News Flash

आयुर्उपचार : स्वेदन

पंचकर्म करताना पूर्वतयारी म्हणून स्नेहन आणि त्यानंतर लगेच स्वेदन केले जाते.

वैद्य प्रभाकर शेंडय़े drshendye@gmail.com

शरीरातून घाम बाहेर काढणे या क्रियेला स्वेदन म्हणतात. अवयवात आखडपणा, जडपणा आणि थंडी घालवण्यासाठी स्वेदन केले जाते.

पंचकर्म करताना पूर्वतयारी म्हणून स्नेहन आणि त्यानंतर लगेच स्वेदन केले जाते. ज्याप्रमाणे वाळलेले लाकूड सहज मोडते, पण ओले लाकूड न मोडता वाकते, त्याप्रमाणे स्नेहन व स्वेदनामुळे मऊ  झालेले शरीर सहज वाकते, असे उदाहरण आयुर्वेदात दिले आहे.

प्रकार

स्वेदनाचे १३ प्रकार ग्रंथात सांगितले आहेत. यांपैकी नाडी स्वेद, पिंड स्वेद, उपनाह (पोटीस), धारा स्वेद हे जास्त प्रचलित आहेत. पंचकर्म करण्यापूर्वी सकाळी आभ्यांतर स्नेहपान केले जाते आणि सायंकाळी बाह्य़ स्नेहन व सर्वाग स्वेदन केले जाते.

स्वेदन करण्यासाठी बाष्प स्वेद यंत्र अथवा स्वेदन पेटी वापरली जाते. ही एक लाकडाची अथवा कापडाची पेटी असते. यामध्ये रुग्णाचे डोके बाहेर राहील आणि शरीरास वाफ मिळेल अशी व्यवस्था केली असते. यामध्ये झोपून अथवा बसून दोन्ही पद्धतीने स्वेदन केले जाते.

एका कुकर अथवा स्वेदनयंत्रामध्ये पाणी व औषधी वनस्पती घातल्या जातात. त्याची नळी स्वेदनपेटीमध्ये सोडली जाते. पाणी उकळल्यावर येणाऱ्या औषधी वाफेमुळे सर्व अंगाला घाम आला की स्वेदन थांबवले जाते. रोग, रुग्ण वय, ऋतू यांनुसार १० ते २० मिनिटे. ही क्रिया केली जाते. यानंतर रुग्णाचे सर्व अंग कोरडय़ा पंचाने पुसून पूर्ण शरीर, डोके, कान व नाक झाकले जाईल, असे कपडे घालून मग घरी पाठवले जाते. ही क्रिया ४ ते ७ दिवस रोज केली जाते.

नाडी स्वेद- नाडी म्हणजे नळी. शरीराच्या एखाद्या अवयवाला स्वेदन द्यायचे असल्यास तिथे नाडी स्वेद वापरला जातो. फक्त हाता-पायाला, पाठीला अथवा कमरेला शेक देण्यासाठी याचा वापर केला जातो.

धारा-उष्ण असे औषधी द्रव्य एखाद्या अवयवावर धरणे याला धारा सेक असे म्हणतात. शिरोधारा यामध्ये तेल- दूध- ताक इत्यादी विविध औषधांनी डोक्यावर धार धरली जाते. एखाद्या ठिकाणी मुका मार लागला असता त्याच्यावर गरम अशा औषधी तेलाची धार धरल्यावर तेथील वेदना लगेच कमी होतात.

पिण्डस्वेद- औषधी द्रव्यांचा काढा बनवून तो काढा व दूध यांच्यामध्ये भात शिजवला जातो आणि नंतर गरम अशा द्रव्यांनी युक्त भाताची पुरचुंडी बनवून त्याने शेकले जाते. विशेषत: पाठ व कंबर या ठिकाणी होणाऱ्या आजारांमध्ये या पद्धतीचा वापर केला जातो.

’ स्वेदन कोणाला देता येते?- दमा, खोकला, सर्दी, उचकी, पोट फुगणे, मलावरोध, कफविकार, कंबर-पाठ आखडणे.

’ स्वेदन कोणाला देऊ  नये?- अतिशय स्थूल, रुक्ष, दुर्बल, मद्य विकारग्रस्त, कुष्ठ, कावीळ, पांडू, प्रमेह विकार असणारे, गर्भवती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2020 4:11 am

Web Title: sweating perspiration in people diaphoresis zws 70
Next Stories
1 उपचारपद्धती : अ‍ॅक्युपंक्चर
2 मनोमनी : चिंतेचा झटका!
3 तिसऱ्या एकशिपी
Just Now!
X