News Flash

हेडफोनचा अतिरेक

हेडफोनचा वापर अटळ असल्यास आवाजाची तीव्रता कमीतकमी ठेवावी.

हेडफोनचा अतिरेक
(संग्रहित छायाचित्र)

वाहन चालवताना, संगणकावर काम करताना, मोबाइलवर गेम खेळताना, संगीत ऐकताना किंवा अगदी टीव्हीवर कार्यक्रम पाहताना हेडफोन लावून बसणारे अनेक जण सध्या आजूबाजूला दिसतात. हेडफोन वापरण्याच्या अतिरेकामुळे कानाचे दुखणे वाढले आहेच, शिवाय बहिरेपणाचे वय कमी होऊन ते चाळीस ते पंचेचाळीस एवढे अलीकडे आल्याचे चित्र आहे.

दिवसातील अनेक तास मोठय़ा आवाजाचा मारा कानावर होईल अशा पद्धतीने हेडफोनचा वापर होत असल्याने ऐकू येण्यात फरक पडल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आधुनिक भाषेत या आजाराला ‘हेडफोन सिंड्रोम’ असे म्हणतात. हेडफोन सिंड्रोम हा विशेषत कानाचा किंवा बहिरेपणाशी निगडित आजार असला तरी त्याचे दुष्परिणाम व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावरही होताना दिसतात.

कान- नाक- घसातज्ज्ञ डॉ. राहुल ठाकूर सांगतात, बहिरेपणाची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्ये कॉल सेंटरसारख्या ठिकाणी दिवसातील आठ ते दहा तास हेडफोन वापरणारे कर्मचारी, गेम खेळताना कानावर हेडफोन लावून त्यातील तीव्र क्षमतेचा आवाज ऐकणारे महाविद्यालयीन तरुण तसेच लहान मुले यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हेडफोन सिंड्रोममुळे केवळ कानाचे दुखणे किंवा बहिरेपणा उद्भवतो, असे नव्हे तर त्याचे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतात. लहान मुले, मध्यमवयीन तरुण मुले आणि पंचेचाळिशीच्या वयोगटातील रुग्ण कानाच्या तक्रारी घेऊन येण्याचे प्रमाण मोठे आहे. कानात सतत हेडफोन घातल्याने कानातील मळ बाहेर पडत नाही. त्या मळाची गाठ होऊन ऐकू येणे कमी होते. कानाला पुरेसा कोरडेपणा न मिळाल्याने बुरशी तयार होते, त्याचा परिणाम म्हणून पू किंवा पाणी येऊन कान वाहणे सुरू होते. या लक्षणांनंतर हेडफोन वापरावर नियंत्रण न ठेवल्यास बहिरेपणा येतो. हेडफोन वापरावर नियंत्रण नसल्याने संपूर्ण बहिरेपणा आलेले रुग्ण वाढले आहेत. डॉ. राजीव यंदे सांगतात, क्षणिक आवाजाच्या आघातामुळे, विमान प्रवासात झालेल्या त्रासामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने आलेला बहिरेपणा उपचारांनी कमी होतो, मात्र तीव्र डेसिबलचा आवाज सतत कानावर आदळण्यातून येणारा बहिरेपणा बरा करता येत नाही हे हेडफोन वापरताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. गेल्या दहा वर्षांत कॉल सेंटरमधील नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. सतत अनेक तास हेडफोन वापरण्यातून कानाच्या तक्रारी उद्भवल्याने येणारे रुग्ण आढळण्यास काही वर्षांपूर्वी सुरुवात झाली. मात्र आता हे चित्र बदलले आहे. नवीन येणाऱ्या रुग्णांमध्ये मोबाइल गेम, संगीत ऐकण्यासाठी हेडफोनच्या आहारी गेलेले तरुण रुग्ण वाढले आहेत. लहान वयात कानांवर सातत्याने ८० डेसिबलपेक्षा तीव्र आवाज आदळत राहिल्यामुळे कानाच्या लहानमोठय़ा तक्रारी सुरू होतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास किंवा योग्य उपचार आणि खबरदारी न घेतल्यास या दुखण्याचे तीव्र परिणाम होतात. मोठय़ा कारखान्यांमध्ये, उत्पादन विभागात, अवजड यंत्रांच्या सहवासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा धोका असतो, मात्र आता त्याबाबत कंपन्यांकडूनही सुरक्षा तरतुदी राबवल्या जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता येत आहे.

