करोना संकटामुळे कधी नव्हे ते घरातील तिन्ही पिढय़ा एकत्र आल्या आहेत. या उदासीन आणि भयप्रद वातावरणाला सामोरे जाताना आशावाद निर्माण करणारे काही मार्ग कोणी शोधून काढले असतील, काही अभिनव उपक्रमाद्वारे घरातील सर्वच व्यक्तींचा वेळ सत्कारणी आणि अर्थपूर्ण बनविला असेल तर वाचकांनी आपले सकारात्मक अनुभव लिहून पाठवावेत असे आवाहन ‘लोकसत्ता’ने केले होते. त्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातील काही निवडक अनुभव..

मंगेश दाढे, नागपूर

हल्ली कु टुंबातील सारेच जण काही ना काही व्यापात, कामात असतात. आपण सारे ‘एकत्र राहतो’ पण ‘एकमेकांसोबत खऱ्या अर्थाने जगतो’ की नाही, याचा मात्र विचारच होत नाही. या करोनाच्या सक्तीच्या सुट्टय़ांमुळे मात्र अनेक घराघरांत अशी वेळ आली आहे.

आम्ही नागपुरातील  दिघोरी भागात राहतो. इथे मोकळा परिसरही बराच आहे. माझे आई-वडील घरीच असतात, तर बहीण, पत्नी आणि मी वेगवेगळ्या जिल्ह्य़ांत नोकरी करतो. के वळ सण-उत्सवाच्या काळातच सारे घरी एकत्र असतो. करोनाच्या काळात मात्र एकत्र येण्याचा हा दुर्लभ योग आला आहे. या वेळात आम्ही अनेक छान छान नवनवे उद्योग शोधून काढले आहेत. बागकाम करणे, खेळ खेळणे, निरनिराळे पदार्थ तयार करणे इ. स्वयंपाकघरात नवनवे पदार्थ बनत असतात. तांदूळ, हरभरा, मूग, उडीद अशा निरनिराळ्या डाळी घालून के लेले अप्पे इ., तर बागकामाची जबाबदारीही प्रत्येकाने घेतली आहे. बागेच्या साफसफाईची जबाबदारी आमची तर कोणती कु ंडी कोणत्या कोपऱ्यात ठेवावी, याचे मार्गदर्शन आमची आई करते.

बरेचदा सारे जण मिळून बागेतच जेवतो. अंताक्षरी वगैरे खेळतो. सामाजिक अंतर राखण्याच्या आणि विलगीकरणाच्या नियमांचे पालन आम्ही सारे फार मनापासून करतो. सरकारच्या सर्व सूचना पाळतो. स्वच्छता राखतो. सायंकाळी एकत्र येऊन सारे जगच करोनामुक्त होण्यासाठी प्रार्थना करतो. शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही साऱ्यांनी आपापले भ्रमणदूरध्वनी अर्थात मोबाइल मात्र कटाक्षाने दूर ठेवलेले आहेत.

लिखाणाचा छंद

हर्षल सुरेश देसले : अभियांत्रिकीच्या पदवीनंतर मी स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले आणि गेले आठ महिने त्याचाच अभ्यास करत आहे. पुण्यात माझ्यासारखे अनेकजण आहेत. अभ्यासाच्या या धामधुमीत कु टुंब, कला यांना पुरेसा वेळ देता आला नाही. या लॉकडाऊनच्या काळात मात्र आता ते सारे करण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या परीक्षाही करोनामुळे पुढे गेलेल्या आहेत. त्यामुळे थोडा निवांत आहे. लिहायला मला आवडते. त्यामुळे मराठी, इंग्रजी लिखाण करत आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमांची माहिती घेऊन त्यातील काही अभ्यासक्रमही करत आहे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमातून वेगळेपणाही मिळतो आहे, शिवाय यातील अनेक अभ्यासक्रम भविष्यात उपयोगी पडतील, असे आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निरनिराळ्या क्षेत्रांतील मित्रांशी, यशस्वी व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या क्षेत्रांविषयी माहिती घेत आहे. सोबतच वेब मालिका, चित्रपट सुरूच आहे. एकू णच काही ना काही करून जगाशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहे, कारण करोना संपल्यावर या जगात आपले स्थान मिळवण्यासाठी दुप्पट प्रयत्नांनी सज्ज व्हायचे आहे.

