साचेबद्ध जगणं नको रे भाऊअसं म्हणत मुक्त जगण्याची स्वप्न रंगवणारा एखादा अवलिया मित्रांच्या घोळक्यात असतोच. जो कोणी सोबत नसले तरी एकटाच प्रवासाला निघतो, रंगांत रमून जातो, अपरिचितांसाठीही मदतीचा हात पुढे करतो, नवनव्या भाषा शिकतो.. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची ऊर्मी त्याच्यात असते. अशा तरुणांकडे पाहिल्यावर वाटते, प्रत्येकाने असे मनमुराद जगायला हवे. अभ्यास, करिअर, जबाबदाऱ्या या कायम असणारच! त्या सांभाळतानाच स्वत:चा शोध घेता यायला हवा. स्वत:चा आनंद शोधता यायला हवा. जगण्याचा आनंद लुटत स्वत:चा शोध घेणाऱ्या अशाच काही अवलियांशी त्यांच्या कलागुणांशी ओळख करून दिली आहे ऋषिकेश मुळे यांनी..

चित्र, मूर्तिकला आणि मेंदी

कळवा येथे राहणारा मयूर तायडे या तरुणाला लहानपणापासून चित्रकलेचा छंद आहे. पाळीव प्राण्यांची आवड आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टीविषयी कुतूहल आहे. मयूर कळव्यात ज्या भागात राहतो त्याच्या आजूबाजूच्या भागात गणपतीचे मोठे कारखाने आहेत. लहानपणापासूनच तो या कारखान्यांत गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे काम करत असे. त्यामुळे त्याच्यावर मूर्तिकलेचे संस्कार झाले. जोशी बेडेकर महाविद्यालयातून कला शाखेत पदवी घेतलेल्या मयूरने इंटेरिअर डिझायनिंगमध्येदेखील पदवी मिळवली आहे. विविध गोष्टींकडे चित्रकलेच्या दृष्टिकोनातूनच पाहात असल्याचे मयूर सांगतो. प्रत्येक सणात ज्या गोष्टींचा वापर अधिक होतो त्या गोष्टी तो तयार करत असे. दिवाळीत पणत्या, किल्ले, शिवाजी महाराजांच्या व मावळ्यांच्या मूर्ती बनवण्याचे काम मयूर करत असे. गणपतीत विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये तो गणपतीची सजावट करत असे. माझी कला हीच माझी गुरू असे मयूर सांगतो. लहानपणी माझ्या मोठय़ा बहिणीकडे मुली मेहंदी काढण्यासाठी येत. ते मी पाहायचो, मलाही त्यामध्ये आवड निर्माण झाली. मी मेहंदी काढू लागलो. पहिली मेंदी मी माझ्या ताईच्या हातावरच काढली असे मयूरने सांगितले. मयूर वॉल पेंटिंगदेखील करतो. विविध शाळांच्या भिंतींवर, हॉटेल्स, केकची दुकाने, कॅफे या ठिकाणी तेथील भिंतींवर विविध प्रकारे नक्षीकाम मयूर करतो.

सिटी नेक्स्ट डोअर

ठाण्यात राहणारा दीपेश वेदक हा तरुण इतिहासप्रेमी आहे. त्याला लहानपणी शाळेत इतिहास विषय आवडायचा नाही. मात्र काही काळानंतर त्याला इतिहासाविषयी आवड निर्माण झाली. तो इतिहासातल्या पात्रांमध्ये रमू लागला. त्याने इतिहासातील पात्रे गड-किल्ल्यांवर फिरून शोधण्यास सुरुवात केली आणि त्याला ती मिळालीदेखील. गड-किल्ल्यांवरच्या प्रत्येक स्पर्शातून तो इतिहासातल्या पात्रांशी संवाद साधू लागला. दीपेशने आठ वर्षांपूर्वी ट्रेकिंग करण्यास सुरुवात केली. त्याने पहिला ट्रेक सुधागड येथे केला. त्यानंतर त्याला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. रुईया महाविद्यालयातून त्याने कला शाखेची पदवी संपादन केली. दर शनिवार, रविवारी ट्रेकिंग करू लागला. प्रत्येक गडावरचा अनुभव वेगळा असतो. तो लोकांपर्यंत पोहचावा आणि त्यांनीदेखील ट्रेक करण्यास उद्युक्त व्हावे यासाठी त्याने सीटी नेक्स्ट डोअर नावाचा एक ब्लॉग सुरू केला. खायचे, फिरायचे आणि झोपायचे हे त्याच्या ब्लॉगचे बोधवाक्य. दीपेशला याच क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यामुळे तो दार्जिलिंग येथील हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश मिळवणार आहे. शालेय विद्यार्थ्यांत गिर्यारोहणाची आवड निर्माण व्हावी यासाठी त्याने ४० विद्यार्थ्यांना नुकतेच सुधागडला नेले होते. येथे ट्रेकसाठी घेऊन गेला. लहानपणापासूनच गिर्यारोहण, गड-किल्ल्यांविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी सिटी नेक्स्ट डोअर हे माध्यम सुरू केल्याचे दीपेशने सांगितले. आज दीपेश विविध ट्रेक समूहांसोबत ट्रेक लीडर म्हणून काम करतो.

उलटी अक्षरे काढणारा ओमकार

अक्षरांची ओळख ही आपल्याला शाळेत गेल्यावर होते. मात्र एक असा अवलिया आहे, जो लहानपणी सरळ अक्षरांबरोबरच उलट अक्षरे काढू लागला. ओमकारने काढलेली उलटी अक्षरे आरशासमोर धरल्यानंतर सरळ दिसू लागतात. सरळ अक्षरांएवढय़ाच वेगाने ओमकारचा उलट अक्षरेही लिहितो. या कलेतील गुरू त्याच्या आई कल्याणी मुळ्ये आहेत. त्यादेखील त्यांच्या लहानपणी उलट अक्षरे काढत. त्यांचे अनुकरण ओमकार करत असे. चौथीत असल्यापासून ओमकार उलट अक्षरे काढतो. आजवर ओमकारने हरिवंशराय बच्चन यांची मधुशाला, अब्दुल कलामांचे अग्निपंख, भवरलाल जैन यांचे वाकोदचा वटवृक्ष, कुसुमाग्रज यांचा विशाखा हा काव्यसंग्रह अशी निरनिराळी पुस्तके या लिपीत लिहिली आहेत. आजवर अनेक क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना त्याने मिरर लिपीत शुभेच्छापत्रे दिली आहेत. अमिताभ बच्चन यांना ओमकारने मधुशाला हे संपूर्ण पुस्तक मिरर लिपीत लिहून भेट म्हणून दिले आहे.