रताळे या पदार्थाबद्दल बोलायचे झाले तर बऱ्याच लोकांची तोंडं वाईट होतील. पण रताळे दिसले जरी ओबडधोबड तरी याचे एकापेक्षा एक चवदार पदार्थ तयार होऊ शकतात. मागच्या आठवडय़ात मी हरयाणाला गेलो होतो. तिथे गाडय़ांवरती मीठ-तिखट पेरलेली मस्त भाजलेली रताळी खाल्ली. त्यामुळेच मला ही वेगळी पाककृती सुचली आहे. तुम्हीही करून पाहाच.

साहित्य

२५० ग्रॅम रताळी, ६० मिली ऑलिव्ह ऑइल, १ चमचा लिंबूरस, १ चमचा मध, काळीमिरी पावडर चवीनुसार, ५० ग्रॅम बारीक चिरलेला कोबी, १ लहान कांदा, २० ग्रॅम बेदाणे.

कृती

आधी रताळी स्वच्छ धुऊन उकडून घ्या. मग त्याचे पातळ काप करा. एका पॅनमध्ये रताळ्याचे काप ऑलिव्ह ऑइलमध्ये परतून घ्या. त्यातच चिरलेला कांदा परतून घ्या. त्याच पॅनमध्ये बारीक चिरलेला कोबी घाला. या तिन्ही गोष्टी खरपूस परतून घ्या. नंतर मीठ मिरपूड घालून चव पाहा. हे सलाड खायला देईपर्यंत थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. खायला देताना आपल्याला त्यावर ड्रेसिंग घालून द्यायचे आहे. या ड्रेसिंगसाठी एका बाऊलमध्ये थोडे तेल, लिंबाचा रस आणि मध एकत्र करा. चवीनुसार मिरपूड घाला. आता रताळ्याच्या मिश्रणावर हे ड्रेसिंग घालून खा. वर कोथिंबिरही भुरभुरा. हे हटके सलाड कसं लागतंय, ते नक्की सांगा.

पोषणमूल्ये

  • कॅलरी – १३८
  • प्रोटीन – २ ग्रॅम
  • फॅट – ५ ग्रॅम
  • कार्ब्स – २४ ग्रॅम

nilesh@chefneel.com