व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

मोटारीच्या जन्मापासूनच वेगाचे विक्रम करण्याची परंपरा सुरू झाली. वेगाचे हे नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नातून मग स्पोर्ट्स कार, सुपर कार, हायपर कार यांची निर्मिती करण्यात आली. १८९४ मध्ये निर्माण केलेली जगातील पहिली प्रोडक्शन कार बेंझ वेलो या गाडीचा वेग १२ किमी प्रतितास एवढा होता. काळानुरूप मोटार आणि इंजिनमध्ये सुधारणा झाल्या आणि आज आपण हायपर कारच्या युगात पोहोचलो आहोत. परंतु भूतलावर वेगाचे खरे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या महामोटारी कोणत्या याबाबत अनेकांना उत्सुकता असते.

वेग आणि मोटारीचे एक अतूट नाते आहे. दैनंदिन वापराच्या मिड सेगमेंट, स्मॉल सेगमेंट गाडय़ांऐवजी कधी पोर्श, किंवा फेरारी रस्त्यावर दिसलीच तर या गाडीचा स्पीड काय असेल हा पहिला आणि या गाडीची किंमत काय असेल हा दुसरा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत असेल.  गाडीच्या वेगातच त्याचा खरा रोमांच असतो. म्हणूनच इंजिनचा आकार, क्षमता वाढवून गाडीची बॉडी हलकी करून आज सुपर कार जन्माला घातल्या जात आहेत. अभूतपूर्व वेगाच्या अनुभूतीसाठी लॅम्बोर्गिनीने गाडीतून सीट आणि वातानुकूलित यंत्रणादेखील हद्दपार केली आणि बॉडीमध्ये अधिकाधिक कार्बन फायबरचा वापर करून सेस्टो एलेमेंटो या मोटारीची निर्मिती केली. मात्र ही गाडी जगात सर्वाधिक वेगवान समजल्या जाणाऱ्या गाडय़ांच्या आसपास देखील नाही. २०१० मध्ये बाजारात दाखल झालेल्या कोनिंगसेग अगेरा आरएस या हायपर कारला जगातील सर्वात वेगवान मोटार मानले जाते. या मोटारीचा वेग प्रतितास ४१७ किमी एवढा भन्नाट आहे. बुगाटीच्या वेरॉनला देखील हा बहुमान दिला गेला होता. वेरॉनने जुलै २०१० मध्ये प्रतितास ४३१ किमी एवढा वेग गाठला होता. मात्र या गाडीच्या वेगावर नियंत्रण आणणाऱ्या यंत्रणेत बदल करण्यात आल्याचे निदर्शनात आल्यानंतर मोटारीच्या तंत्रज्ञानात फेरबदल केल्याच्या कारणाने या गाडीला बाद ठरवण्यात आले. त्यानंतर सध्या अनौपचारिकपणे जगातील सर्वात वेगवान असणारी गाडीदेखील बुगाटीचीच असून या मॉडेलचे नाव चेरॉन सुपर स्पोर्ट ३००+ आहे. या गाडीचा वेग प्रतितास ४९० किमी आहे. मात्र ही उत्पादनातील मोटार नसून एक प्रोटोटाइप असल्याने या गाडीला सर्वात वेगवान मोटारींच्या यादीत स्थान दिले गेले नाही.

या मोटारीने वेगाचे नवे मापदंड प्रस्थापित केले. मात्र या गाडय़ांवर प्रोडक्शन कार, स्ट्रीट लीगल स्पोर्ट्स कार अशी अनेक बंधने येतात. म्हणून एका ठरावीक चौकटीत राहूनच या गाडय़ा वेगविक्रम घडवीत असतात. म्हणून जगातील सर्वाधिक वेगवान मोटारींमध्ये वरील कुठलीच मोटार येत नाही. त्या मोटारी म्हणजे लँड स्पीड रेकॉर्ड वेहिकल. कोणतेही बंधन नसलेल्य्या या मोटारी केवळ वेगाचे विक्रम घडवण्यासाठी निर्माण केल्या जातात.

जगातील सर्वाधिक वेगवान मोटारीचा विक्रम सध्या थ्रस्ट एसएससी या मोटारीच्या नावावर आहे. या मोटारीला थ्रस्ट सुपरसॉनिक कार म्हणून देखील ओळखले जाते. ही गाडी ब्रिटिश जेट कार निर्माते रिचर्ड नोबल, ग्लेन बोवशर, रॉन अयर्स आणि जेरेमी ब्लिस्स यांनी तयार केली आहे. जेट कार या मोटार प्रकारात मोटारीला जेट इंजिनमधून ताकद मिळते. या जेट कार सहसा ड्रॅग रेसिंगसाठी वापरल्या जातात. ड्रॅग रेसमध्ये एका ठरावीक कालावधीत आणि ठरावीक अंतरात अधिकाधिक वेग गाठण्याचे काम या मोटारींना करायचे असते.

थ्रस्ट एसएससीने १५ ऑक्टोबर १९९७ मध्ये वेगाचा जागतिक विक्रम घडवला. या मोटारीचा वेग होता ७६३ माईल्स प्रतितास म्हणजे १२२८ किमी प्रतितास. अमेरिकेतील नेवाडाच्या ब्लॅक रॉक डेजर्टमध्ये या गाडीने हा विक्रम केला होता. या गाडीचे चालक ब्रिटनच्या हवाई दलाचे विंग कमांडर अँडी ग्रीन हे होते. ध्वनीच्या वेगाहून अधिक गती असलेले हे जमिनीवर धावणारे पहिले वाहन आहे. ही मोटार १६.५ मीटर लांब असून ३.७ मीटर रुंद आहे. गाडीचे वजन १० टन आहे. गाडीला रोल्स रॉयस कंपनीचे इंजिन होते. या गाडीच्या ताकदीची, कार्यक्षमतेची, इंधन वापराची गणिते ही साधारण गाडय़ांहून पूर्णपणे वेगळी असतात. गाडीची ब्रेकिंग यंत्रणा वेगवेगळ्या टप्प्यात विभागलेली असते. गाडीला नियंत्रणात आणण्यासाठी पॅराशूटची आवश्यकता असते. या गाडीचा विक्रम मोडण्यासाठी ब्लडहाऊंड एसएससी ही गाडी तयार केली आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये या गाडीची चाचणी देखील झाली. थ्रस्ट एसएससीचा विक्रम ही गाडी मोडते का हे पाहण्यासाठी आपल्याला अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

vaibhavbhakare1689@gmail.com