बॅडमिंटनचे सामने

यशवंत  शेटय़े, खोली, म्हापसा (गोवा) : एखाद्या टोळधाडीसारखा हा करोना आला आणि आपल्या साऱ्यांचे बाहेर जाणे बंद करून टाकले. करोनाने आखून दिलेली ही लक्ष्मणरेषा ओलांडण्याची कोणाचीच हिंमत नाही. आम्ही सारेही घरातच असल्याने मग काही काही उपक्रम सुरू के ले. पहिले म्हणजे सर्वानी व्यायामाला सुरुवात के ली. जोरबैठका-सूर्यनमस्कार सुरू झाले. चहा-नाश्ता-स्वयंपाक यात गृहस्वामिनीला मदत करू लागलो. सोबत धुणीभांडी, लादी पुसणे या कामांचीही वाटणी झाली आहे. कपडे वाळत टाकणे, ते सुकल्यावर घडय़ा करणे. साऱ्या कामांची वाटणी झाली आहे. चार वाजताचा दुपारचा चहा मात्र मीच बनवतो आणि हॉटेलसारखा प्रत्येकाला छान ट्रेमधून नेऊनही देतो. तेवढीच गंमत.

आमचे घर मोठे आहे आणि अंगणही. चार भाऊ मिळून राहतो. स्वयंपाकघरे वेगळी असली तरी मने एकत्रच आहेत. सारे अंगणात रोज बॅडमिंटन खेळतो. सामने रंगतात. सारे मिळून पत्ते कु टतो, अंताक्षरी खेळतो. गाणी म्हणतो. गॅलरीतल्या झोपाळ्यावर सारे झोके  घेतो. दिवेलागणीला नियमित प्रार्थना, करुणाष्टके , मनाचे श्लोक म्हटले जातात. मग अवांतर गप्पा, जेवणे, टीव्ही यात रात्र होते. रामायण, महाभारत आणि शाहरुखची सर्कस मालिकाही आवर्जून बघतो. या सगळ्यासोबत खाण्यापिण्याचीही विशेष काळजी घेतो.  रोज सारे सकाळी भिजवलेले बदाम खातो. दुपारी बारा वाजता लिंबू सरबत आणि रात्री गायीचे धारोष्ण दूध घेतो. करोनाच्या या संकटाला परतवून लावण्यासाठी सारेच जण आपापल्यापरीने प्रयत्न करत आहोत.

स्वयंशिस्तीचे महत्त्व

अनंत बोरसे, शहापूर (ठाणे) : आम्हा वयोवृद्धांचा, ज्येष्ठ नागरिकांचा सारा दिनक्रमच या करोनाने बिघडवून टाकला. पूर्वी सकाळ-संध्याकाळ फे रफटका होत असे. इतर समवयस्कांशी गप्पा होत. आता मात्र सारे घरातच बंदिस्त. पण आम्ही कं टाळलेलो नाही. ईपेपर, समाजमाध्यमांवरील लेख वाचतो. साफसफाई करतो. त्यात वेळही छान जातो नि जरा शरीरालाही हालचाल होते. या आपत्तीतही काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. उदा. सारे कु टुंबीय एकत्र येत आहेत. सुखसंवाद घडत आहेत.  स्वयंशिस्तीची, स्वयंस्वच्छतेची ओळख हळूहळू जनतेला पटत आहे. पण प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली तर करोनाला दूर पळवून लावणे काही कठीण नाही.

