13 December 2019

News Flash

काळजी उतारवयातली : झोपेच्या समस्या

झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो.

डॉ. नीलम रेडकर

झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. झोप आणि मेंदू यांचा निकटचा संबंध आहे. शरीराला आणि मेंदूला विश्रांती देण्यासाठी झोपेची गरज आहे. रात्रीची सहा ते आठ तास शांत झोप आवश्यक मानली जाते. झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो.

उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार, मानसिक आजार इत्यादी समस्या भेडसावतात. अति झोप आरोग्यासाठी घातक ठरू शकते. अति झोपेमुळे कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो, तसेच एकाग्रता आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये बऱ्याच प्रमाणात झोपेच्या समस्या आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम आढळून येतात.

झोप न येणे किंवा निद्रानाश

निद्रानाश म्हणजे झोप उडणे. वेळेवर झोप न येणे, झोप आल्यानंतर बराच वेळ न टिकणे, झोपेतून उठल्यावरसुद्धा झोप पूर्ण न झाल्यासारखी वाटणे, अर्ध्या झोपेतून जाग येऊन परत झोप न येणे, इच्छित वेळेपूर्वी जाग येणे, दिवसा झोप येणे ही निद्रानाशाची लक्षणे आहेत.

झोप न येण्याची कारणे –

* धावपळ, ताणतणाव, आधुनिक जीवनशैली

* तीव्र वेदना, कर्करोग

* थायरॉइडचा आजार- संप्रेरकाचे वाढलेले प्रमाण

* स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन संप्रेरकाचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे निद्रानाशाचा त्रास जाणवतो.

* रेस्टलेस लेग सिंड्रोम- या आजारात पायांमध्ये शांत बसल्यावर किंवा पलंगावर आडवे झाल्यावर वेदना होतात.

* मानसिक आजार किंवा नैराश्य

* औषधांचे दुष्परिणाम

* कॅफिनयुक्त पदार्थाचे अति सेवन.

झोप येण्यासाठी चांगल्या सवयी-

* रात्री उशिरा आणि जड जेवण घेऊ नये. रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात दोन तासांचे अंतर असावे.

* झोपण्याआधी दोन तास तंबाखू, मद्य आणि कॉफीचे सेवन टाळा.

* झोपेपूर्वी खूप व्यायाम करू नका.

* झोपण्याच्या खोलीतील वातावरण शांत आणि आल्हाददायक ठेवा.

* झोपायच्या आधी अर्धा तास टी. व्ही. किंवा मोबाइल पाहाणे टाळा.

* झोपेच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. या गोळ्यांच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त असते. ज्या रुग्णांना श्वसनमार्गातील अडथळय़ांमुळे झोपेचा त्रास आहे, तो झोपेच्या गोळ्यांमुळे वाढतो. झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरावीक ठेवणे.

अति झोप किंवा अतिनिद्रा

ज्या व्यक्तींना अति झोपेचा त्रास आहे त्यांना रात्री पुरेशी झोप होऊनही दिवसा झोपाळलेल्या अवस्थेत असतात. दिवसा झोपाळूपणा असल्यास तो आळशीपणा नसून निद्राविकार आहे. निरुत्साही वाटणे, थकल्यासारखे वाटणे, विचारात स्पष्टता नसणे, लक्षात न राहाणे इत्यादी अति झोपेची लक्षणे आहेत.

निद्रानाशाचे दुष्परिणाम

* डोळ्याखाली काळे डाग येणे, डोळ्याखालील त्वचा सुजणे, हृदयविकार, उच्च रक्तदाब

* मानसिक आजार- नैराश्य येणे

* स्मरणशक्ती कमी होणे, निर्णयक्षमता घटणे.

* वजन घटणे.

First Published on August 6, 2019 2:14 am

Web Title: sleep disorders sleep problems causes diagnosis and treatments zws 70
Just Now!
X