संकर्षण कऱ्हाडे

लेखक, अभिनेता आणि उत्कृष्ट निवेदक असणारा संकर्षण कऱ्हाडे कवीही आहे. त्याच्या कवितांना समाजमाध्यमांवर चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. सध्या टाळेबंदीत वाचन आणि लेखनात हरवून गेलेला संकर्षण लिहितो,

उद्या कामासाठी सारे, जग बाहेर पडेल,  पण उंबऱ्याच्या आत, फक्त गृहिणी राहील,

घरातली तीच आहे, घराचा हो कणा, पिरेमाने गृहिणीला, आभारी आहे म्हणा..

घरात राबणाऱ्या गृहिणीच्या व्यथा मांडणारी ही कविता संकर्षणने नुकतीच लिहिली आहे. तो म्हणतो, वैद्य, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील प्रत्येकजण जसा देशासाठी झटतो आहे तसे प्रत्येक घरात एक माऊली अहोरात्र राबते आहे. टाळेबंदीनंतर कदाचित आपण कामानिमित्त सगळेच बाहेर पडू, पण ती मात्र तिच्या कष्टासोबत घरात राहणार आहे. पुढे तो म्हणतो, प्रत्येकजण लिहीत असतो पण लोकांच्या मनातले लिहिता यायला हवे, ते जमले की लोक आपल्या लिखाणावर भरभरून प्रेम करतात. ‘गृहिणी’वर लिहिलेल्या कवितेला अगदी लंडनहून प्रतिसाद मिळाल्याचेही त्याने सांगितले.

टाळेबंदीच्या काळातच त्याने ज्येष्ठ नेते अमिताभ बच्चन यांना पत्र लिहिले, त्याबद्दल तो म्हणतो, ‘१०२ नॉटआउट’ हा त्यांचा चित्रपट पाहून मी भारावून गेलो. अमिताभ यांची ऊर्जा पाहून लिहिता झालो, पण तेव्हा लिहिलेले हे पत्र मी माझ्यापर्यंतच ठेवले. टाळेबंदीच्या काळात जेव्हा अमिताभ यांनी इतर कलाकारांच्या साथीने ‘अंकलजी का चष्मा खो गया’ ही लोकांना आवाहन करणारी चित्रफीत केली त्या वेळी पुन्हा एकदा त्यांच्याविषयी व्यक्त व्हावेसे वाटले आणि ते पत्र मी समाजमाध्यमाद्वारे प्रसारित केले’,  ‘आयुष्यात सगळे अनुभव घेऊन, कामाशी इमान राखून, तब्येत जपत चाळीस वर्ष निर्दोष सातत्य कामात ठेवून जगण्यातला, जगण्यावरचा विश्वास तुम्ही आम्हाला दाखवून देताय.. आणि आत्ताच्या काळात तेवढेच घेणे बहुधा जमेल आम्हाला. किंवा जमावं.!’ अशा शब्दांत त्याने अभिताभ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. संकर्षण सध्या वाचनात आपले मन रमवतो आहे, त्याविषयी बोलताना तो म्हणाला, ‘सातत्याने वाचन करणे सहसा जमत नाही. पण वाचनासाठी हा सर्वाधिक चांगला वेळ आहे. भगवद्गीतेचे वाचन करावे असा विचार बरेच दिवस सुरू होता. यानिमिताने भगवद्गीता वाचून, समजून घेतो आहे. यासोबतच लेखन आणि कुटुंबाला वेळ देण्यात मी रमलो आहे. विशेष म्हणजे रोज रात्री संपूर्ण कुटुंब एकत्र बसून आम्ही पत्ते खेळतो, गप्पा करतो. सध्याचे वातावरण गंभीर असल्याने नैराश्यापेक्षा प्रेरणादायी गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न आहे, असे तो आवर्जून नमूद करतो.

शब्दांकन – नीलेश अडसूळ