ई-आवृत्तीने तारले

मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली  : ‘लोकसत्ता’ आमचे आवडते वृत्तपत्र. त्यातील करोनाविषयक बातम्या वाचत होतो. काहीतरी अघटित घडते आहे, हे जाणवतही होते पण भारतावर हे संकट इतके  गहिरे होईल, याची कल्पना कु णालाच नव्हती. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर मात्र साऱ्यांनाच याचे महत्त्व लक्षात आले. मी बँके त काम करतो. त्यामुळे मला कामावर जावे लागत होते, परंतु वेळ कमी झाली होती. आता मिळालेल्या वेळेचे करायचे काय, याचा विचार सुरू होता. ‘लोकसत्ता’ सोबत असेलच ही खात्री होती. पण आमच्या इथे वितरणच बंद असल्याने वृत्तपत्र  प्रत्यक्ष हाती येत नव्हते. त्यामुळे खरे तर सैरभैर झालो. घरी येऊन मोबाइलवर पाहिले तर लक्षात आले की, ‘लोकसत्ता’ची ई-आवृत्ती सुरू असल्याचे कळले. जीव भांडय़ात पडला. ‘लोकसत्ता’च्या पुरवण्या चतुरंग, लोकरंग, संपादकीय पान या गोष्टी वाचायला मिळाल्यावर बरे वाटले. आता रोज सकाळचा वेळ नेहमीप्रमाणे लोकसत्तावाचनात, पत्रलेखनात जातो. ई-आवृत्ती वाचताना सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण आता मात्र सरावलो आहे. देशावरचे हे करोनासंकट लवकरच दूर होवो आणि नेहमीप्रमाणे ‘लोकसत्ता’ हाती घेऊन वाचण्याचा आनंद मिळो!

स्वच्छतेचा वसा

कविता पाटणकर : करोनाच्या विषाणूने साऱ्यांचीच झोप उडवली आहे. पण माणूस रडत बसलेला नाही तर करो ना कु छ असे म्हणत या विषाणूला नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. घरातला वेळ चांगल्या पद्धतीने घालवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी तर सध्या इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करते आहे. एका मैत्रिणीने भेट दिलेले पुस्तक वाचायला सुरुवात केली आहे. सुरैया, सुमन कल्याणपूर यांची मला आवडलेली जुनी गाणी ऐकायचा आनंद घेत आहे. तसेच योगासने, जिन्यांचे चढउतार असे शारीरिक व्यायाम करते आहे. आता वेळ हाताशी असल्याने वेळखमऊ पारंपरिक पदार्थ करते आहे. भटकंती बंद झालीय खरी, पण मी लिखाणाला सुरुवात के ली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत जमेल तसे आणि जमेल तितके  लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते आहे. काहीजण समजून घेतात, काही नाही. पण मी माझा निर्धार कायम ठेवते. आमच्या घरची मदतनीस मनिषा हिला मी म्हटले, ‘तू बाई आता येऊ नकोस.’ तर ती म्हणाली, ‘ताई अहो घाबरायचे कारण नाही. सरकारने खूप सोयी केलेल्या आहेत आणि तुम्ही आहातच सांगायला.’ तिचा आशावाद ऐकू न आनंद वाटला. परंतु आमच्या घरातील कचरा घेऊन जाणाऱ्या ताईला हातमोजे देऊन ते वापरायला सांगितल्यावर त्या म्हणाल्या, अहो हातमोजे नाही आवडत. त्यांच्या काळजीपोटीच मी हे सांगितले होते, त्यामुळे त्यांचा असा निरुत्साह पाहून दु:ख वाटले. तितक्यात माझे पती तिथे आले आणि म्हणाले, इतक्यातच नाराज झालीस तू? समाजसेवा करायची आहे ना? मग ती काही सोपी नाही. हे त्यांचे बोलणे मात्र मला पटले आणि मी पुन्हा त्या ताईला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटवून देता येईल, याचा विचार करू लागले. सरकारने जाहीर के लेल्या लॉकडाऊनच्या निमित्ताने मला १९९२-९३च्या बॉम्बस्फोटांच्या वेळच्या स्थितीची आठवण झाली. त्या वेळी मी तब्बल १५ दिवस घरीच होते. ती रजा आम्हा साऱ्यांनाच विशेष रजा म्हणून मंजूर झाली होती. समोर आलेल्या या परिस्थितीपुढे असहाय न होता, या संधीचा फायदा घ्या. आपले कु टुंब सांभाळा असेच मी सांगेन. महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा. जे आम्ही अगदी तंतोतंत करतो.

