04 March 2021

News Flash

रुग्णांसाठी परिहार सेवा

पन्नाशी ओलांडल्यानंतर ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालेल्या अंजलीला (नाव बदलले आहे) प्रचंड वेदना होत होत्या.

दुर्धर आजारांनी वेढलेल्या रुग्णांना आणि पर्यायाने नातेवाईकांना होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक तणावाच्या परिस्थितीमध्ये योग्य मार्गदर्शन करून आधार देणारी व्यवस्था म्हणजे परिहार सेवा किंवा पॅलिएटिव्ह केअर सुविधा. मात्र याबाबत अद्याप जनजागृती झालेली नाही. या सुविधेबाबात ‘इझ् अ‍ॅण्ड सपोर्ट इंडिया’च्या संस्थापक आणि पॅलिएटिव्ह उपचार तज्ज्ञ डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी उलगडून सांगत आहेत.

पन्नाशी ओलांडल्यानंतर ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झालेल्या अंजलीला (नाव बदलले आहे) प्रचंड वेदना होत होत्या. सर्व प्रकारचे अत्याधुनिक औषधोपचार सुरू असतानाही तिच्या वेदना थांबायचे नाव घेत नव्हत्या. तिच्या डॉक्टरांकडून पॅलिएटिव्ह केअर उपचार पद्धतीची माहिती मिळाल्याने अंजलीने माझ्याशी संपर्क साधला आणि उपचारांसाठी मी अंजलीची भेट घेतली. तब्बल चाळीस मिनिटे तिच्याशी बोलून  तिच्या आजाराचे स्वरूप आणि वेदना यांबाबत चर्चा केल्यानंतर मी जास्त क्षमतेची वेदनाशामक औषधे सुरू केली. पुढील उपचारासाठी अंजलीला भेटले तेव्हा नव्या औषधाची मात्रा लागू पडल्याचे काही प्रमाणात तिच्या चेहऱ्यावर दिसत होते, तरीही मी वेदना कमी आहेत का हे विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘अशा वेदना कमी झाल्या तरी मला माहीत आहे की याचा शेवट मरणातच आहे.’ ती असा विचार का करते हे समजून घ्यायचा प्रयत्न केल्यावर समजले की तिच्या आईला १५ वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले आणि असह्य़ वेदनांमध्येच तिचा मृत्यू झाला. पॅलिएटिव्ह उपचार तज्ज्ञ म्हणून मला अंजलीच्या शारीरिक वेदनांबरोबरच मानसिक स्थितीचा अंदाज आला. वेदनेचा सर्वागाने विचार करून उपचार केल्याने तिच्या वेदना पुष्कळ प्रमाणात कमी करता आल्या. वेदना कमी होण्याबरोबरच तिच्यातील उभारी वाढली आणि ती नव्या जोमाने कर्करोगावरील उपचार घेऊ  लागली.

पॅलिएटिव्ह उपचार ही वैद्यकशास्त्रातील एक नामांकित शाखा आहे. कर्करोग, मूत्रपिंडाचे विकार आदी आजारांमुळे अंथरुणाला कायमचे खिळून असलेले रुग्ण, तसेच वृद्धापकाळामुळे होणारे अल्झायमर, डिमेन्शिया या आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना अतिरिक्त उपचार म्हणून पॅलिएटिव्ह केअरची मदत होते. क्लिष्ट औषधोपचारांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक स्थैर्य आणि आराम मिळणे हा या उपचार पद्धतीचा मुख्य हेतू आहे. मात्र पॅलिएटिव्ह उपचार पद्धतीचा भारतात अजून म्हणावा तसा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. असेच आणखी एक उदाहरण विवेक जोशी (नाव बदलले आहे) यांच्या आई-वडिलांचे. नोकरीनिमित्त युरोपमध्ये राहाणाऱ्या विवेकचे आई-वडील पुण्यात राहतात. त्याच्या आईला उतारवयात कर्करोगाचे निदान झाले. वडिलांना हृदयरोगाचा त्रास सुरू होताच. आईवर उपचार सुरू असतानाच वडिलांची तब्येत ढासळत असून ते नैराश्यात जात असल्याचे लक्षात आल्याने विवेकने भारतातील पॅलिएटिव्ह उपचारांबाबत शोध घेतला. जोशी दाम्पत्याची भेट घेतली तेव्हा विवेकच्या आईला कर्करोगाच्या वेदनांचे व्यवस्थापन करणारे उपचार तसेच वडिलांना मानसिक आधाराची गरज असल्याचे लक्षात आले. त्यानुसार उपचार सुरू केले आणि नियमितपणे जोशी दाम्पत्याची भेट घेत मी आणि माझ्या वैद्यकीय समाजसेवक सहकाऱ्याने त्यांना पॅलिएटिव्ह उपचार देण्यास सुरुवात केली. विवेकच्या आईचा कर्करोग बरा होण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे वेदना कमी करण्याबरोबरच त्यांना वास्तवाची कल्पना देणे महत्त्वाचे होते. आम्हाला त्यांच्याशी बोलून हे समजावायला, त्यांच्या भावना समजून योग्य निर्णय घ्यायला, तसेच त्यांना घरच्या लोकांचा फार आधार नसल्याने आधार देणारी व्यवस्था तयार करायला पुरेसा वेळ मिळाला. पत्नीची काळजी घेतानाच स्वतकडेही पुरेसे लक्ष द्यायला हवे हे विवेकच्या वडिलांना समजल्यामुळे त्यांनी स्वत:ची नीट काळजी घेतलीच, पण वेळोवेळी आम्हाला विवेकशी बोलून ते ठीक आहेत हेही सांगायचा प्रयत्न केला. विवेकच्या आईच्या अखेरच्या काही तासांमध्ये मी वडिलांची भेट घेऊन, त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी घरी प्राण सोडला तेव्हा विवेकच्या वडिलांनी डगमगून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळली.

