प्रिंटरचा वेग कसा वाढवाल?

कालपरत्वे प्रिंटरचा वेग किंवा कार्यक्षमता कमी होते. अशा वेळी तुम्ही त्यातील प्रोसेसर, रॅम बदलून त्याचा वेग पूर्ववत करू शकता. परंतु, आपला प्रिंटर नेहमी कार्यक्षम राहावा यासाठी तुम्हाला खालील गोष्टी करता येतील.

आजच्या काळात घरोघरी संगणकाप्रमाणेच प्रिंटर हे उपकरण आवश्यक बनले आहे. केवळ व्यावसायिक किंवा नोकरदारांसाठीच नव्हे तर, विद्यार्थीवर्गासाठीही प्रिंटर आवश्यक असतो. शाळेतून दिलेल्या ‘प्रोजेक्ट’चे काम असो की एखाद्या विषयावर ऑनलाइन उपलब्ध असलेली माहिती पुस्तकरूपात संग्रहित करून ठेवणे असो, अनेक गोष्टींसाठी विद्यार्थीवर्गाला प्रिंटरची गरज भासते. नोकरदार आणि व्यावसायिकांना कोणत्याही कार्यालयीन कामासाठी प्रिंटर उपयोगी असतो. प्रत्येक वेळी दुकानात जाऊन प्रिंटआऊट काढणं खर्चीक असतं. त्यामुळे आता बहुतांश घरांमध्ये प्रिंटर असतोच. अर्थात त्याचा सातत्याने वापर होतोच असे नाही. सतत वापर नसल्यास प्रिंटरच्या यंत्रणेत धूळ जाऊन किंवा त्यातील कार्टरेजमधील शाई सुकून तो खराब होण्याचीही भीती असते. या पाश्र्वभूमीवर प्रिंटरची निगा कशी राखावी, याची माहिती.

कागदाची निवड

प्रिंटरसाठी कधीच जुना, सुरकुतलेला किंवा ओला कागद वापरू नका. आपण बऱ्याचदा पैसे वाचवण्यासाठी अशा प्रकारचा कागद वापरतो. मात्र, त्याने पैसे वाचण्याऐवजी प्रिंटर नादुरुस्त होऊन त्याचा भरुदड सोसावा लागण्याची शक्यता जास्त आहे. प्रिंटरच्या पेपर ट्रेमध्ये कागदांचा गठ्ठा व्यवस्थित बसवला गेला आहे ना, याची नेहमी काळजी घ्या. या ट्रेमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कागद ठेवू नका. कागदांचा गठ्ठा ठेवताना तो व्यवस्थित हलवून सर्व कागद सुटे आहेत ना, याची खात्री करूनच ठेवावा.

जास्त प्रती काढताना..

ज्या वेळी तुम्ही प्रिंटरच्या मदतीने एकाच वेळी जास्त पानांची प्रिंट सोडत असाल, त्या वेळी प्रिंटर ‘नॉर्मल मोड’मध्ये आहे, याची खात्री करून घ्या. ‘फास्ट ड्राफ्ट मोड’मध्ये जास्त प्रती काढण्याचा प्रयत्न करू नका. एकाच वेळी भरपूर पाने प्रिंट करायची असतील तरी, त्यात काही पानांनंतर थांबून प्रिंटरमधील प्रोसेसरवर ताण येणार नाही, याची दक्षता घ्या.

‘क्यू’वर लक्ष ठेवा

अनेकदा आपण संगणकातून प्रिंट देतो. पण काही कारणाने प्रत्यक्ष प्रिंट येण्याआधीच संगणक बंद करतो. संगणक बंद केला तर प्रिंटआऊट येणार नाही, अशी आपली कल्पना असली तरी, प्रत्यक्षात प्रिंट काढण्यासाठी धाडलेली फाइल ‘प्रिंटर क्यू’मध्ये जाऊन पडते. ही फाइल प्रिंटरशी संपर्क साधून प्रिंट होण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे यापुढे संगणक बंद करताना नेहमीच ‘प्रिंटर क्यू’मध्ये कोणतीही फाइल नाही ना, याची खात्री करूनच संगणक बंद करा.

प्रिंटर ज्या नेटवर्कमधून संगणकाशी जोडला गेला आहे, ते नेटवर्क योग्यपणे काम करत आहे का, याची खात्री करून घ्या. अनेकदा आपण प्रिंट सोडल्यानंतर प्रत्यक्ष प्रिंटआऊट येईपर्यंत वेळ लागतो. त्या वेळी आपण प्रिंटरमध्ये दोष शोधू लागतो. परंतु, कदाचित प्रिंटरला जोडणाऱ्या नेटवर्कमधील त्रुटींमुळे हा विलंब होऊ शकतो.

प्रिंटरच्या सुरक्षिततेची नेहमी काळजी घ्या. अलीकडे हॅकरमंडळी प्रिंटर हॅक करून त्याद्वारे संगणकातील फाइली हॅक करण्यातही कुशल झाली आहेत. त्यामुळे प्रिंटर पुरवणाऱ्या कंपनीकडून येणारे ‘सिक्युरिटी अपडेट’ इन्स्टॉल करा. मात्र, अशा सततच्या सिक्युरिटी अपडेटमुळे प्रिंटरचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे प्रिंटरचा वेग वाढवायचा असेल तर तुम्ही काही क्षणासाठी तुमच्या ‘सिक्युरिटी’ची यंत्रणा बंद ठेवू शकता. अर्थात हे करताना प्रिंटरचा थेट इंटरनेटशी संपर्क नाही, याची काळजी घ्या.

प्रिंटरचा वेग वाढावा, असे वाटत असेल तर तुम्हाला प्रिंटआऊटच्या दर्जाशी काही प्रमाणात तडजोड करावी लागेल. ज्या वेळी तुम्ही उच्चतम दर्जाची प्रिंटआऊट काढता तेव्हा प्रिंटरचा प्रोसेसर आपली बरीचशी शक्ती मुद्रणदर्जा वाढवण्यावर खर्च करतो. त्यामुळे जेथे आवश्यक नसेल तेथे कमी दर्जाची किंवा साधी प्रिंटआऊट काढा. त्याचप्रमाणे तुम्ही केवळ मजकुराची प्रिंट काढत असाल तर, ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ प्रिंटआऊटचा पर्याय निवडा.

स्वच्छता महत्त्वाची

प्रिंटरची काळजी घेण्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्याची स्वच्छता असते. प्रिंटरवर धूळ साचू नये, यासाठी दक्ष राहणे आवश्यक ओह. त्याचबरोबर प्रिंटरची स्वयंचलित देखभाल (मेंटेनन्स) वेळोवळी चालवणे आवश्यक आहे. याखेरीज वर्ष किंवा सहा महिन्यांतून प्रिंटरची तंत्रज्ञाकडून तपासणी आणि अंतर्गत स्वच्छता करणेही आवश्यक आहे.