News Flash

स्मार्टफोनचा सुरक्षित वापर

जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्याची माहिती आपण स्मार्टफोनवरून अगदी ‘टच’सरशी मिळवू शकतो.

(संग्रहित छायाचित्र)

योगेश हांडगे

स्मार्टफोनमुळे आपल्या हातात अवघे जग सामावले आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्याची माहिती आपण स्मार्टफोनवरून अगदी ‘टच’सरशी मिळवू शकतो. तसेच कोणत्याही व्यक्तीशी झटपट संवाद, व्यवहार साधू शकतो. पण याला एक दुसरी बाजूही आहे. ज्याप्रमाणे स्मार्टफोनमुळे जग आपल्या ‘हातात’ असते, त्याचप्रमाणे या स्मार्टफोनमुळे आपणही जगाच्या ‘हातात’ असतो..

सध्या ऑनलाइन माहितीचोरीचा मुद्दा भलताच गाजतो आहे. फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांची माहिती इतरांकडे गेल्याचे आधीच कबूल केले आहे. आता ट्विटरवरील वापरकर्त्यांची माहितीही अन्य कंपन्यांच्या हाती पडल्याचे उघड होत आहे. एकूणच सोशल मीडियावर गोपनीयता किंवा खासगी असे काहीच राहिलेले नाही, दिसू लागले आहे. पण केवळ सोशल मीडियाच नव्हे तर, स्मार्टफोनवरूनही तुमची गोपनीय माहिती सार्वजनिक केली जाऊ शकते. मध्यंतरी चिनी मोबाइल निर्मात्या कंपन्यांकडून भारतीय ग्राहकांची माहिती चोरली जात असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारने या कंपन्यांना नोटीस बजावली होती. मात्र, केवळ चिनी कंपन्याच नव्हे तर कोणत्याही मोबाइल निर्मात्या कंपन्या, अ‍ॅपनिर्माते किंवा हॅकर्स स्मार्टफोनवरील तुमची माहिती सहज मिळवू शकतात. त्यामुळेच वापरकर्त्यांनी स्वत:च मोबाइलच्या वापराबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

खासगी माहिती सुरक्षित ठेवा

मोबाइल फोन हरवला किंवा चोरीला गेला की त्यात असलेला आपला प्रायव्हेट डेटा दुसऱ्या कुणाच्या हाती जाण्याची शक्यताच अधिक असते. आणि यामुळे आपल्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होण्याची शक्यता जास्त असते. स्मार्टफोनमध्ये  क्रेडिट कार्डची माहिती, बँक खाते क्रमांक, पासवर्ड्स इत्यादी पर्सनल माहिती ठेवतो तसेच व्यावसायिक मोबाइलमध्ये कॉर्पोरेट डॉक्युमेंट्सही सेव्ह करतात. ज्यामुळे वेळेवर ती त्यांना उपलब्ध होतात परंतु मोबाइल हरवल्यास ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या हातून निघून जाते. त्यामुळेच अशी कोणतीही माहिती ज्यामुळे तुमचे आर्थिक वा अन्य प्रकारचे नुकसान होऊ शकते, ती मोबाइलमध्ये साठवून ठेवू नका.

अ‍ॅप वापरताना सतर्क राहा

स्मार्टफोनमध्ये विशेषत: अँड्रॉइडवर आधारित मोबाइलमध्ये असंख्य अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी खुले आणि विनामूल्य असतात. त्यामुळे एखादे अ‍ॅप आकर्षक दिसले तरी पुरेशी खातरजमा न करता वापरकर्ते ते डाऊनलोड करतात. ते इन्स्टॉल करतानाही त्यावरील अटी-शर्तीचे वाचन केले जात नाही. येथेच बहुतांश वापरकर्ते फसतात. अनेक अ‍ॅपच्या अटी-शर्तीमध्ये मोबाइलमधील कॉन्टॅक्ट, मेसेज, छायाचित्रे, व्हिडीओ, पासवर्ड इत्यादी गोष्टींचा ‘अ‍ॅक्सेस’ मिळवून देणारे नियम असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही या अटी-शर्ती मान्य करता तेव्हा आपोआपच तुम्ही तुमच्या मोबाइलमधील सर्व माहिती अ‍ॅपनिर्मात्या कंपनीला किंवा व्यक्तीला खुली करून देता.

अ‍ॅप्लिकेशन कंपन्या ‘युजर एक्सपिरिअन्स’ची माहिती मिळवण्याच्या नावाखाली तुमच्या घडामोडींवर लक्ष ठेवू शकतात. परंतु मोबाइलमधल्या कुठल्याही गोष्टीचा उपयोग कंपनी स्वत:च्या वापरासाठी करू शकत नाही. अनेक प्रकरणांत काही कंपनीचे अ‍ॅप्स महिलांच्या मोबाइलमधील त्यांचे फोटो चोरून फोटोशॉपच्या साहाय्याने या फोटोमध्ये फेरफार करून वेबसाइटवर अपलोड केल्याचं सायबर सेलला तपासात आढळून आलेलं आहे. त्यामुळे अ‍ॅप डाऊनलोड करताना सतर्क राहणे चांगले.

स्मार्टफोन वापरतांना खालील काळजी घ्या

* खासगी माहिती किंवा फोटो मोबाइलमध्ये ठेवू नका

*  नेट बँकिंग व ईमेलचे पासवर्ड वारंवार बदलत राहा.

*  उपयोगात नसलेले अ‍ॅप आणि गेम्स अनइन्स्टॉल करा.

* आठवडय़ाला मोबाइलमधली मेमरी क्लीन करा.

* फोनमधील माहिती चोरीला गेल्यास तत्काळ पोलिसांच्या सायबर क्राइम सेलशी संपर्क साधून तक्रार नोंदवा.

* अनोळखी व्यक्तींशी अ‍ॅपद्वारे खासगी संवाद करू नये.

* मोबाइलच्या मेमरी कार्डमधील डेटा ‘एन्क्रिप्ट’ करून ठेवा. त्यामुळे मेमरी कार्ड दुसऱ्याच्या हाती गेले तरीही त्यातील डेटा सुरक्षित राहतो.

* ‘थर्ड पार्टी अ‍ॅप्स’ डाऊनलोड करू नका.

* सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोफत वायफायचा वापर टाळा.

*  फोनमधील वायफाय, ब्लूटुथ आवश्यकता नसताना बंद ठेवा.

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी या संस्थेत साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:40 am

Web Title: safe use of smartphones
Next Stories
1 सेल्फ सव्‍‌र्हिस : ‘स्मार्टवॉच’ची काळजी
2 न्यारी न्याहारी : नाचणीचे डोसे
3 ताणमुक्तीची तान :  मी थांबत नाही..
Just Now!
X