मुलाचा आईच सांभाळ करते असं नाही, त्याचा बापही त्यात ‘बाप’ असतो. ‘कूल डॅड’ ही बापाची अलीकडची व्याख्या. म्हणजे तो डोळे वटारणारा आणि धाकात ठेवणारा, नाहीतर मातृहृदयाने मुला-मुलीचा सांभाळ करणारा असतो. रविवारी ‘फादर्स डे’च्या निमित्ताने ‘सिंगल डॅड’च्या मुलांनी त्यांचे भावविश्व उलगडले. त्याविषयी..

आज समाजात एकटय़ा पालकाची भूमिका पार पाडणारे बाबा आपल्या सभोवताली पाहायला मिळतात. घटस्फोटामुळे, जोडीदाराच्या अचानक जाण्याने, तसेच काही कारणामुंळे पटत नसल्याने दोघांपैकी एकाकडे मुलांना सांभाळण्याची जबाबदारी येते. मुलांच्या आयुष्यात आई आणि वडिलांची भूमिका फार मगत्त्वाची असते. एकटय़ाने मुलांचा सांभाळ करणे ही कठीण गोष्ट आहे, मात्र अशक्य नाही. आयुष्यात वेळोवेळी मुलांचे संगोपन करताना त्याग करावे लागतात. आतापर्यंत मुलांचा एकटय़ाने सांभाळ करताना महिलेचे ममत्व समाजात विविध माध्यमांतून अधोरेखित करण्यात आले आहे. वृत्तपत्रातील सदरे, चित्रपट आणि साहित्य यातून महिलांच्या योगदानाविषयी सांगितले गेले आहे. परंतु, त्यामुळे पुरुषांचे महत्त्व कणभरही कमी होत नाही. एकाच वेळी बाबा आणि आईची भूमिका बजावणारे वडील हे सुपर कूलच आहेत. ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात तृतीय वर्षांत शिकणाऱ्या मयूरी जाधव हिच्या आईचे काही वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर वडिलांनी तिचा सांभाळ आईप्रमाणे केला. एकाच वेळी आई आणि बाबांचे प्रेम बाबा मला देत असल्याचेही तिने सांगितले. आई गेल्यानंतर वडिलांनी आईची उणीव जाणवू दिली नाही, स्वयंपाक करण्यापासून ते नातेवाईकांची विचारपूस करेपर्यंत सर्व काही बाबा बघत आहेत. आई गेल्यानंतर मी वडिलांच्या जास्त जवळ आले. दररोज घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टी ती त्यांना सांगते. आता माझ्या आयुष्यात बाबा हे माझे चांगले मित्र बनले आहेत, असे मयूरी जाधव हिने सांगितले.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

लहानपणापासून मनात वडिलांची भूमिका ही रागावणारी, काही चूक झाल्यास ओरडणारे अशी असल्याने मुलांच्या मनात बाबाबद्दल आदरयुक्त भावना होती. ती अजूनही असली तरीही अहो बाबापासून अरे बाबापर्यंत हे नाते बदलले आहे. मुलगा आणि पालक यांच्या नात्यात एक प्रकारचे मित्रत्वाचे नाते निर्माण झालेले पाहायला मिळते. म्हणजे इतके नाते मित्रत्वाचे आहे की, बाबांसोबत वाईन पिताना मुलांना कमीपणा वाटत नाही. त्यामुळे सिंगल डॅड त्यांचे बेस्ट फ्रेंड बनलेले आहे. आणि त्यांच्यातील हे बदललेले नाते अतिशय सुखावह आहे. बाबांच्या ऑफिसमधील समस्या, रोजच्या आयुष्यातील किस्से, जुन्या आठवणी मुलांना सांगायला कमी करत नाहीत. भारतीय संस्कृतीने आई आणि वडिलांसाठी काही कर्तव्ये नकळतच ठरवून दिलेली आहेत. जसे, आईने स्वयंपाक करणे, कुटुंबाची काळजी करणे, मुलांना काही हवे नको ते बघणे, तर वडिलांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी उचलणे, मुलांच्या मागण्या पूर्ण करणे. आईने स्वयंपाक केलाच पाहिजे अथवा मुलांची शाळा, अभ्यास याची काळजी केली पाहिजे. मात्र, आई नसतानाही आजचे सुपर बाबा स्वयंपाक करायला लागले आहेत, तर मुलांचा शाळा, अभ्यास, विविध क्लास याकडे लक्ष द्यायला लागले आहेत.

