मोबाइलमधील संपर्क जीमेलमध्ये कसे समाविष्ट करायचे?

सचिन चौधरी

तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल तर अगदी सहजपणे तुम्ही तुमच्या मोबाइलमधील संपर्क गुगलच्या खात्याशी जोडू शकता. यासाठी तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जा. तेथे ‘अकाऊंट अ‍ॅण्ड सिंक’ हा पर्याय दिसेल. या पर्यायात ‘अ‍ॅड अकाऊंट’ या बटणावर क्लिक करा. तेथे ‘गुगल’ लिहिलेला पर्याय निवडा. पुढे तुमच्या गुगल खात्यात ‘साइन इन’ करा. तुम्ही ‘साइन इन’ यशस्वीपणे पूर्ण करताच तुम्हाला ‘सिंक कॉन्टॅक्ट’ (Sync Contacts) हा पर्याय दिसेल. तो निवडून ‘फिनिश’ बटणावर क्लिक करा. तुमच्या मोबाइलमधील संपर्क क्रमांक तुमच्या जीमेल खात्याशी आपोआप जोडले जातील.

माझा मोबाइल धिमा झाला आहे आणि मला अ‍ॅण्ड्रॉइड मार्शमेलोनंतर कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट मिळालेले नाहीत. मग मोबाइलचा वेग वाढवण्यासाठी कोणते अ‍ॅप उपलब्ध आहे का?

गिरीश औटी

मोबाइल धिमा होण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण जुनाट झालेले सॉफ्टवेअर असू शकते. तुमच्या मोबाइलवर ‘मार्शमेलो’नंतर कोणतेही सॉफ्टवेअर अपडेट आलेले नाहीत. याचाच अर्थ कंपनीने संबंधित मोबाइल मॉडेलसाठी ‘अपडेट’ जारी केलेले नाहीत. अशा स्थितीत तुमचा नाइलाज आहे. मात्र, तुम्ही तुमच्या मोबाइलमधील काही डेटा हटवून किंवा अ‍ॅप अनइन्स्टॉल करून मोबाइलचा वेग वाढवू शकता. ‘प्ले स्टोअर’वर काही अ‍ॅप्स आहेत जे, मोबाइलचा वेग वाढवण्याचा दावा करतात. मात्र, हे अ‍ॅप तुमच्या मोबाइलवरील अनावश्यक डेटा हटवण्याची सूचना देण्यापलीकडे काहीही वेगळे करत नाहीत. त्यामुळे तुम्ही स्वत:च मोबाइलमधील स्टोअरेज स्पेस कमी करणे उपयुक्त ठरेल.