवता येणार आहे. आपणापैकी कोणीही असा आनंद अनभवू शकेल.  फुलपाखरांच्या, पशुपक्ष्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करणे, किमान त्यांना त्रास न देता त्यांचे निरीक्षण  करणे, यात अवघड काहीच नाही. सध्या घरबसल्या ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने ते करावे, असा सल्ला मी देईन. त्यातून मिळेल तो आनंदच!

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान

सर्वेत्र सुखिन: संतु

सुनीता शेजवलकर, ठाणे : परवा मैत्रिणीचा फोन आला होता तेव्हा दोघीजणी रोजचा दिवस कसा घालवतो यावर गप्पा झाल्या. त्या फोननंतर तिच्या ‘रांधा—वाढा—उष्टी काढा’ या दिनक्रमापेक्षा मी अधिक काही करतेय याची जाणीव मात्र मला झाली. मग सुसंगतपणे ते लिहायचे ठरवले. फेब्रुवारीपर्यंत घाईगडबडीचे असणारे आयुष्य अचानक ब्रेक लागल्यासारखे थांबले. निवांतपणा आला आणि तोच सुरूवातीला त्रासदायक वाटू लागला.थोडे भांबावल्यासारखे झाल. कारण आजवर सतत आजूबाजूला माणस असण्याची सवय होती.पण दुसऱ्या आठवडय़ापासून त्याचाही सराव होतो आहे.

यजमान दंतवैद्य असल्याने त्यांचे काम चालूच आहे. माझ्या हाती पूर्ण दिवस मोकळा राहतो.आता कुठे बाहेर जायची घाई नसल्याने घरकामात अधिक लक्ष घातले जाऊ लागले शिवाय घरकामासाठीची मदतनीस मुलगी येत नसल्याने एकमार्गी काम सुरू झाले. आता वयोमानानुसार जमेल झेपेल तसे करायचे ठरवले, उदा. आजवर आवरायचे राहिलेले खण.कपाट. भांडी घासताना अधिक नेटकेपणाने घासल्यामुळे कढया, तवे चमकायला लागले.  कपडेसुध्दा हाताने घासून मशीनमधे टाकल्याने जरा अधिकच स्वच्छ वाटताहेत(निदान मला तरी वाटत आहेत.) शिवाय आजकाल बाहेरचे पदार्थ न आणता घरातच २ पदार्थ जास्तीचे केले जात आहेत. स्वत:च्या हातानी केल्याच्या समाधानामुळे त्यांची चव अधिक वाढते. एरवीच्या जप, व्यायाम, वाचनाच्या परिपाठाशिवाय संध्याकाळी आमच्या वाचक मैत्रिणींच्या ग्रुपमधल्या सख्या ठराविक दिवशी,ठराविक वेळी फोनवरून एकमेकींशी बोलतो. कुणी नवीन काय वाचले ते सांगून त्यावरची एकमेकींची मते जाणून घेतो. आपसात नवनवीन कोडी तयार करतो.नंतर ती सोडवतो इतर ग्रुप्सना पाठवतो. यातही वेळ छान जातो. महत्वाचे म्हणजे डोक्याला काहीतरी सकस खाद्य मिळाल्याचा आनंद मिळतो. याशिवाय मला मण्यांच्या आणि क्विलिंगच्या  वस्तू कानातले डूल करायचा छंद होता त्याच्याकडे पुन्हा वळले आहे.

रोज यापैकी एखादीतरी वस्तू हातून साकारायचीच असे ठरवून पूर्णही करते. त्यामुळे आता माझ्याकडे बऱ्याच वस्तू.डूल तयार झाले आहेत. लहानपणापासून अध्यात्माकडे कल असल्याने पाडव्यापासून रामनवमीपर्यंत नवरात्र बसतात तेव्हा यावेळी दिवसातून ३ वेळा रामरक्षा अतिशय भक्तिभावाने म्हटली होती. आता ३ वेळा का.?.तर आधिदैविक—आधिभौतिक आणि अध्यात्मिक अशा तिन्ही स्तरावर सर्वाचा विकास व्हावा जगावरचे संकट दूर व्हावे. जिथे सुरूवात आहे तिथे शेवट असणारच तेव्हा या संकटाचाही शेवट लवकरच होईल ही खात्री बाळगून नियमित प्रार्थना करत उद्याच्या दिवसाची उमेदीने वाट पाहते.

सर्वेत्र सुखिन: संतु

आईला मदत करतो

अंकुश गाढवे, राक्षसवाडी बु., ता.कर्जत (अहमदनगर) : मी पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. अभ्यासही व्यवस्थित चालला होता. पण अचानक लोकसत्ता वाचताना बातमी दिसली, ‘पुण्यात करोनाचे २ नवे रुग्ण’  टीव्हीवर घरच्या मंडळींनीही ती बातमी बघितली आणि मला घरून फोन यायला लागले ‘तू पटकन घरी ये’ मग मीही घरी आलो. त्यानंतर काहीच दिवसांत मा. पंतप्रधानांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला. आता घरातच थांबण्याशिवाय पर्याय नव्हता आणि घरी पुस्तके ही थोडीच घेऊन आलो असल्यामुळे वाचनाशिवाय काय करावे म्हणून घराची स्वच्छता करणे, फरशी पुसणे, जुन्या पाण्याच्या बाटल्या कापून त्यात छोटी छोटी  झाडे लावणे ही कामे सुरू केली.

