25 February 2021

News Flash

टाटा नेक्सन आटोपशीर, पण परिपूर्ण

ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

(संग्रहित छायाचित्र)

बापू बैलकर

एसयूव्ही प्रकारातील कारला वाढती मागणी पाहता कार उत्पादक कंपन्यांनी मध्यम आकारातील एसयूव्ही बाजारात आणल्या आहेत. त्यांच्यात मोठी स्पर्धा पाहावयास मिळत असून दहा लाखांपर्यंतच्या किमतीत टाटाने आपली नेक्सन फेसलिप्ट नवीन रूपात आणली आहे. ही कार आटोपशीर असली तरी अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असून गाडी चालविण्याचा आनंद नक्कीच देऊ शकते.

‘टाटा’ने त्यांची मध्यम आकारातील एसयूव्ही कार नेक्सन (बीएस ६) गेल्या वर्षी सुधारित करीत नवीन रूपात आणली आहे. या कारला ‘ग्लोबल इनकॅप’च्या तपासणीत पंचतारांकित दर्जा मिळाला असून भारतातील सुरक्षित कार म्हणून तिच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘नेक्सन’च्या पेट्रोल कारची नुकतीच ‘टेस्ट ड्राइव्ह’ घेतली.  कार सुरक्षेची हमी देते, गाडी चालवण्याचा आनंद मिळतो, इंजिनही चांगले आहे, मायलेज ठीक आहे, देखभाल खर्च कमी आहे आणि कनेक्टेड आहे..

ही कार नवी मुंबई शहरात, महामार्गावर व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर चालवली असता या तिन्ही प्रकारच्या रस्त्यांवर चांगला अनुभव मिळाला. क्षमताही चांगली असून अगदी १४५ किलोमीटपर्यंत वेग घेते.

या कारमध्ये इको, सीटी व स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड दिले आहेत. महामार्गावर इको मोडवर गाडी ताशी ६० ते १०० च्या वेगमर्यादेत चालवल्यास अगदी २० पेक्षा जास्त मायलेज मिळते. शहरातील मोकळ्या रस्त्यावर १२ ते १३ तर ट्रॅफिकमध्ये दहापर्यंत कसेबसे मायलेज मिळते.

गाडीच्या कार्यक्षमतेचा विचार केला तर डोंगर उतारावरही गाडी तेवढय़ात क्षमतेने चालते. चढ चढताना जर इको किंवा सीटी मोडवर गाडी चालवत असाल तर काहीशी अडचण निर्माण होईल, पण स्पोर्ट मोडवर गाडी असेल तर अगदी सहज चढण रस्ताही पार करते. गाडी चालविण्याचा एक वेगळा आनंद चालकाला मिळतो. आसनव्यवस्थाही आरामदायी वाटते. लांबच्या प्रवासात वाहनचालकाला कंटाळा किंवा थकवा येत नाही.

गाडी थोडी मोठी व लांब असली तरी चालकासमोरील आरशात मागून येणाऱ्या वाहनांचा नीटसा अंदाज येत नाही. मागील काचही थोडी लहान वाटते. त्यामुळे जर महामार्गावरून गाडी चालवताना मार्गिका बदलताना मागील वाहनांचा नीटसा अंदाज घेत मार्गिका बदलावी लागते. मात्र गाडी चालवण्यासाठी सहज वाटते. मोकळ्या रस्त्यावर पाचव्या गिअरमध्ये १२० ताशी किलोमीटपर्यंत वेग घेते. मात्र गिअर बदलताना गडबड झाली तर किंचितसा धक्का बसल्याचा अनुभव येतो. खराब रस्त्यावर जमिनीपासूनचे अंतर चांगले असल्यामुळे काही अडचण येत नाही. खड्डय़ांतून पास होताना चालकाला त्याची जाणीव होते.

जुन्या नेक्सनमध्ये असलेल्या  कमतरता या गाडीत कंपनीने पूर्ण केल्या आहेत. यात अनेक नवीन वैशिष्टय़े दिली असून इंजिनक्षमताही वाढविण्यात आली आहे.

