|| डॉ. नीलम रेडकर

४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जगभरात कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण कण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात. या वर्षीचे घोषवाक्य ‘आय कॅन, आय विल’ हे आहे. एकतृतीयांश कर्करोग जीवनशैलीतील बदल केला तर आपण रोखू शकतो.

कर्करोग होण्याचा धोका वयाच्या ५५ वर्षांनंतर वाढतो आणि जसे वय वाढते, तसे कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचेही प्रमाण वाढते. म्हणूनच कर्करोगाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा सहभाग आणि जागरूकता महत्त्वाची आहे, हेच या वर्षीच्या घोषवाक्यतातून अभिप्रेत आहे.  शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग होतो. कर्करोग हा कोणत्याही पेशीमध्ये आणि अवयवांमध्ये होऊ शकतो.

कर्करोगाचे प्रकार

सौम्य कर्करोग

  • या विकारात टय़ूमरच्या पेशी इतर अवयवांमध्ये पसरून नवीन गाठी तयार करत नाही. ही गाठ सहज काढून टाकता येते. म्हणूनच हा टय़ूमर प्राणघातक नाही.

घातक कर्करोग

  • या कर्करोगाच्या गाठी सभोवताच्या व दूरवरच्या अवयावांमध्ये रक्तवाहिन्या आणि लसिका संस्थेच्या माध्यमातून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात.

पुरुषांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारे कर्करोग

  • पुरुषांमध्ये प्रोस्टेट, फुप्फुसे, मोठे आतडे, मूत्राशय आणि मेलानोमा हे कर्करोग आढळून येतात.

  स्त्रियांमध्ये आढळून येणारे कर्करोग

  • स्त्रियांमध्ये स्तन, फुप्फुसे, मोठे आतडे, गर्भाशय आणि थायरॉइड या अवयवांमध्ये होणारे कर्करोग आढळून येतात.

कर्करोगाची कारणे

  • तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानाचे व्यसन- एकतृतीयांश कर्करोग तंबाखू ओढल्याने, चघळल्याने किंवा अप्रत्यक्षपणे तंबाखूच्या संपर्कात आल्याने होतात. धूम्रपानामुळे फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. धूम्रपान किती वर्षे चालू आहे आणि किती खोलवर धूर फुप्फुसांमध्ये जातो यावर धूम्रपानामुळे होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण अवलंबून आहे. दररोज दहा सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीमध्ये १० पटीने धूम्रपानांमुळे होणारे आजार वाढतात. धूम्रपान सोडल्यास त्यामुळे होणाऱ्या कर्करोगाची शक्यता कमी होते. तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानामुळे स्वरयंत्र, घसा, फुप्फुसे, तोंड, अन्ननलिका, स्वादुपिंड, जठर, यकृत, प्रोस्टेट आणि मूत्राशयांच्या कर्करोगाचा धोका असतो.
  • दारूचे व्यसन – दारूच्या व्यसनामुळे यकृत, तोंड, घसा, स्वरयंत्र आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाची शक्यता वाढते. मद्याचे सेवन केल्यानंतर अ‍ॅसिटाल्डीहाइड नावाचे घातक कार्सिनोजन शरीरात तयार होते, जे डीएनएला इजा करून कर्करोगाचा धोका वाढवतो. तसेच जनुकीय बदलांमुळे काही व्यक्तींमध्ये, मद्यसेवनामुळे होणाऱ्या कर्करोगाचा धोका जास्तच वाढतो.
  • जनुकीय कारणे- स्तन, बीजांड, प्रोस्टेट आणि मोठय़ा आतडय़ांचा कर्करोग हा काही कुटुंबांमध्ये जनुकीय कारणांमुळे आढळून येतो. जीवनशैली आणि पर्यावरणातील बदल यांमुळे जनुकीय बदल होऊन कर्करोग होऊ शकतो. जनुकीय कारणाने आलेले जनुकीय बदल पुढच्या पिढीत असले म्हणजे त्यांना कर्करोग होईलच असे नाही पण त्यांच्यामध्ये कर्करोग होण्याची शक्यता वाढते.
  • आहार-अति तेलकट आहारामुळे मोठे आतडे, गर्भाशय आणि प्रोस्टेटचा कर्करोग होऊ शकतो. संशोधनाद्वारे तेलकट आहाराचा कर्करोगाशी संबंध काही प्रमाणात सिद्ध झाला आहे. लठ्ठपणामुळे शरीरातील इस्ट्रोजनची पातळी वाढते आणि स्तनांच्या कर्करोगाची शक्यतासुद्धा वाढते. आहारातील जादा उष्मांकाचासुद्धा स्तनांच्या कर्करोगाशी संबंध आढळून आला आहे.