11 July 2020

News Flash

महोत्सवांवर मंदीची छाया

कारण महोत्सवाच्या आयोजनासाठी कराव्या लागणाऱ्या निधी संकलनामध्ये प्रायोजकत्व देण्यास कंपन्या, उद्योगांकडून हात आखडता घेतला जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

|| चिन्मय पाटणकर

बाजारपेठेतील मंदीसदृश वातावरणाची छाया महाविद्यालयीन महोत्सवांवरही पडली आहे. महाविद्यालयीन महोत्सव आयोजित करण्यासाठी कंपन्यांकडून प्रायोजकत्व मिळत नसल्यानं आयोजक विद्यार्थ्यांना निधी संकलनासाठी धडपड करावी लागत आहे.

दिवाळी झाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये वेध लागतात ते महोत्सवांचे.. क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव, तंत्रज्ञान महोत्सव अशा विविध आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचे महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून आयोजन केले जाते. मात्र, यंदाच्या महोत्सवांवर बाजारपेठेतील मंदीची छाया असल्याचे चित्र आहे. कारण महोत्सवाच्या आयोजनासाठी कराव्या लागणाऱ्या निधी संकलनामध्ये प्रायोजकत्व देण्यास कंपन्या, उद्योगांकडून हात आखडता घेतला जात आहे.

सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे, रंगीबेरंगी वातावरण असते. साडी डे, चॉकलेट डे, ट्रॅडिशनल डे असे विविध दिवस विद्यार्थी साजरे करत असतात. त्याशिवाय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, महोत्सव हा सुद्धा महाविद्यालयीन जीवनातला आकर्षणाचा भाग असतो. महोत्सवाच्या आयोजनापासून निधी संकलनापर्यंत सारं काही विद्यार्थीच पुढाकारातून करतात. काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. पण काही महाविद्यालयांकडून महोत्सवासाठी निधी दिला जात नसल्याने विद्यार्थी स्वतच निधी उभा करतात. या महोत्सवांच्या निमित्तानं विविध समित्या नेमल्या जातात. प्रत्येक समितीवर एक विशिष्ट जबाबदारी सोपवली जाते. त्यात खर्चाचं अंदाजपत्रक तयार करणं, विविध कंपन्या, उद्योजकांकडे जाऊन त्यांना महोत्सवाची संकल्पना समजावून निधी संकलन करणं, महाविद्यालयीन संघांच्या प्रवेशिका, स्पर्धक संघांचं नियोजन, प्रत्यक्ष कार्यक्रम आणि खाद्य व्यवस्थापन, पाहुण्यांना आमंत्रित करणं अशी सगळीच कामं या समित्यांच्या माध्यमातून होतात. जवळपास दोन-तीन महिने महोत्सवाचं काम सुरू असतं. दिवस-रात्र एक करून विद्यार्थी आपली जबाबदारी पार पाडून महोत्सवासाठी झटत असतात. एक महोत्सव आयोजित करण्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना विपणन, निधी संकल्पन, व्यवस्थापन, आयोजन, आर्थिक व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. जो त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यातही उपयोगी पडतो.

आता महोत्सवांचे वारे महाविद्यालयांमध्ये वाहू लागले आहेत. मात्र, यंदाची परिस्थिती काहीशी वेगळी आहे. देशभरात मंदीसदृश स्थिती आहे. वाहन उद्योग, स्थावर मालमत्ता अशा काही उद्योग क्षेत्रांना मंदीसदृश वातावरणाचा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत विविध स्तरांवर कंपन्या अडचणीत सापडल्या आहेत. नामांकित कंपन्या, उद्योगांकडून मिळणारं प्रायोजकत्व हा विद्यार्थ्यांच्या महोत्सवाच्या निधी संकलनातील महत्त्वाचा घटक असतो.

पण कंपन्यांपुढेच आर्थिक अडचणी असल्याने विद्यार्थ्यांना महोत्सवासाठी प्रायोजकत्व देण्यात कंपन्यांकडून हात आखडता घेतला जात आहे. वास्तविक काही कंपन्यांसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी हा लक्ष्यकेंद्रित ग्राहक (टार्गेट ग्रुप) असतो. त्यामुळे कंपन्यांकडून महोत्सवासाठी प्रायोजकत्व देताना नव्या ग्राहकांना जोडणे हा हेतू असते. मात्र, मंदीसदृश वातावरणात विद्यार्थ्यांच्या महोत्सवावर निधी खर्च करण्यापेक्षा बचत करण्यावर कंपन्याकडून भर देण्यात येत आहे. स्वाभाविकच महोत्सवासाठी निधी संकलन कसे करायचे, महोत्सवासाठीची निधीची निकड कशी भागवायची, असे विद्यार्थ्यांपुढे प्रश्न आहे. प्रायोजकत्वाशिवाय अन्य कोणत्या पद्धतीने निधी जमा करता येईल का, याचा शोध घेतानाच निधी उपलब्ध न झाल्यास महोत्सवाचे अंदाजपत्रक कमी करण्याच्या दृष्टीने काही बदल करायचे का, याचा विचारही आयोजक विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

आमच्या ‘डायमेन्शन्स’ या महोत्सवासाठी साधारणपणे १५ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले आहे. पण सध्याच्या मंदीसदृश वातावरणामुळे महोत्सवासाठीचा निधी जमा करण्यात मर्यादा येत आहेत. अनेक नामांकित कंपन्या, ब्रँड्सकडून प्रायोजकत्व देण्यास नकार मिळत आहे. त्यामुळे आम्हाला अन्य पर्याय शोधावे लागत आहेत. एकाच कंपनीकडून मोठी रक्कम घेण्यापेक्षा जास्त ठिकाणहून छोटी रक्कम घेऊन मोठी रक्कम उभी करता येईल का, या दृष्टीने आम्ही प्रत्नशील आहोत. – अथर्व कुलकर्णी, वझे-केळकर महाविद्यालय, मुलुंड

महोत्सवासाठी आम्ही विद्यार्थीनीच स्वतच थोडी रक्कम जमा करतो. त्याशिवाय प्रायोजकत्वाच्या माध्यमातून निधी उभा करण्याचा प्रयत्न असतो. पण नोटाबंदी झाल्यानंतर निधी मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. गेल्यावर्षीही आमच्या महोत्सवासाठी पुरेसा निधी जमू शकला नव्हता. यंदाही तशीच काहीशी स्थिती आहे. बाजारपेठेतल्या मंदीसदृश वातावरणाचा हा परिणाम आहे, असं वाटतं.  – राधिका काळबांडे, डॉ. भानूबेन नानावटी वास्तुरचना महाविद्यालय, पुणे

 

‘माइंडस्पार्क’ महोत्सवासाठी साधारणपणे ६० लाखांचे अंदाजपत्रक असतं. स्पर्धकांचे शुल्क, प्रायोजकत्व व माजी विद्यार्थ्यांची देणगी हे तीन निधी संकलनासाठीचे स्रोत असतात. महोत्सव बरीच वर्षे होत असल्याने निधी संकलनासाठी फार अडचण येत नाही. कारण काही कंपन्या महोत्सवाशी बऱ्याच वर्षांपासून जोडल्या गेल्या आहेत. मात्र, या वर्षी मंदीसदृश वातावरणामुळे नवीन कंपन्यांकडून महोत्सवासाठी प्रायोजकत्व मिळू शकले नाही. – अथर्व कापडणीस, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 1:07 am

Web Title: sports festival cultural festival technology festival akp 94
Next Stories
1 सिमला मिरची सूप
2 हे करू? ते करू? नेमकं काय करू?
3 मधुमेह आणि आहार
Just Now!
X