मला स्वयंपाकाचीही आवड असल्याने आईलाही घरकामात मदत करतो. यंदा मी तिच्यासोबत पापड, कु रडय़ा, शेवया, पापड  बनवल्या. फावल्या वेळात आमच्या बागेत फे रफटका मारतो. येताना पपई, चिकू, द्राक्षे घरी घेऊन येतो. आजीआजोबांसोबत छान गप्पा होतात. सोबतीला लोकसत्ता असतोच. टीव्हीही आहेच. अशा प्रकारे या संचारबंदीच्या, टाळेबंदीच्या काळात आम्ही सारेजण घरा, आवारातून बाहेर न जाता आपली आणि आपल्या कु टुंबीयांची काळजी घेत आहोत.

टाळेबंदी नव्हे, संधी

डॉ. नीलिमा कुलकर्णी : करोनाच्या संकटातून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सकारात्मकतेने त्याचा सामना करणे आणि मुख्य म्हणजे सामाजिक अंतर, साथसोवळे राखणे. मी एक निवृत्त शिक्षिका. गेली ५ वर्षे निवृत्तीचे आयुष्य जगते. घरात आम्ही दोघे. निवृत्तीचे असले तरीही आयुष्याला एक नियम होता. या टाळेबंदीच्या काळात कॅ रम, पत्ते खेळतोय, छान गाणी ऐकतोय, उत्कृष्ट वक्त्यांची भाषणे ऐकतोय, चांगली नाटके आणि सिनेमे पाहतोय, छान निवांत गप्पा मारतोय आणि लांब असलेल्या मुलांची काळजी करतो आहे. एरवी माझ्या दिनक्रमात लिखाण करणे, पर्यावरणासाठी काम करणे, नियमित व्यायाम, शाळा, महाविद्यालयात जाऊन पर्यावरणविषयक व्याख्याने  देणे, रोजचा फे रफटका, भेटीगाठी, बाजारहाट यांचा समावेश असतो. सध्या मात्र ते सगळे बंद आहे. या टाळेबंदीच्या काळात स्वत:कडे तटस्थ पाहायला शिकत आहे. ही जाणीव वेगळीच आहे.

आपल्याप्रमाणेच घरात कै द झालेल्या इतरांचे आयुष्य, त्यातील समस्या, जीवावर उदार होऊन जगणारी कष्टकरी माणसे, प्रत्येकाची जगण्याची धडपड हे सगळे पाहताना मी होते, त्यापेक्षा अधिक संवेदनशील झालेय. त्याबरोबरच मला अजून कितीतरी गोष्टी करता येतील याची जाणीव झाली आहे. सध्या मी काही मागे पडलेल्या आणि माझ्यासाठी नवीन असलेल्या अशा अनेक गोष्टी करण्याच्या प्रयत्नात आहे. चांगली पुस्तके  वाचते आहे, सुंदर सूर ऐकतेय. अनेकांबरोबर कित्येक दिवसापासून साचलेल्या गप्पा मारते आहे, घरातली रोजची कामे, आवराआवरी, बरेच दिवस राहिलेली कपडय़ांची डागडुजी करत अधूनमधून वृत्तवाहिनीवरील बातम्या बघत आहे. बाहेर जाता आले नाही नाही तरी घरातल्या घरात जमेल तो आवश्यक व्यायामही सुरू आहे. माझ्या विषयावरील विविध विद्यापीठांचे अभ्यासक्रम पाहून, त्यांचा आढावा घेऊन काही टिपणे तयार करत आहे, हे काम बरेच दिवस करेन असे म्हणत होते, पण वेळ होत नव्हता. तो सध्या छान मिळत आहे. या कामाच्या आधारे प्रश्नावलीही तयार के ली आहे. हे सगळे माझ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल, अशी अपेक्षा आहे. याबरोबरच समाजमाध्यमात वावरण्यासाठी सज्ज होते आहे. म्हणजे असे की, यूटय़ूबवर आपले म्हणणे अपलोड कसे करायचे त्याचे फोनवरूनच शिक्षण घेते आहे. या सगळ्या गोष्टी एकाच वेळी आव्हानात्मक आणि मजेदारही आहेत. गाणी ऐकता ऐकता ती ध्वनिमुद्रित करण्याचीही गंमत करून पाहत आहे.  या टाळेबंदीच्या निमित्ताने मी ऑनलाइन बँके चे व्यवहार करायलाही शिकले आहे. हे सगळे मला करावेसे वाटत आहे, ते सहज जमतही आहे, या साऱ्याची मला गंमतच वाटत आहे. आणखीन एक गोष्ट करायचा मानस आहे. विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांचे ग्रंथ वाचायला सुरुवात करायची आहे, अगदी नियमितपणे. हा सक्तीचा निवांतपणा, सगळ्यांनाच अंतर्मुख करतोय, नवीन दृष्टी देतो आहे असे वाटत आहे.