किंमत

नवीन नेक्सन पेट्रोल व डिझेल इंधन प्रकारात उपलब्ध असून एक्सएम एस मॅन्युअल पेट्रोल कार ८.३६ लाख, तर डिझेल कार ९.७० लाखांत उपलब्ध आहे. तर एक्सएमए एस ऑटोमॅटिक पेट्रोल कार ८.९६ लाख, तर डिझेल कार १०.३० लाखांत उपलब्ध आहे.

गाडीची रचना

नेक्सनची आतील व बाहेरील रचना सुंदर व दिमाखदार करण्यात आली आहे. गाडी अगदी ट्रॅफिकमध्येही पटकन लक्षात येते. क्रोम शेफ दिल्याने तो आकर्षित करतो, तर दिव्यांची रचनाही चांगली केली आहे. अंधारात गाडी चालवताना प्रकाशयोजना थोडी कमी जाणवते. २०९ मिलिमीटरचे जमिनीपासूनचे अंतर दिले असून १६ इंचाची चाके आहेत. त्यामुळे गाडी उठावदार दिसते. बूटस्पेस ३५० लिटरचा दिल्याने जास्तीत जास्त सामान वाहून नेता येते. आतील रचनाही प्रेमात पाडणारी आहे.

चालक व सहप्रवासी यांची आसनव्यवस्था आरामदायी आहेच, शिवाय मागील आसनावर तीन प्रवासी आरामात बसतील एवढी जागा आहे.

मोबाइल व इतर वस्तू ठेवण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दरवाजांची रचनाही उत्तम करण्यात आली आहे. मागील प्रवाशांसाठी चार्जिग व वातानुकूलन यंत्रणा कमीजास्त करण्याची व्यवस्था आहे. गाडीतील संगीतव्यवस्थाही चांगल्या दर्जाची आहे. हार्मन ही नवी प्रणाली वापरण्यात आली असून चार स्पीकर देण्यात आले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे सनरूप दिले आहे.

पंचतारांकित सुरक्षा

या कारमध्ये दोन एअरबॅग्ज दिल्या आहेत. तसेच एबीएस व ईएसपी या दोन्ही सुरक्षा प्रणालीही देण्यात आल्या आहेत. ‘एबीएस’मुळे अचानक ब्रेक दाबण्याची वेळ आल्यास गाडीवर ताब्यात राहण्यास मदत होते, तर ईएसपीमुळे निसरडय़ा रस्त्यावर वळण घेताना गाडीवरील चालकाचा ताबा कायम राहतो. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ग्लोबल इनकॅपच्या सुरक्षा चाचणीत या कारला पंचतारांकित दर्जा मिळाला आहे. त्यामुळे ही गाडी सुरक्षेची हमी देते.

कनेक्ट कार

मध्यम आकारातील एसयूव्ही कार असून मोबाइल कनेक्टच्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. ‘आयआरए’ या मोबाइल अ‍ॅपशी तिला जोडता येते. त्या माध्यमातून गाडीतील वातानुकूलन यंत्रणा, वीजव्यवस्था व इतर बाबी त्याद्वारे चालू-बंद करू शकतो. विशेष म्हणजे गाडी काही किलोमीटर चालल्यानंतर तिच्यातील अडचणी अ‍ॅपद्वारे लक्षात येतात. तसेच आपली कार नेमकी कुठे आहे हे आपण घरबसल्या याद्वारे पाहू शकतो. चोरीचा अथवा गाडीला कोणी हानी पोहोचविण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला त्याची सूचना मिळते. गाडी सहज पार्किंग करता येते.

पेट्रोल व डिझेल पर्याय

१.६ लिटर टबरेचाज्र्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे ११८ बीएचपी ताकद व १७० एनएमचे टॉर्क देते, तर डिझेलमध्ये १.५ लिटर टबरे इंजिन दिले आहे जे १०८ बीएचपी ताकद आणि २६० एनएमचे टॉर्क देते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 12:00 am

Web Title: tata nexon review abn 97
Next Stories
1 एमजीची नवी ‘हेक्टर’
2 नवकरोनाचे नाहक भय
3 आयुर्उपचार : शिरोधारा
Just Now!
X