ऋषिकेश बामणे

गेल्या रविवारी झालेल्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सने अफलातून शतकी खेळी साकारून इंग्लंडला एक गडी राखून अशक्यप्राय विजय मिळवून दिला. स्टोक्सच्या त्या खेळीमुळे पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात कसोटीविषयीचे प्रेम जागृत झाले. आजच्या सदरात कसोटीतील अशाच काही निवडक जिगरबाज खेळींचा घेतलेला हा आढावा.

बेन स्टोक्सचा झंझावात

१३५*

यंदाच्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम सामना आणि तिसरा अ‍ॅशेस कसोटी सामना स्टोक्समुळे क्रीडाप्रेमींच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहील. ३५९ धावांचे भलेमोठे डोंगर गाठताना ३ बाद १४१ धावांवर स्टोक्स फलंदाजीला आला. २८६ धावांवर नववा फलंदाज माघारी परतल्यावर इंग्लंडचा पराभव अटळ होता. परंतु हार मानेल तो स्टोक्स कसला. त्याने ११व्या क्रमांकावरील जॅक लीचच्या साथीने उर्वरित ७३ धावा जोडून इंग्लंडला विजयी केले. या खेळीदरम्यान स्टोक्सला नशिबाची आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयाची साथ लाभली, हे मान्य असले तरी ऑस्ट्रेलियाच्या प्रभावी माऱ्याचा स्टोक्सने ज्या बेधडकपणे सामना करून ८ षटकारांसह १३५ धावा केल्या ते खरंच कौतुकास्पद होते.

‘वेरी वेरी स्पेशल’ लक्ष्मण

७३*

* ‘वेरी वेरी स्पेशल’ लक्ष्मण २०१० मध्ये मोहालीत झालेल्या या कसोटी सामन्यात भारताला विजयासाठी चौथ्या डावात फक्त २१६ धावा करायच्या होत्या. परंतु मिचेल जॉन्सन, बेन हिल्फेनहॉस, डग बॉलिंजर यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताने १२४ धावांतच आठ फलंदाज गमावले. अशा वेळी संकटमोचक व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने झुंजार ७३ धावा करून भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यादरम्यान लक्ष्मणने नवव्या गडय़ासाठी इशांत शर्मासह८१ धावा जोडल्या.

परेराची ‘कुशल’ कामगिरी

१५३*

यंदाच्याच वर्षांत फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबान येथे झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी ३०४ धावांचे लक्ष्य होते. ३ बाद ५२ धावा अशी अवस्था असताना डावखुरा कुशल परेरा फलंदाजीला आला. परंतु त्याला अन्य फलंदाजांची साथ न लाभल्यामुळे श्रीलंकेचा संघ ९ बाद २२६ धावा अशा अडचणीत सापडला. मात्र अखेरच्या स्थानावरील विश्व फर्नाडोच्या साथीने परेराने नाबाद ७८ धावांची भागीदारी रचून श्रीलंकेला एक गडी शिल्लक राखून विजय मिळवून दिला. परेराने १२ चौकार व ८ षटकारांसह नाबाद १५३ धावा केल्या.

लाराचा बोलबाला

१५३*

वेस्ट इंडिजच्या महान फलंदाजांपैकी एक म्हणून ब्रायन लाराचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. १९९९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात लाराने विंडीजला एक गडी राखून थरारक विजय मिळवून दिला होता. लारा जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा विंडीजने ७८ धावांवर ३ बळी गमावले होते. त्याशिवाय ग्लेन मॅकग्रा, जेसन गिलेस्पी, शेन वॉर्न यांच्या माऱ्यासमोर चौथ्या डावात ३११ धावांचे लक्ष्य गाठण्याचा कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही. परंतु लाराने १९ चौकार व एका षटकारासह नाबाद १५३ धावा केल्या. जिमी अ‍ॅडम्ससह सहाव्या गडय़ासाठी त्याने रचलेली १३३ धावांची भागीदारी सामन्याला कलाटणी देणारी ठरली.