परदेशी पक्वान्न : नीलेश लिमये

nilesh@chefneel.com

लाते किंवा लाटे म्हणजे दूधमिश्रित कॉफी. येस म्हणजे आपण जी पितो तीच. पण सध्या अमेरिकेत लाल भोपळ्याच्या स्वादाची कॉफी खूप गाजते आहे. आता तिकडच्या लोकांना काय आवडेल, काय सांगता येत नाही. तरीपण तिकडे आवडलंय म्हणजे हे लोण भारतात यायला काही वेळ लागायचा नाही. तरीही लाल भोपळ्याची कॉफी म्हणजे जरा जास्तीच झालं असं वाटेल ना? पण तरीही तुम्ही एकदा ही कॉफी करून पाहा आणि मग मला सांगा.

साहित्य

३ कप कॉफीसाठी आहे. पाव किलो लाल भोपळा, ४०० मिली सोया मिल्क, ४ चमचे कॉफी पूड, १ ग्लास पाणी, १ चमचा दालचिनी आणि जायफळ पूड, ४ चमचे गुळाची पूड किंवा ब्राऊन शुगर, व्हॅनिला इसेन्स.

कृती

भोपळा वाफवून त्याचा गर काढून घ्या. एका पॅनमध्ये भोपळ्याचा गर, साखर, दालचिनी पूड आणि जायफळ पूड एकत्र करा आणि साखर विरघळेस्तोवर गरम करा. त्यात सोया मिल्क घालून ते उकळून घ्या. दुसऱ्या एका भांडय़ात कॉफी पूड आणि पाणी एकत्र करून उकळून घ्या. एका हँड ब्लेंडरने किंवा मिक्सरमध्ये हे मिश्रण जरा गार झाल्यावर घाला त्यात उकळून थंड केलेली कॉफी घाला आणि मिश्रण फेटून घ्या. कॉफी अतिशय फेसाळ होईल.