13 December 2019

News Flash

समाजशील माध्यम

आजकाल ज्ञान मिळवायचे असेल तर तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, असा एक समज रूढ झाला आहे

शामल भंडारे

समाजाशी संवाद साधायचा, पण समाजमाध्यमांशिवाय! काहींना ही कल्पनाच करवत नसेल. मात्र काहीही असो. काहींनी तसा पण केलाय. दूरवरचा माणूस जोडण्यासाठी समाजशील होण्याच्या या प्रक्रियेविषयी..

आभासी जगाच्या माध्यमातून माणसाला जोडणारा आणि प्रत्यक्ष आयुष्यात एकमेकांपासून तोडणारा ‘स्मार्टफोन’ किती कमाल करतो नाही? लहानांपासून तरुण आणि वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनलेल्या या स्मार्टफोनने जगण्याच्या वास्तवात एक वेगळेच जग निर्माण केले आहे. यात समाजमाध्यमांचा एक प्रचंड मोठा प्रवाह आहे. मात्र या प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारी तरुण मंडळी आपल्याच वयाच्या तरुणांसाठी आदर्श ठरत आहेत. इतर मित्रमैत्रिणी समाजमाध्यमांवरील ‘टेन इयर्स चॅलेंज’, ‘बुक चॅलेंज’, इत्यादींच्या मागे धावत असताना काही जण समाजमाध्यमांपासून फारकत घेण्याचे आव्हान स्वीकारतात. इतकेच नाही तर हे आव्हान यशस्वीरीत्या पूर्णही करून दाखवतात.

आजकाल ज्ञान मिळवायचे असेल तर तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही, असा एक समज रूढ झाला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रोजेक्टर, संगणक, आयपॅड वापरूनच अध्यापन आणि अध्ययन होते. समाजमाध्यमांपासून दूर राहायचा विचार जरी मनात आला तरी आपण जगाच्या मागे राहू अशी भीती तरुण मुला-मुलींना वाटते. मात्र या तंत्रज्ञानाला व्यसन न बनू देता त्याचा मर्यादित वापर करणारे किंवा त्यापासून पूर्णपणे दूर राहणारे तरुणही आयुष्यात कुठेच मागे पडत नाहीत. कोणत्याही सामाजिक, राजकीय मुद्दय़ावर ते आपले विचारपूर्वक मत अतिशय आत्मविश्वासाने मांडतात. या मुलांचा सगळा भर वाचन, श्रवण, निरीक्षण यावर असतो. वर्तमानपत्र, बातम्या, अभ्यासिकांचे विविध अ‍ॅप्लिकेशनद्वारे ते आपले ज्ञान अद्ययावत करतात. यामुळे समाजमाध्यमांवर येणाऱ्या अर्धवट बातम्या, अफवा यांपासून दूर राहात समाजमान्य अशाच गोष्टींकडे मुलांचा कल असतो. त्यामुळे इतरांपेक्षा त्यांची चांगल्या-वाईटाची समज अधिक प्रगल्भ असते. कोणत्याही अडचणीतून ते सहजरीत्या, चिडचिड न करता मार्ग काढू शकतात. एखाद्या सुंदर खाद्यपदार्थाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यापेक्षा त्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो. फेसबुकवर आपल्या कविता शेअर करण्याची सवय अनेकांना असते. मात्र ती कविता वाचणारे सगळेच रसिक नसतात. त्यामुळे त्यातील ओळींचे काही भलतेच अर्थ काढले जातात किंवा त्याकडे दुर्लक्ष तरी केले जाते. त्यापेक्षा फेसबुकचा वापर न करणारी मंडळी स्वरचित कविता, लेख यांचे वाचन महाविद्यालयाच्या समारंभांमध्ये करतात. तेथे त्यांना खरे रसिक भेटतात. तसेच रसिकांकडून मिळणारी थेट दाद आत्मविश्वास वाढवते.

फोन न वापरणे हे स्वत:साठी सोयीचे वाटत असले तरीही ते इतरांसाठी त्रासदायक ठरू शकते. एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायची असल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात फोन न वापरणारे इतरांसाठी गैरसोयीचे ठरतात. त्यामुळे अगदीच फोन न वापरण्यापेक्षा हातात आलेला फोन चांगल्या पद्धतीने वापरण्यावर भर दिला जातो. अजूनही बाजारात साधे फोन उपलब्ध आहेत. शिवाय स्मार्टफोन वापरतानाही तो गरजेपुरताच वापरण्याचा पर्याय असतो. पण हे आव्हान स्वीकारण्यासाठी मुळात आकर्षणांवर मात करता आली पाहिजे. सभोवताली सर्व जण फोन वापरत असताना आपल्याकडे फोन नाही याचे वाईट वाटून घेणे थांबवले पाहिजे. गाणी ऐकण्यासाठी रेडिओ वापरता येईल. तसेच छायाचित्रणाची आवड असल्यास कॅमेरा वापरता येईल. वेळ पाहण्यासाठी घडय़ाळ तर असतेच. एखादा खेळ किंवा कला शिकून घेतल्यास त्यात मन रमवता येते. नाहीतर वाचनाचा पर्यायही उत्तमच आहे. तंत्रज्ञानापासून स्वत:ला दूर ठेवल्यानंतर आपल्या माणसांच्या जवळ जाणे सहज सोपे होते. मात्र त्यासाठी हवा फक्त संयम आणि निर्धार.