ग्रंथांशी जोडले मैत्र

प्रा. अविनाश कळकेकर, नांदेड : पुस्तके  हे माणसाचे जवळचे मित्र असतात, असे म्हटले जाते. महाविद्यालयीन जीवनात छावा, राधेय, झाडाझडतीसारखी पुस्तके  वाचत होतो, पण त्यानंतर नोकरीमागे धावताना पुस्तके  मागे पडली. नेहमी वाटत असे की, वाचनासाठी दिवसातून काही वेळ काढावा. पण महाविद्यालयातील अध्यापन, पाठाची तयारी, इतर उपक्रम, प्रात्यक्षिके  या साऱ्याच्या धबडग्यात पुस्तकांसाठी वेळ मिळालाच नाही. दिवसभरातील वाचन म्हणजे के वळ वर्तमानपत्राचेच होते. एक दिवस समाजमाध्यमावर अमृता प्रीतम आणि इमरोज यांच्या प्रेमकहाणीबद्दल लिहिलेल्या ‘अमृता-इमरोज’ या पुस्तकाविषयी पोस्ट वाचली. ती वाचून हे पुस्तक आपल्याकडे हवेच असे वाटू लागले. काही ठिकाणी चौकशी के ली, पण पुस्तक मिळाले नाही. शेवटी  प्रा. मुरलीधर हंबर्डे यांच्याकडून ते पुस्तक मिळाले. नेमक्या त्याच दिवशी महाविद्यालयात परीक्षा सुरू झाल्या मग वाचनासाठी वेळ कु ठून मिळणार? पुन्हा आपले पुस्तक तसेच. शेवटी या करोनाच्या सक्तीच्या सुट्टीत मात्र पुस्तकाची आठवण झाली. मी लागलीच ते पुस्तक वाचायला घेतले. नंतर प्रवीण बर्दापूरकरांनी संपादित के लेले ‘आई’,  महात्रया रा यांचे ‘न पाठवलेलं पत्र’, प्रा. शिवाजीराव भोसल्यांचे ‘देशोदेशीचे दार्शनिक’  ही चार पुस्तके  वाचून झाली. आता पुढील लॉकडाऊनच्या काळातही असेच वाचन करण्याचा मानस आहे.

सागरगोटे आणि चौपट

जितेंद्र देशमुख, जळगाव : ‘लोकसत्ता’ने करोनाष्टकच्या निमित्ताने आम्हा सर्व घरी बसलेल्या वाचकांना लिहायला लावले हे छानच आहे. कारण हे काही शब्द लिहिताना आम्हा साऱ्या कु टुंबीयांचा अर्धा तास अगदी मजेत गेला. गेले काही दिवस संपूर्ण कु टुंब म्हणजे आई-वडील, आजी-आजोबा, मुले यांच्यासोबत एकत्र आले आहे. हा अनुभव खरोखर खूप आनंदी आहे. सगळ्यांना जणू कौटुंबिक समारंभात एकत्र आल्यासारखे वाटत आहे. आम्ही सारे सकाळी लवकर उठून प्राणायाम आणि योगासने करतो. घरातील कामांसाठी असलेले मदतनीस आता येत नसल्याने साऱ्यांनी कामे वाटून घेतली आहेत. व्यायामानंतर सारे ती कामे करतो. ‘लोकसत्ता’ प्रत्यक्ष हातात मिळत नाही, पण ऑनलाइन येणारा अंक मात्र आम्ही सारे मिळून वाचतो. मुले कॉलेजला असल्याने त्यांच्या आयुष्यातील गमतीजमती, आमच्या लहानपणीचे किस्से यात वेळ कसा जातो कळतच नाही. जेवण, वामकु क्षीनंतर कॅ रम, सापशिडी, ल्युडो तर खेळतोच पण चौपट हा खेळ तयार करून तो खेळायलाही शिकवला. सध्या सागरगोटे नसल्याने मग चिंचोक्यांच्या साहाय्याने सागरगोटय़ांचा खेळही शिकवला. दुपारी तीन ते पाच आम्ही परत कार्डिओ एक्सरसाइज करतो. त्यासाठी आंतरजालाची मदत घेतो. संध्याकाळी सहा वाजता दिवेलागणीच्या वेळी सारे एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना म्हणतो, अशा प्रकारे करोनाकाळातील हे दिवस आनंददायी आणि सकारात्मक बनवण्याचा प्रयत्न आम्ही सारे करत आहोत.