|| अलका फडणीस

साहित्य

मटण एक किलो, कांदे तीन-चार मोठे चिरलेले, मटणाचे वाटण अर्धी वाटी, हळद पाव चमचा, सी.के.पी. मसाला तीन-चार चमचे किंवा आवडीप्रमाणे, नारळाचे दूध किंवा वाटलेलं खोबरं एक वाटी, दही अर्धी वाटी, गरम मसाला दीड चमचा, मीठ चवीप्रमाणे, तेल अर्धी वाटी, तमालपत्र एक, हिंग अर्धा चमचा, लवंग दोन-तीन.

कृती

मटण स्वच्छ धुवून त्याला दोन चमचे तेल, मीठ, हळद, एक चमचा गरम मसाला, सी.के.पी. मसाला, मटणाचे वाटण आणि दही लावून साधारणपणे एक तास ठेवा. पातेल्यात तेल गरम करून त्यात हिंग, तमालपत्र आणि लवंग टाकून लगेच कांदा घालून परता. कांदा मऊ  गुलाबी झाल्यावर मटण घालून चांगले परता. गॅसची आंच मंद करून झाकण ठेवा. मटणाला पाणी सुटेल ते पूर्णपणे आटवून घ्या. नंतर त्यात पाणी घालून पातेल्यावर झाकण ठेवा. झाकणावर पाणी घालून ठेवा. मंद आंचेवर मटण चांगले शिजू द्या. झाकणातील पाणी आटल्यास आणखी पाणी घाला. हाडाचे मांस सैल झाले की मटण शिजले असे समजा पण एखादा तुकडा बाहेर काढून शिजले की नाही हे प्रत्यक्ष चाखून बघण्यास हरकत नाही. शेवटी वरून नारळाचे दूध किंवा वाटलेलं खोबरं घालून शेवटी गरम मसाला घालून एकदा ढवळून गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

टीप

मटणात एखादा चमचा तळलेला मसाला टाकला तर चांगला लागतो.