News Flash

गुलाबाचे कलम

गुलाबाचे कलम डॉगरोज जातीच्या गुलाबावर करतात.

शहर शेती : राजेंद्र श्री. भट

गुलाबाचे कलम डॉगरोज जातीच्या गुलाबावर करतात. ही डोळे भरून केलेली कलमे असतात. डोळे भरणे ही एकप्रकारची कला व कौशल्य आहे.  नर्सरीतून गुलाबाची कलमे आणताना पुढील बाबींची काळजी घ्यावी. ज्या काडीवर डोळा भरला आहे. ती काडी पेन्सिलएवढी जाड असावी. कलम डोळा व्यवस्थित बसलेला व २-३ तरी फांद्या फुटलेल्या असाव्यात. खोडावर व पानावर कीड व रोग नसावेत. बऱ्याच वेळा खोडावर खवले कीड असते. रोप फूटभरपेक्षा जास्त मोठे नसावे. जास्त मोठे रोप असेल तर त्याचा अर्थ असा की ते पिशवीत जास्त काळ राहिले आहे. अशा झाडाच्या मुळांची पिशवीत गोल गुंडाळी झालेली असते. अशा कलमाची वाढ नीट होत नाही. त्यामुळे छोटे किंवा मध्यम आकाराचे रोप आणावे. आणल्यावर ४-५ दिवस बाल्कनीत तसेच ठेवावे. या काळात ते आपल्या वातावरणाशी जुळवून घेते.

४-५ दिवसानंतर कलम लावण्यास घ्यावे. योग्य आकाराची कुंडी घ्यावी. फार निमुळती कुंडी घेऊ नये. निमुळत्या कुंडीत मुळे वाढण्यास पुरेशी जागा नसते. त्यात माती कमी असते. कुंडीचा आकार वर १२ इंच असला तर तळाचा भाग किमान १० इंच तरी असावा. कुंडी मातीची असल्यास उत्तम. कुंडीच्या तळाला छिद्र असल्याची खात्री करावी. छिद्रावर विटांचे तुकडे, त्यावर नारळाच्या शेंडय़ा, लाकडाचे तुकडे, कुंडीच्या १/४ भागापर्यंत भरावेत. त्यानंतर खतमिश्रित माती भरावी. या मातीत थोडीशी कडुनिंब पेंड किंवा शक्य झाल्यास राख मिसळावी. कलमाची प्लास्टिकची पिशवी अलगद कापावी. आतील मातीचा गोळा फुटणार नाही याची काळजी घ्यावी, कारण त्यात मुळे पसरलेली असतात. ती तुटू नयेत हे पाहणे आवश्यक आहे.

कलमाचा डोळा वर राहील एवढेच कलम मातीत लावावे. पिशवीत माती जेवढी आहे तेवढीच कुंडीत वरच्या बाजूस राहील याची काळजी घ्यावी. कलमाच्या जोडाला माती लागल्यास मातीमधील हानीकारक बुरशी जोडात जाऊन कलम मरण्याची शक्यता असते. त्याचबरोबर खोडाला काळोखात व ओलाव्यात जगण्याची सवय नसल्यामुळेही त्याचा दुष्परिणाम झाडावर होऊ शकतो. म्हणून काळजी घ्यावी.

जेव्हा कलमाचा डोळा फुटतो व फांदी वाढते, ती तिरकी वाढते. फांद्या जमिनीला ९० अंशात वाढाव्यात यासाठी कलम लावताना मातीचा गोळा थोडा तिरका लावावा. या छोटय़ा गोष्टीमुळे झाडाची वाढ होण्यात मदत होते.

रोप लावून झाल्यावर बाजूची माती दाबून बसवावी. नंतर हलके पाणी द्यावे. जास्त पाणी दिल्यास ते छिद्रातून बाहेर येईल तसेच माती गार झाल्यामुळे जिवाणूंसाठी प्रतिकूल वातावरण तयार होईल. जास्त पाण्याने झाडे कमजोर होतात व मातीत हानीकारक बुरश्या वाढल्याने हळूहळू झाडे मरतात.

रोपाने जीव धरल्यानंतर ८-१५ दिवसांनी थोडे जास्त पाणी दिले तरी चालते. परंतु कुंडीतून बाहेर येईल इतके पाणी देऊ नये. पाणी नेहमी संध्याकाळी द्यावे. त्यामुळे मातीत ओलावा जास्त काळ राहतो. झाडांना माणसांसारखे पाणी लागत नाही. मातीत दमटपणा म्हणजे वाफसा असावा. वाफसा स्थिती ही रोपांच्या उत्तम वाढीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

rsbhat1957@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 12:10 am

Web Title: rose city farming cutting akp 94
Next Stories
1 ‘शॉर्ट व्हिडीओ’ची चलती
2 ऑफ द फिल्ड : इंग्लंडच्या परदेश भूमीवरील ५०० कसोटी
3 मटण
Just Now!
X