|| अमित सामंत

केनियातील गिथेरी :- केनियात फिरताना आमच्या गाडीचा चालक बऱ्याचदा गिथेरी मागवायचा. गिथेरी हा पारंपरिक केनियन पदार्थ तिथे रोजच्या जेवणात असतो किंवा जेवण म्हणूनही असतो. तिथल्या शाळेतही हा पदार्थ पौष्टिक अन्न म्हणून मुलांना  दिला जातो. गिथेरी तयार करण्यासाठी मक्याचे दाणे आणि बीन्स (राजमा, शेंगदाणे, चवळी) इत्यादीचा वापर केला जातो. दुकानामध्ये गिथेरीची पाकिटे विकत मिळतात.

गिथेरी दोन प्रकारे केली जाते. सगळ्यात साधा प्रकार म्हणजे मक्याचे दाणे आणि बीन्स एकत्र उकडतात आणि त्यात चवीपुरते मिठ घालतात. दुसऱ्या प्रकारात तेलावर कांदा, गाजर, टोमॅटो परतून त्यात मसाला घालतात. या मिश्रणात मक्याचे दाणे आणि बीन्स घालून उकडतात. हा पदार्थ पटकन तयार होत असल्यामुळे आणि यातून भरपूर उष्मांक मिळत असल्याने त्याचा केनियात आणि पूर्व अफ्रिकेत रोजच्या आहारात समावेश झाला असावा. गिथेरीसारखाच पण थोडा वेगळा प्रकार या भागात मिळतो तो  म्हणजे मुकीमो. या पदार्थात मक्याचे दाणे, बीन्सबरोबर भोपाळ्याची किंवा पालकाची पाने आणि उकडलेले बटाटे यांचा वापर केला जातो.