ग्रंथ माझे सोबती

अस्मिता येंडे, ठाणे : लहानपणापासून वाचनाची आवड असल्यामुळे साहजिकच पुस्तकांची ओढ आहे. माझ्या संग्रहात अनेक पुस्तके  आहेत. पण त्यातील अनेक पुस्तके  वाचली गेली नव्हती. ती संधी या टाळेबंदीने मला दिली. वर्तमानपत्रे प्रत्यक्ष येत नव्हती परंतु ई-आवृत्त्या उपलब्ध होत्या. त्यामुळे वृत्तपत्रवाचनामध्ये खंड पडत नव्हता. लोकसत्ताच्या पुरवण्याही या काळात महत्त्वाचे बौद्धिक खाद्य ठरल्या. याआधी मी काम आणि अभ्यास सांभाळून लेखन करत होते. मी विविध लेख, पुस्तक समीक्षण लिहिते. सध्या घरीच असल्याने मला माझ्या स्वतंत्र लिखाणासाठी मला वेळ मिळतो आहे. काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह असे अनेक साहित्यप्रकार वाचण्यासाठी वेळ मिळतो आहे. मी मुद्रितशोधक असल्याने विविध लिखाणांचे मुद्रितशोधन करण्यात वेळही छान जातो. मी एका संस्थेतर्फे  ऑनलाइन व्हॉट्सअ‍ॅप स्पर्धाही आयोजित के ली, ५ दिवस ऑनलाइन पुस्तक प्रदर्शनाचा उपक्रम राबवला. ऑनलाइन कथा-कथन के ले. या साऱ्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मलाही काही वेगळे के ल्याचे समाधान मिळाले. घरात मी आणि आजी राहत असल्याने तिच्याकडून बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात. कधी नव्हे ते स्वयंपाकघरात थोडे काम करू लागले आहे. कामात व्यस्त असल्याने ज्यांच्याशी बोलणे राहून गेले होते, त्यांच्याशी मुद्दाम फोनद्वारे संवाद करण्याचा प्रयत्न करते आहे. छान छान मराठी चित्रपट पाहते, जुनी, नवी गाणी ऐकते. या टाळेबंदीमुळे खरोखरच असाध्य गोष्टी साध्य होत आहेत, म्हणूनच घरात राहू आणि करोनाला हरवू या. ही टाळेबंदी खऱ्या अर्थाने सत्कारणी लावू या.

कवितावाचनाचा छंद

तुषार पाटील- निंभोरेकर (जि. जळगाव) : सध्या करोना विषाणूचे खूप मोठे सावट जगावर आहे. संपूर्ण देश बंद असल्याने घर हेच जग झाले आहे. या धावपळीच्या काळात पहिल्यांदाच इतका निवांतपणा अनुभवतो आहे. आपल्या आवडीनिवडींना महत्त्व देता येत आहे. मी माझ्या आवडीची पुस्तके  वाचत आहे. त्यात नव्वदोत्तर कालखंडातील महत्त्वाच्या वाटणाऱ्या आणि आशावादी असलेल्या कवींच्या कविता, परिवर्तनवादी तसेच वास्तव मांडणाऱ्या कथा—कादंबऱ्या अशा पुस्तकांचा समावेश आहे. कविता हा माझा नेहमीच आवडता आणि जिव्हाळ्याचा प्रांत असल्यामुळे सध्या आवडत्या कवींच्या खूप चांगल्या-चांगल्या कवींच्या कविता वाचतो आहे. अलीकडेच खरेदी केलेली अनेक पुस्तके, दिवाळी अंक हे सारे वाचण्यासाठी चांगला वेळ मिळतो आहे. परीक्षा पुढे गेली असल्याने अभ्यास आहेच. साहित्याच्या अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असल्यामुळे अभ्यासक्रमाला लावलेली विभावरी शिरूरकर यांच्या ‘बळी’, ‘शबरी’ या कादंबऱ्या, ‘कळ्यांचे नि:श्वास’ हा कथासंग्रह तसेच लावणी—पोवाडे, वाङ्मयाच्या कालखंडाचा अभ्यास, भाषाविज्ञानसारखी अनेक अभ्यासक्रमातील पुस्तके ही वाचतो आहे. सोबतीला जुनी गाणी आहेतच. मला तीच जास्त आवडतात. आमच्या अहिराणी बोलीतील पारंपरिक कहाण्या मांडणारे चित्रपटही पाहतो आहे. सध्या प्रवास थांबला आहे पण मी नाही. आंतरजालावर आवडत्या ठिकाणांची माहिती शोधून तेथील इतिहास, भूगोल समजून घेतोय, छायाचित्र पाहतो आहे. न पाहिलेल्या ठिकाणांची यादी करतो आहे, जी आगामी काळात पाहायची आहेत.