02 June 2020

News Flash

समाजसेवकांचे आभार

रेल्वे, बस तसेच टॅक्सी बंद असल्याने त्याला हॉस्पिटलला जाणे कठीण होऊन बसले होते.

 

 सुनीता देवलवार, मुंबई

सध्याच्या कठीण प्रसंगी जीवावर उदार होऊन काम करणाऱ्यांची दखल घेणे आवश्यक आहे. अलर्ट रिसटीझन फोरम संस्थेचा प्रमुख निरंजन अहेर व त्याचे सहकारी सद्य:स्थितीत कित्येक अडचणीत असलेल्या लोकांना मदतीचा हात पुढे करत आहेत. नुकताच असा काही प्रसंग घडला की निरंजनच्या कामाची दखल नक्कीच घेतली पाहिजे. या करोनाष्टकाच्या निमित्ताने या साऱ्या समाजसेवकांच्या कार्याला सलाम करण्याची संधी घेत आहे.

माझ्या भाच्याला आठवडय़ातून तीन वेळा डायलिसिस घेण्यासाठी ग्लोबल हॉस्पिटल, गोरेगावहून परेल येथे जावे लागते. रेल्वे, बस तसेच टॅक्सी बंद असल्याने त्याला हॉस्पिटलला जाणे कठीण होऊन बसले होते. माझ्या बहिणीने मदतीसाठी कित्येक लोकांशी संपर्क साधला. तसेच गोरेगाव येथील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांला, नगरसेवकाला अडचणी सांगितल्या. हेल्पलाइन या मदतीच्या केंद्रातून एका पोलीस अधिकाऱ्याने मदत म्हणून स्वत:ची गाडी व ड्रायव्हर देतो असे सांगितले, पण यासाठी जास्त पैशाची मागणी केली. जेव्हा तिने मला हे सर्व सांगितले तेव्हा मला निरंजनची आठवण झाली. मी निरंजनला फोन केला तेव्हा नेहमीप्रमाणे त्याच्या सामाजिक कामात व्यस्त होता, पण तरी त्याने माझे बोलणे ऐकले व म्हणाला मला पाच मिनिटे द्या. त्यानंतर त्याने लगेच प्रतीक नावाच्या मुलाचा फोन क्रमांक पाठविला. बहिणीने प्रतीकला अडचण सांगितली. तो म्हणाला, मी आता तुमच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला येऊ का? बहिणीला आश्र्चयाचा धक्का बसला. गेले दोन दिवस कित्येकांशी  तिने संपर्क साधला तेव्हा सगळीकडून पोकळ  आश्वासने, अधिक पैशाची मागणी, बघूया अशी उत्तरे मिळत होती.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रतीक व त्याच्यासोबत त्याचा मित्र, दोघांनी माझ्या भाच्याला गाडीने ग्लोबल हॉस्पिटल, परेलला सकाळी १० वाजता नेले. १२ वाजता डायलिसिस सुरू केले गेले व दुपारी ४ वाजता भाच्याला घरी घेऊन आले. दुपारच्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था बहिणीने केली होती. घरी आल्यावर त्यांचे चहापाणी केल्यानंतर किती पैसे द्यायचे असे  विचारल्यावर, आम्ही पैसे घेत नाही, अडचणीत असलेल्या लोकांना मदत करणे हे आमचे काम आहे असे म्हटल्यावर बहिणीला दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. एक महिनाभर तरी आठवडय़ातून तीन वेळा ते भाच्याला हॉस्पिटलमध्ये नेणार, त्यांचा अर्धा दिवस तरी जाणार हे ओळखून बहिणीने मला फोन केला तेव्हा तिचा आवाज अगदी भरून आला होता, इतक्या कठीण प्रसंगी  ही मुले धावून आली, त्यांचे हे उपकार मी कधी विसरणार नाही. मी निरंजनला फोन लावला आणि पैसे देण्याची तयारी दर्शवली तेव्हा तो म्हणाला की, पैसे माझी माणसे घेणार नाहीत, तुम्हाला काय मदत करायची ती आता संकटात सापडलेल्या लोकांसाठी करा. त्याची बायको त्याच्यासारखी सेवाभावी आहे व जी. टी. हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करते आणि आता करोना वॉर्डमध्ये सेवा देत आहे. या साऱ्या समाजसेवकांना माझे कोटीकोटी प्रणाम.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 3:15 am

Web Title: thanks to the social workers akp 94
Next Stories
1 पुस्तकांच्या जगात..
2 करोनाष्टक
3 ज्ञान मिळवतो आहे
Just Now!
X