13 December 2019

News Flash

कृमी

अनेक जणांना कृमींचा त्रास भेडसावतो. कृमी हा मानव जातीला त्रासदायक ठरणारा घटक आहे.

संग्रहित छायाचित्र

|| वैद्य विजय कुलकर्णी, आयुर्वेद चिकित्सक

ayurvijay7@gmail.com

अनेक जणांना कृमींचा त्रास भेडसावतो. कृमी हा मानव जातीला त्रासदायक ठरणारा घटक आहे. हे आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी ओळखले होते आणि आयुर्वेदीय संहितांमध्ये आढळणारे यांचे सविस्तर वर्णन हे त्याचेच प्रतीक आहे.

आयुर्वेद शास्त्रामध्ये कृमी त्यांचे प्रकार, ते शरीरात राहिल्यास त्यापासून होणारे उपद्रव आणि त्या उपद्रवांचा प्रतिकार असे सर्व वर्णन केलेले आहे. कृमी-जंत याचा सध्याच्या काळात विचार करताना पोटात होणारे जंत असे गृहीत धरले जाते. परंतु आयुर्वेदाने मात्र बाह्य़ कृमी, आभ्यंतर कृमी असेही त्यांचे वर्णन केले. सध्या आधिक्याने रूढ असलेल्या कृमी रोगावरील उपचारांची माहिती या लेखात आपण करून घेणार आहोत. आयुर्वेदाने कृमींचे बाह्य़ कृमी व आभ्यंतर कृमी असे प्रकार केले आहेत. बाह्य़ कृमींमुळे त्वचेच्या विविध विकृती निर्माण होतात. त्यांचेही वेगवेगळे उपप्रकार दिलेले आहेत. हे कृमी सूक्ष्म तसेच स्थूल अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. डोक्याच्या केसांमध्ये होणाऱ्या उवा, लिखा हे बाह्य़ कृमींचे मोठे उदाहरण होय. अभ्यतर कृमीमध्ये कफज कृमी, रक्तंज कृमी आणि मलातील कृमी असे विविध प्रकार आढळतात. विशेष करून बालकांना होणारा जंताचा त्रास हा आभ्यांतर कृमीचाच एक प्रकार होय.

पोटात जंत (कृमी) झाल्याची लक्षणे

  • पोटात कृमी झाल्यास त्याची विविध लक्षणे दिसतात. पोटात बारीक दुखण्याची तक्रार बऱ्याच दिवसांपासून असल्याचे बालके सांगतात. तेव्हा कृमीची शक्यता गृहीत धरावी लागते. लहान मुलाच्या चेहऱ्यावर पांढरे डाग बऱ्याचदा आढळतात तेथे कृमींची शक्यता पडताळून पाहावी लागते. कृमींनी त्रासलेल्या अनेकांमध्ये मधूनमधून जुलाब होण्याचीही तक्रार असते. कृमींमुळे अनेकदा शरीराची वाढही नीट होत नाही. पोटातील अन्नाचे नीट शोषण होत नाही. शरीर पुष्ट होण्याऐवजी हे कृमीच पुष्ट होतात. त्यामुळे शरीरयष्टी बारीक राहते.
  • गुदद्वाराचे ठिकाणी कंडू (खाज) असणे हेदेखील पोटातील कृमींचे एक प्रमुख लक्षण मानले जाते. मलावाटे हे कृमी बाहेर पडताना वळवळतात. त्यामुळे मल बाहेर पडण्याच्या ठिकाणी (गुदद्वाराच्या ठिकाणी) कंड सुटणे स्वाभाविकच असते.

 

उपचारांची दिशा :

  • रोगाचे कारण शोधून त्या कारणालासुद्धा समूळ नष्ट करणे हे आयुर्वेदीय उपचार पद्धतीचे वैशिष्टय़ होय. तेव्हा कृमींवर उपचार करताना सर्वप्रथम त्याच्या कारणांचा बीमोड करणे गरजेचे असते. पोटातील कृमींना बाहेर काढतील असे काही उपचार करावे लागतात. तसेच यामध्ये कृमींना मारणारी काही औषधेही वापरावी लागतात.
  • यामध्ये वावडिंगाचा प्रथम क्रमांक लागतो. वावडिंगाचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी कृमी झालेल्या रुग्णास प्यायला दिल्यास फायदा होतो. अर्थात किती वावडिंग घ्यावे, किती पाणी द्यावे हे वैद्यकीय सल्लय़ानुसार ठरवावे.
  • विडगारिष्ट हे औषध अनेकांना माहिती आहे. वावडिंग व इतर कृमीनाशक औषधे वापरून तयार केलेले हे पातळ औषध लहान मुलांना १-१ चहाचा चमचा समान भाग पाणी मिसळून जेवणानंतर द्यावे. मोठय़ा माणसांमध्ये याचे दुप्पट प्रमाण द्यावे लागते.
  • किरमाणी ओवा, पळसपापडी या वनस्पतीज औषधांचाहीकृमीवर चांगला उपयोग होतो. सौम्य विरेचन देणे हेदेखील यामध्ये महत्त्वाचे ठरते. त्यासाठी त्रिफळा, गंधर्व हरितकी, एरंडेल तेल अशी विविध औषधे रोग्याची प्रकृती सहनशक्ती बघून ठरवावी लागतात.

जंत होण्याची कारणे :

पोटात जंत होण्याची काही कारणे आयुर्वेदीय संहितांमध्ये दिली आहेत. पहिले अन्न पचले नसतानाही दुसऱ्यांदा जेवणे. गोड पदार्थ, आंबट पदार्थ रोज आणि भरपूर प्रमाणात खाणे. अधिक प्रमाणात गूळ व गुळाच्या पदार्थाचे सेवन करणे. अजिबात व्यायाम न करणे, दिवसा झोप घेणे, अस्वच्छ, अतिद्रव, पिष्टमय पदार्थांचे सेवन करणे ही पोटात जंत होण्याची कारणे आहेत.

First Published on August 13, 2019 12:52 am

Web Title: stomach worm ayurveda mpg 94
Just Now!
X