दीर्घ काळ हेडफोन वापरण्याने कानाला टीनिटस नावाचा त्रास होतो. अत्यंत तीव्र क्षमतेचा आवाज सातत्याने बराच वेळ ऐकत राहिल्याने कानाच्या पेशींना (हेअरसेल्स) इजा होते. त्यामुळे कानात घंटेचा नाद, रातकिडय़ांचा आवाज यांच्याशी साधर्म्य असलेले आवाज ऐकू येतो. हायपरअक्युसेस हाही कानाशी संबंधित आजार असून तो झाला असता रुग्णाची सामान्य वातावरणातील आवाजाबाबत संवेदनशीलता वाढते. इतर सर्वसामान्य व्यक्तींना तीव्र न वाटणारा एखादा आवाज या रुग्णांना मात्र अति तीव्रतेचा वाटणे शक्य असते.

कानात सातत्याने हेडफोन घालून बसल्याने कानांमधील दमटपणा वाढतो. त्यामुळे होणारा जंतुसंसर्ग कानाचे दुखणे निर्माण करतो. कानातून पू किंवा पाणी येणे, कानात सतत गच्चपणा जाणवणे असे परिणाम त्यामुळे दिसतात. कानातील मळाच्या गाठी झाल्याने ऐकायला येण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. या सर्व प्रकारच्या आजारांवर वेळीच कानाच्या तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार न घेतल्यास त्याचे रूपांतर बहिरेपणामध्ये होण्याचा धोका आहे. सतत ९० डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेचा आवाज कानावर पडत राहिल्यास किंवा १२० डेसिबल आणि त्यावरील आवाज अचानक कानावर आदळल्यास त्याचा भयंकर परिणाम होऊन ऐकू येण्याची क्षमता कमी होते.

हेडफोन वापर आणि कानाचा बहिरेपणा याप्रमाणेच हेडफोन वापरातून ओढवणारे मानसिक आरोग्याचे प्रश्न हा पैलू नव्याने समोर येत आहे. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निकेत कासार सांगतात, हेडफोन वापराच्या अतिरिक्त आहारी गेलेले रुग्ण स्वत:च्याच विश्वात रमलेले असतात. त्यांचा कुटुंब तसेच बाहेरील जगाशी संपर्क कमी होतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये ‘जजमेंट एरर’ निर्माण झाल्याने अपघातासारख्या गंभीर घटना घडतात. कान हा माहिती संकलनाचा मुख्य स्रोत असल्याने मेंदूतील माहिती संकलनाच्या यंत्रणेवर परिणाम होतात. अनेकदा अशा व्यक्तींवर उपचार करणारे कान- नाक- घसातज्ज्ञ डॉक्टर त्यांना मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी पाठवतात. असे होऊ नये यासाठी कुटुंबाचा परस्पर संवाद महत्त्वाचा आहे. हेडफोनचा वापर करताना व्यक्तींनी स्वत:वर बंधन घालणे गरजेचे ठरते.

काय काळजी घ्यावी?

*  हेडफोनचा वापर अटळ असल्यास आवाजाची तीव्रता कमीतकमी ठेवावी.

*  कानाच्या खोबणीत बसणाऱ्या हेडफोनऐवजी कानाच्या पाळीवर बसणारे हेडफोन वापरावे.

*  आवाजाची तीव्रता रोखणाऱ्या इअर मफचा वापर करावा.

*  हेडफोन वापरणे हा कामाचा भाग असल्यास दर एक तासाने काही काळ कानाला विश्रांती द्यावी.

*  तसे असल्यास नियमितपणे कानाच्या डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी.

*  लहान मुलांना हेडफोन वापरण्यास देऊ नये.

शब्दांकन – भक्ती बिसुरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 4:01 am

Web Title: side effects of wearing headphones for a long time
Next Stories
1 योगस्नेह : बालासन
2 घरचा आयुर्वेद : डोकेदुखी
3 आरोग्यदायी आहार : व्हेगन स्मुदी
Just Now!
X