काही वेळा रुग्णाच्या उपचारांपुढे नातेवाईकांची घालमेल होणे, त्यांना नैराश्य येणे या स्वाभाविक गोष्टी दुर्लक्षित राहतात. त्यांनाही आधाराची गरज असते. हा आधार पॅलिएटिव्ह उपचार तज्ज्ञ देऊ  करतो. त्रुग्णाच्या आजारानुरूप त्याच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर आणि रुग्ण तसेच रुग्णाचे नातेवाईक यांच्यामध्ये सुसंवादाचा दुवा म्हणून पॅलिएटिव्ह केअर तज्ज्ञ काम करतात. मराठीत या उपचारांना ‘परिहार सेवा’ असेही म्हणतात. अनेकदा गुंतागुंतीच्या आजारांवर सर्वोत्तम उपचार डॉक्टर करत असतात. उपचाराअंती रुग्ण बरा होईल अशी आशा डॉक्टर, रुग्ण आणि रुग्णाचे कुटुंबीय या सर्वानाच असते. मात्र कदाचित तसे होणार नाही ही दुसरी बाजूही असते. ही दुसरी बाजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना समजावून सांगणे महत्त्वाचे असते. वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना संवाद कौशल्याचे शिक्षण दिले जात नाही. योग्य तऱ्हेने संवाद न झाल्यास त्याचा परिणाम रुग्णावर किंवा त्याच्या कुटुंबावर होण्याची शक्यता असते. म्हणून पॅलिएटिव्ह तज्ज्ञ डॉक्टरांना सुसंवाद साधायला शिकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. गंभीर आजारावर औषधोपचार उपलब्ध आहेत मात्र त्यांना मर्यादा आहेत. शेवटी जेव्हा रुग्णाला मृत्यू येतो, तेव्हा मनात अपराधी भावना न ठेवता उलट आपण जेवढे त्रास कमी करता येतील तेवढे कमी करण्याचा आपण प्रयत्न केला हे समाधान ठेवून आपले उर्वरित आयुष्य निरोगीपणे जगावे यासाठी ही उपचार पद्धती मदत करते.

पॅलिएटिव्ह वैद्यकीय सेवा मात्र भारतात अजूनही प्राथमिक टप्प्यात आहे. नागरिकांना प्राथमिक आरोग्याच्या उत्तम सेवा मिळाव्यात आणि त्यांच्या वेदनांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे याबाबत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे. पूर्वी रुग्णाचा आजार बरा होणारा नसल्यास त्याला अखेरच्या काळात घरी पाठवले जात असे. घरी मृत्यू होणे यात पूर्वी काही वावगे वाटत नसे. पण आता मात्र बऱ्याचदा रुग्ण यांत्रिक उपकरणांना जखडलेल्या अवस्थेतच अतिदक्षता विभागात शेवटचा श्वास घेतो. घरी भेट देऊन उपचार करणाऱ्या जनरल प्रॅक्टिशनरची सध्या नितांत गरज आहे. रुग्णाच्या  शेवटच्या टप्प्यात उरलेले आयुष्य सुसह्य़ आणि कमीत कमी वेदनादायी व्हावे हे पाहणे महत्त्वाचे आहे.

चोवीस तास घरी मदतनीस असणे, कुटुंबाशी संवाद असणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. परिहार उपचारांना अलीकडच्या काळात वैद्यकीय अभ्यासक्रमात काही प्रमाणात स्थान मिळत आहे. मात्र त्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात झाला तर असह्य़ वेदनांचा सामना करत मृत्यू पावणाऱ्या अनेक रुग्णांना त्याचा उपयोग होणे शक्य आहे.

शब्दांकन : भक्ती बिसुरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 12:45 am

Web Title: relief medical center
Next Stories
1 चिकनगुनिया
2 त्रिकोणासन
3 व्हेज सँडविच
Just Now!
X