प्रचंड मोठा मित्रपरिवार असून त्याचबरोबर उच्चशिक्षण सुरू  असूनदेखील माझ्या नंबरचे व्हॉट्सअ‍ॅप खाते नाही ही बऱ्याच जणांना न पचणारी गोष्ट आहे. महाविद्यालयाचा पुढारी, जिल्हा स्पोर्ट्स असोसिएशनचा सदस्य आणि त्याचबरोबर पर्यटन सहलींचे आयोजन करण्याची जबाबदारी यांसारख्या कामांमुळे अनेकांसोबत सातत्याने संपर्क  साधण्याची वेळ येते. अशा वेळेस माझा नंबर आणि ईमेल एवढय़ाच गोष्टी मी देते. समाजमाध्यमांवर माझं अस्तित्व नसलं तरीदेखील मला कधीच अलिप्त झाल्यासारखं वाटत नाही. स्वत:वरील या सर्व मर्यादांमुळे मला माझ्या अभ्यासाला आणि शिक्षणाला न्याय देता येतो. अतिशय मर्यादित मार्गानी आपली कामं साध्य करता येतात हे मी या प्रयोगातून शिकलो.

– कौस्तुभ नाईक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना मला स्मार्टफोनची गरज नक्कीच भासते. हे जरी खरं असलं तरी मी कोणत्याही समाजमाध्यमांवर नाही. माझ्या मते समाजमाध्यमांवर एकमेकांशी वायफळ बोलणे आणि एकमेकांनी पोस्ट के लेल्या छायाचित्रांवर व्यक्त होणे यापलीकडेही एक वास्तव जग आहे आणि या जगालाच आजची तरुणाई मुकलेली आहे. खरंतर शिक्षणाच्या प्रवाहात आलेला माणूस आपसूकच या आकर्षणापासून स्वत:ला लांब ठेवू शकतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. ध्येय निश्चित असल्यामुळे मी गेल्या वर्षभरापासून हे आव्हान पेलतो आहे.      

– किरण खाडे

खरंतर समाजमाध्यमांपासून लांब राहण्याचं आव्हान मी काही वर्षांपूर्वीच स्वत:ला दिलं होतं. सुरुवातीला हा स्वत:वर के लेला एक प्रयोग होता. आपण एखाद्या गोष्टीवर किती विसंबून आहोत हे पाहण्याचा हा प्रयोग. मी पुण्यात घरापासून दूर राहात असल्यामुळे साधा मोबाइल संपर्कोसाठी वापरत होते. स्मार्टफोन आणि समाजमाध्यमांपासून स्वत:ला लांब ठेवण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण एखाद्या गोष्टीच्या कितपत आहारी गेलोय हेच बघणं आहे. माझ्या मते प्रत्येकाने हे तपासून पाहावं. कोणीही कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणं अतिशय चुकीचं आहे आणि माझ्या मित्रपरिवारालासुद्धा मी हेच पटवून देते. समाजमाध्यमांपासून लांब असताना मी माझ्या भावना माझ्या दैनंदिनीमध्ये मांडायचे. यामुळे स्वत:शीच संवाद साधता येतो.    

– श्रद्धा बारबोले

समाजमाध्यमांपासून स्वत:ला वेगळं ठेवणं आणि साधा मोबाइल वापरणं यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही. मला अनेकदा मित्र विचारतात, ‘अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांला असूनही स्मार्टफोनच्या बाबतीत एवढा संयम?’ खरं सांगायचं झालं तर आपले पालक आपल्यासाठी चांगलाच विचार करतात. त्यांनी माझं भविष्य पाहिलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी हा निर्णय घेतला आहे. माझ्या इतर गरजेच्या गोष्टीची मी मोबाइलमधल्या ब्लूटूथद्वारे देवाणघेवाण करतो. स्मार्टफोन न वापरल्याने एक मोठा फरक असा झाला आहे की, मला इतरांच्या तुलनेत स्वत:साठी पुरेसा वेळ मिळतो. ज्यात मी चालू घडामोडी आणि स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देऊ  शकतो. माझ्या मित्रांनीसुद्धा या प्रयोगाचा अनुभव घ्यावा असं मनापासून वाटतं.

 – भावेश उपाध्याय

First Published on August 7, 2019 3:50 am

Web Title: smartphone for communicate with the community zws 70
Just Now!
X