25 May 2020

News Flash

क्रीडा क्षेत्रातील अनुभवी तेजांकित!

तीन अपत्यांना जन्म दिल्यानंतरही ३६ वर्षीय मेरी कोम आजही बॉक्सिंगमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकावत आहे.

ऑफ द फिल्ड : ऋषिकेश बामणे

भारताचा नामांकित टेनिसपटू लिएंडर पेसने काही दिवसांपूर्वीच वयाच्या ४६व्या वर्षीसुद्धा ग्रँडस्लॅम आणि ऑलिम्पिकसारख्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्याच्याप्रमाणेच असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी वयाची तिशी-चाळिशी ओलांडल्यानंतरही निवृत्ती न पत्करता स्वत:ची तंदुरुस्ती राखून खेळ सुरू ठेवला. अशाच ताऱ्यांचा वेध..

भारताची ‘सुपरमॉम’

तीन अपत्यांना जन्म दिल्यानंतरही ३६ वर्षीय मेरी कोम आजही बॉक्सिंगमध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकावत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत तिला सातव्या सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असली तरी, मेरीची तंदुरुस्ती आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार विजेती मेरी भारतातील अनेक महिलांसाठी प्रेरणास्रोत म्हणून उदयास आली असून भविष्यातही ती अशाचप्रकारे बॉक्सिंगमध्ये देशाचे नाव उज्ज्वल करत राहील, यात शंका नाही.

वेगाचा बादशाह बोल्ट

जमैकाचा धावपटू उसेन बोल्टने कारकीर्दीत ८ ऑलिम्पिक आणि ११ जागतिक सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली. २०१७च्या जागतिक स्पर्धेनंतर त्याने निवृत्ती पत्करली असली तरी त्याचे स्थान आजही क्रीडाप्रेमींच्या मनात कायम आहे. पुरुषांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील ९.५८ सेकंदांचा विक्रम अद्यापही बोल्टच्या नावावर अबाधित आहे.

‘फेडरर’ एक्स्प्रेसची अखंड घोडदौड

तब्बल २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांना गवसणी घालणारा स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर वयाच्या ३८व्या वर्षीही एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल, असा खेळ करत आहे. जानेवारी २०१८मध्ये ज्या वेळी फेडररने अखेरचे ग्रँडस्लॅम जिंकले, तेव्हा अनेक चाहत्यांना फेडरर आता निवृत्त होणार, असे वाटू लागले. परंतु त्यानंतरही फेडररने मागे न वळता घोडदौड सुरू ठेवली. या वर्षीच्या विम्बल्डन अंतिम फेरीत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी नोव्हाक जोकोव्हिचविरुद्ध त्याने केलेला खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. त्यामुळे आता २०२०च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये फेडरर काय कमाल करतो, याकडे सर्व टेनिसप्रेमींचे लक्ष लागले आहे.

भारतीय क्रिकेटचा महानायक

महेंद्रसिंह धोनी या नावातच भारतातील बहुतांश क्रिकेटप्रेमींचे संपूर्ण विश्व सामावले आहे. ३८ वर्षीय धोनीहूनही वयाच्या चाळिशीनंतर क्रिकेट खेळणारे तसे अनेक खेळाडू होते आणि आहेतही. परंतु आजही धोनीची तंदुरुस्ती आणि यष्टीमागील चपळता त्याला इतरांपासून नक्कीच वेगळे करते. जवळपास वर्षभरापूर्वी २४ वर्षांच्या हार्दिक पंडय़ासह धावताना धोनीने त्याला लीलया मागे टाकल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यातूनच धोनीच्या तंदुरुस्तीची जाणीव होते. तूर्तास तरी धोनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असल्याने त्याच्या निवृत्तीच्या चर्चाना उधाण आले असले तरी किमान २०२०चा ट्वेण्टी-२० विश्वचषक भारताने जिंकून धोनीला सन्मानाने निरोप द्यावा, असेही प्रत्येक चाहत्याला वाटणे स्वाभाविक आहे.

पेसचा वेग अद्यापही कायम

कारकीर्दीत आतापर्यंत १८ ग्रँडस्लॅम विजेतेपदांवर नाव कोरणाऱ्या लिएण्डर पेसला भारतातील सवरेत्कृष्ट टेनिसपटू म्हणून ओळखले जाते. पेसची तंदुरुस्ती थक्क करणारी असून वयाच्या ४६व्या वर्षीही त्याने आगामी ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने कसून तयारीला सुरुवात केली आहे. त्याशिवाय नुकताच युवा खेळाडूंसाठी टेनिस प्रीमियर लीगचेही अनावरण करून नवी पिढी घडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2019 3:54 am

Web Title: sports field tennis akp 94
Next Stories
1 तरुणाईचे अंतरंग
2 बोंबील चटणी
3 मला सर्वागाने घडवणारी वास्तू!
Just Now!
X