|| अदिश वैद्य

‘रात्रीस खेळ चाले’, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ या मालिकेतून, तर ‘सेक्स, ड्रग्ज अ‍ॅण्ड थिएटर’ या वेब सीरिजमधून तरुणींच्या गळ्यातला ताईत बनलेला अदिश वैद्य या अभिनेत्याकडे ‘सेफी’ नावाची स्ट्रे डॉग आहे. अदिश आणि त्याचं संपूर्ण कुटुंब प्राणीप्रेमी. अदिशच्या घरी सेफीच्या अगोदर तीन मांजरी होत्या. त्यासुद्धा स्ट्रे जातीच्याच होत्या. त्यांच्यानंतर आणि सर्वात पहिली घरात आलेली कुत्री ही ‘सेफी.’

आपण बिल्डिंगग मध्ये राहतो म्हणून कित्येक महिने मांजरींनंतर वैद्यांच्या वास्तूला कोणी पाळीव सोबतीच मिळत नव्हता. सगळ्यांनाच घरी कुठला तरी एक पाळीव प्राणी असावा असं वाटत होतं आणि अखेर तो दिवस अदिशच्या भावाच्या एका निर्णयाने आला. त्याचं असं झालं, दादरच्या शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेश मंदिराजवळ नुकतंच डोळे उघडलेलं गोंडस पिल्लू अदिशच्या भावाला- रोहितला दिसलं आणि बघताच क्षणी त्या पिल्लाच्या प्रेमात पडला. त्याने त्याच क्षणी तिला घरी आणण्याचा निर्णय घेतला. आई-बाबासुद्धा प्राणीप्रेमी असल्याने ते काय म्हणतील, अशी शंका त्याच्या मनातसुद्धा आली नाही. नेमकं याच दरम्यान अदिशचं ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या पहिल्या सिझनचं चित्रीकरण सावंतवाडीला सुरू होतं. त्यामुळे सेफीचा घरातला पहिला दिवस अदिशच्या अनुपस्थितीतच गेला.

एके दिवशी सावंतवाडीला अदिशला त्याच्या घरच्यांचा फोन गेला. त्यांनी त्याला घरातल्या सदस्यांमध्ये वाढ झाल्याची बातमी दिली. अदिशला घरी कुत्रा हवाच होता. त्याची इच्छा पूर्ण झाल्याने त्याला सावंतवाडीत आकाश ठेंगणं झालं होतं. त्यानंतर सलग काही दिवस तो व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सेफीला भेटत होता. एके दिवशी अदिशचे कुटुंबीय सेफीसह सावंतवाडीला रात्रीस खेळ चालेच्या सेटवर गेले. तिकडेच अदिशची आणि सेफीची पहिली प्रत्यक्ष भेट झाली. त्या दिवशी सेटवर सेफी सेलिब्रिटी होती असं अदिश आवर्जून सांगतो.

सेफीचा घरातला वावर हा एखाद्या बॉससारखाच असतो. अदिश सांगतो, ‘‘तिला आमचं घर प्रचंड आवडतं. आमच्या हॉलला खूप मोठी खिडकी आहे. त्या खिडकीच्या कट्टय़ावर सेफी बसलेली असते. तिला खिडकीतून संपूर्ण शहर दिसतं. खालचे कुत्रे दिसतात. तिच्या भाषेत ती त्यांच्याशी संवादही साधते. जर चूकून आम्ही कोणी तिकडे बसलेले असू तर ती आम्हाला पद्धतशीरपणे तिच्या स्टाईलने उठवते. घरातल्या सदस्यांव्यतिरिक्त जर कोणी नवीन व्यक्ती घरी येणार असेल तर तिला लगोलग चाहूल लागते. तिला आमचा आणि आमच्या घराचा इतका लळा आहे की, ती आमच्याशिवाय इतर दुसऱ्या ठिकाणी एकटी राहूच शकत नाही. त्याबाबतीतला एक मजेशीर किस्सासुद्धा आहे. पुण्यात आमच्या घरातलंच एक लग्न होत. या लग्नासाठी आम्ही सहकुटुंब सेफीसह पुण्याला आजीकडे गेलो. आजी घरीच सेफीसोबत राहिली म्हणून आम्ही तिला लग्नाला घेऊन गेलो नाही. लग्नाला गेल्यानंतर काही तासांतच आजीचा मला फोन आला की, ‘‘सेफी विचित्र आवाज काढून रडतेय. ती सारखी तुमच्या बॅगजवळ जाऊन वास घेतेय. तुम्ही तिकडून ताबडतोब निघा.’’ आम्ही तडक तसेच घरी परतलो. सेफी कावरीबावरी झाली होती. तिला वाटलं असावं की, आम्ही सगळे तिला सोडून गेलो की काय! तेव्हापासून आम्ही तिला अनोळखी ठिकाणी तरी एकटं सोडत नाही.’’

अदिश अत्यंत फुडी आहे. त्याच्यातलेच फुडी गुण सेफीत उतरले आहेत. फोडणीचा किंवा जेवणाचा वास आला की ती लगेच आपला मोर्चा किचनकडे वळवते. सेफीला मारी बिस्कीट प्रचंड आवडतं. अनोळखी माणसाला जर सेफीसोबत मत्री करायची असेल तर त्याला आम्ही मारी बिस्कीट घेऊन येण्याचा सल्ला देतो. ती खूप हट्टी आहे. कधी ती खूपच हट्टीपणाने वागली तर आम्ही तिला मारी बिस्किटांचं आमिश दाखवतो, असं अदिश सांगतो. अशी ही वैद्यांच्या घरातली बॉस- सेफी!

शब्दांकन : मितेश जोशी mitesh.ratish.joshi@gmail.com