२०१९ या वर्षांला शानदार निरोप देऊन एव्हाना सर्व नव्या वर्षांतील नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत; परंतु गेल्या आठवडय़ाभरात आपल्या आवडत्या क्रीडापटूंनी कशा प्रकारे नाताळ आणि नवीन वर्षांचा आनंद लुटला, हे जाणून घ्यायची इच्छा तुम्हालाही असेलच. आजपासून सुरू होणाऱ्या ‘ऑफ द फिल्ड’ या साप्ताहिक सदराच्या नव्या हंगामात तुम्हाला अशाच पडद्यामागील कहाण्यांची मजा घेता येणार आहे.

समायरा आयुष्यात आल्यापासून भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचा खेळ अगदी वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे, हे आपण सर्वानीच गेल्या वर्षांत पाहिले. त्याच समायराचा पहिला वाढदिवस रोहित आणि कुटुंबीयांनी धडाक्यात साजरा केला. रोहित, त्याची पत्नी रितिका आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनी खास इमोजीचे टी-शर्ट घालून छायाचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केले. रोहितने समायराला खास ‘लिटिल कुकी मॉन्स्टर’ असेही या पोस्टमध्ये संबोधले.

‘विरुष्का’ आणि ‘सैफीना’ एकत्र

विराट कोहली-अनुष्का शर्मा आणि सैफ अली खान-करीना कपूर या जोडय़ांनी स्वित्र्झलडमधून एकमेकांच्या साथीने नव्या वर्षांत प्रवेश केला. वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलालसुद्धा या वेळी उपस्थित होती. कोहलीने इन्स्टाग्रामवर या सेलिब्रेशनचे छायाचित्र टाकले. कोहली आणि अनुष्का गेल्या चार दिवसांपासूनच स्वित्र्झलडला वास्तव्यास असून गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी कोहली मायदेशी परतणार आहे.

टेनिसपटू सानिया मिर्झाची बहीण अनम हिच्या विवाह सोहळ्यासाठी भारताचे आजी-माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद कैफ, इरफान पठाण यांनी हजेरी लावली.