बॉलीवूडमधील एकटे पालक

अभिनेता तुषार कपूर हा बॉलीवूड विश्वातील सगळ्यात पहिला सिंगल पालक आहे. २०१६ मध्ये तुषार कपूरला सरोगसीच्या मदतीने एका मुलाचे पालक होता आले. लक्ष्य हे तुषार कपूरच्या मुलाचे नाव आहे. तर, प्रसिद्ध निर्माता करण जोहरदेखील २०१७ मध्ये सरोगसीच्या मदतीने दोन जुळ्या मुलांचा पिता झाला आहे. करण जोहरला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. करणने मुलाचे नाव यश तर, मुलीचे नाव रुही ठेवले आहे. अभिनेता राहुल देवच्या पत्नीचे २००९ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. तेव्हा राहुलचा मुलगा सिद्धांत फार लहान होता. तेव्हापासून सिद्धांतचा सांभाळ राहुलने केला. सिद्धांत आता १९ वर्षांचा झाला आहे. एकटय़ाने पालकत्वाची भूमिका घ्यायला सिंगल डॅड कचरत नाही. करण जोहर मुलांचे पालक बनणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आणि जबाबदारीची भावना असल्याचे नमूद करतो. ही मंडळी एकटय़ा पालकत्वाची भूमिका चांगल्या रीतीने सांभाळत आहेत. व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून मुलांसोबत दोन क्षण निवांत घालवत आहेत. तसेच आम्ही सिंगल डॅड असल्याचे अभिमानाने सांगत आहेत.

बॉलीवूडचे वडिलांवरील प्रेम

बॉलीवूडमधील सिनेतारकांनीसुद्धा वडिलांसोबत निवांत क्षण घालवून फादर्स डे साजरा केला. सोनम कपूरने वडील अनिल कपूर यांच्यासोबत लहानपणीचे छायाचित्र चाहत्यासोबत प्रसारित केले. त्याचबरोबर सासरे हरीश आहुजा यांना शुभेच्छा देणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारित केला. केदारनाथ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या सारा अली खान हिने इंस्टाग्रामवर सैफ अली खानसोबतचे छायाचित्र टाकून फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्रीती झिंटा, अनुष्का शर्मा, क्रिती सेनन, श्व्ोता बच्चन, करिना आणि करिष्मा कपूर यांनी आपल्या वडिलांसोबत फादर्स डे साजरा केला.

समाजमाध्यमांवरील फादर्स डे

समाजमाध्यमांवरही फादर्स डे अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. रविवारी वटपौर्णिमा, फादर्स डे आणि क्रिकेट विश्वचषकाचा भारत विरुद्घ पाकिस्तान सामना असा दुग्धशर्करा योग जुळून आलेला होता. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअ‍ॅप या सोशल साइट्सवर वडिलांचे फोटो टाकून फादर्स डेच्या शुभेच्छा देणारे संदेश समाजमाध्यमांवर फिरत होते. यानिमित्ताने ट्विटरवर #happyfYathersday, #Zyhero, #dddayisbest, #superdda यासह अनेक हॅशटॅग समाजमाध्यमावर ट्रेंडिंग होते. या वेळेस वटपौर्णिमा असल्याने वडिलांना वडाच्या झाडाची उपमा देणारा संदेश बऱ्याच तरुणांनी फॉरवर्ड केला. जगभरात १६ जून हा फादर्स डे साजरा करण्यात येतो. गुगलने खास डुडलच्या माध्यमातून वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. यावेळेस रंगीबेरंगी सहा हाताचे पंजे असणारे डायनॉसॉर साकारण्यात आले होते.

 

 

वडिलांमुळे तायक्वांदो खेळास प्रोत्साहन 

माझ्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व जास्त आहे. वडील म्हणजे हिम्मत आणि ताकद आहे. आईचे काही वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. त्यानंतर वडिलांनी घराची सूत्रे हाती घेतली. बाबांनी माझ्या आणि भावासाठी घेतलेले कष्ट विसरलेलो नाही. सकाळी पाच वाजता उठून सगळ्यांसाठी नाश्ता करतात. पूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम केल्यावर रात्रीचे जेवण करतात. लहानपणापासून तायक्वांदो हा क्रीडाप्रकार खेळत आहे. आई गेल्यावर बाबांनी तायक्वांदो खेळण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे या क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवणे शक्य झाले. माझ्यासाठी बाबा हे रोल मॉडेल आहेत. -करण सारंग

बाबा माझे हिरो

इयत्ता नववीत असताना आईचे निधन झाले. यानंतर नातेवाईकांनी वडिलांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. परंतु, वडिलांनी दुसरे लग्न करण्यास नकार दिला. तेव्हापासून बाबा माझ्यासाठी हिरो आहेत. आई गेल्यानंतर काही वर्षे खूप त्रास झाला. यातून बाबांनी सावरले. आज माझ्यासाठी आई हेच वडील आहेत. बाबांनी आईची भूमिका बजावली. प्रसंगी घरातील स्वयंपाक करायला शिकले. आयुष्यातील दुखाच्या प्रसंगाना धीराने कसे सामोरे जायचे, कोणत्याही व्यक्तीच्या जाण्याने जगणे सोडायचे नसते हा आयुष्याचा मूलमंत्र शिकवला. आणि त्यांची शिकवण प्रत्येक क्षणात उपयोगी पडत आहे. प्रसंगी स्वत:च्या इच्छा, आकांक्षांना मुरड घालून मुलांचे संगोपन करणाऱ्या हिरोचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. – सिद्धी दळवी

संकलन : मानसी जोशी, पूर्वा साडविलकर