रवींद्र प्रभुदेसाई – व्यावसायिक (पितांबरी )

ताण हा येत नसतो, तो घेतला जातो. अनेक जण असे सांगतात की, मी प्रचंड ताणतणावाखाली आहे. मला त्यांना पाहून खूप नवल वाटते. कारण तो त्यांचा एक विचार असतो. मलाही व्यावसायिक कामानिमित्त खूप ताण येतो. अनेकदा हा ताण कामाच्या अधिक ताणामुळे आलेल्या मानसिक थकव्यामुळे असतो. ताण दूर करण्यासाठी तीन गोष्टी प्रामुख्याने करतो. सकाळी उठल्यानंतर ब्रह्मविद्या,प्राणायाम, ध्यानधारणा या गोष्टी मी ताण दूर करण्यासाठी करतो. मी आणि माझी पत्नी रोज संध्याकाळी चालण्यासाठी पोखरण तलाव येथे जातो. तेथील निसर्गात रमल्यावर मनावरील थकवा एक प्रकारे दूर होतो. ताणामुळे व्यक्तीचे सर्वस्वाने खच्चीकरण होते. त्याच्या मनात नकरात्मक विचार वाढीस लागातात. शास्त्रीय संगीत ऐकणे मला अधिक आवडते. शास्त्रीय संगीतात एक अनमोल अशी ऊर्जा आहे. या ऊर्जेमुळे काम करण्यास अधिक उत्साह निर्माण होतो. मी व्यावसायिक असल्यामुळे माझा अर्धाअधिक वेळ हा कार्यालयात जातो. रोज वेगवेगळ्या माणसांशी निरनिराळ्या विषयांवर चर्चा होते. या चर्चेवेळी मी समोरच्याचे आधी ऐकून घेतो. मग समोरची व्यक्ती आपल्याविरुद्ध चांगले किंवा वाईट बोलत असली तरी ऐकून घेणे महत्त्वाचे असते असे माझे म्हणणे आहे. कारण अनेक जण समोरच्या व्यक्तीचे व्यवस्थितपणे ऐकूण घेत नाहीत आणि त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर गैरसमज वाढीस लागतात. या गैरसमजुतीमधून दोन्ही व्यक्तींना ताणाचा सामना करावा लागतो. माझ्या मते प्रेमाची वागणूक हाच ताणमुक्तीवरचा महत्त्वाचा मार्ग आहे. सकाळी उठल्यानंतर प्रत्येक  व्यक्तीने याचाच विचार करायला हवा की, आज दिवसभरात ज्या ज्या व्यक्तीशी माझा संबंध येईल त्याला मी अजिबात दुखावणार नाही. त्याच्याशी मी प्रेमाने वागेन. माझ्या घरात एक वाचनालयच आहे. कधी कधी मी निवांत वेळ काढून पुस्तकेदेखील वाचतो. ताण वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्याच विचारात आपण रमत असतो. या विचारांना कोणत्याही व्यक्तीने जास्त वाहवून घेऊ नये. आपल्या आवडीचे काम आपण करायला हवे. मी कुटुंबासोबत अधिक वेळ घालवतो. त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यात जास्त मन रमते. अनेकदा काही व्यक्ती या आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतात. आपण बोललेल्या गोष्टीवर अधिक विचार केला जात नाही. त्यावरचे स्वत:चे मतप्रवाह निर्माण केले जात नाहीत. अनेकदा काही जण आपली मते हीच प्रमाण मानून ती दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे व्यवस्थितरीत्या संवाद साधला जात नाही. वाईट संवादकौशल्यामुळे अनेकदा गैरसमज होऊन ताण वाढीस लागतो. मी अनेकदा विसावा म्हणून पर्यटनासाठी वेगवेगळ्या देशांत फिरायलादेखील जातो. त्यामुळे तेथील बऱ्यावाईट अनुभवाचा फायदा होतो. असे अनुभव तणावमुक्तीसाठी उपयुक्त पडतात.