News Flash

पानापानांतला पाऊस

पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो.

|| भक्ती परब

पाऊस दरवर्षीच पडतो; पण प्रत्येकाचा पाऊस निराळा असतो. तो कुणाच्या मनावर कविप्रतिभेतून बरसू लागतो, तर काहींना तो पुस्तकातल्या पानांतून बाहेर पडून झाडांच्या पानांमधला पाऊस अनुभववासा वाटतो. हलकेच जाग येते तेव्हा घराबाहेर झिम्माड, घनगर्द पावसाचा धिंगाणा सुरू असतो आणि इथे प्रत्येकाच्या मनात पाऊस घर करतो.

सुख पावसापरी यावे, आयुष्य अन् हे भिजावे

स्पर्शून आसवांना या, मातीत ओल्या रुजावे

जरी दाटले आभाळ हे तरी, नवा रंग हो..

घन आज बरसे मनावर हो..

 

निखळ आनंद देणारा पाऊस

‘श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. क्षणांत येते सरसर शिरवे क्षणांत फिरूनी ऊन पडे..’ पूर्ण कविता पाठ नसली तरी पावसाचे दोन थेंब जरी पडले, तरी या दोन ओळी आपसूकच ओठांवर रुंजी घालू लागतात. शाळेत असताना तर भोलानाथाचं गाणं माझं आवडतं होतं. खास करून त्यातली दुसरी ओळ ‘शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’ – ते रम्य बालपण, ते निरागस प्रश्न आणि निखळ आनंद देणारा तो पाऊस. झाडांना जशी नवी पालवी फुटते तशा या पावसात या आठवणीही पुन्हा टवटवीत होतात. शांता शेळके या माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री. शाळेत असताना त्यांच्या काही कविता आम्हाला अभ्यासाला होत्या; पण एक साहित्यिक म्हणून मला त्यांचा प्रथम परिचय झाला तो त्यांनी केलेल्या महाकवी कालिदासाच्या ‘मेघदूत’ या खंडकाव्याच्या मराठी अनुवादातून. दहावीत शंभर गुणांच्या संस्कृतच्या अभ्यासक्रमात आम्हाला मेघदूत अभ्यासाला होतं. त्यामुळे पाऊस म्हटल्यावर लहानपणीच्या माझ्या अल्लड खोडय़ा आणि नवसंवेदित मनांना भुरळ घालणारे मेघदूत यातच मी रममाण होते. – चारुश्री वझे

 

पाऊस पुस्तकातून थेट मनात

पाऊस म्हटल्यावर मला आठवते ते कोकण. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलेले असताना त्याची भेट व्हायची. परतताना शेतातली लगबग, पावसातला मातीचा हिरवा उत्सव साजरा होत असताना पाहायला मिळायचे; पण पाऊस त्याआधी भेटला तो माडगूळकरांच्या ‘नाच रे मोरा’ या गीतातून. त्यानंतर पाठय़पुस्तकातील शांता शेळके, बालकवींमुळे. हिरवे हिरवे गार गालिचे कवितेतून वाचायचो, तेव्हापासूनच पावसावर प्रेम जडलं होतं. महाविद्यालयात आल्यावर कुसुमाग्रजांनी त्यावर हासरा साजच चढवला. ते पहिले प्रेम वगैरे जे काही असतं ना ते तेव्हाच झालं, पावसावर आणि मग ते प्रेम गच्चीतील स्विमिंग पूल, मुंबईतील शिवाजी पार्कपासून मेळघाटातील डोंगरांवर घेऊन गेले. पुस्तकातल्या कवितेतून ते आताच्या गझल गाण्यातून पाऊस नसतानाही भेटतो, तो अनुभव सुखावणारा आहे. पावसाशी जडलेलं हे घट्ट नातं कवितांच्या संगतीत आणखी घट्ट होते आहे. सध्या मनाला वेड लावणारे असंच एक बंगाली भाषेतील गाणं, ‘जाओ पाखी बोलो, हवा छोलो छोलो, आप छाये जानलारं काच’, यात एक प्रेयसी प्रियकरावर लक्ष ठेवण्यासाठी ढगांना साद घालतेय आणि मलासुद्धा साहित्यातला पाऊस साद घालतोय. – नाजुका सावंत

 

सुगंध पाऊस घेऊन येतो..

मराठी नवकवितेला मर्ढेकरांनंतर लाभलेला प्रतिभावान कवी म्हणजे ग्रेस. पाश्चात्त्य काव्यविश्वातील अनेक प्रगल्भ प्रतीके ग्रेसने आपल्या साहित्यकृतींमधून आविष्कृत केली. ती मला भावतात.

‘अंधारांतून जात कुणी तरी, गात पुढे क्षितिजाला

मातीमधला पाऊस घेऊन सुगंध इथवर आला

‘मरण’ या कवितेतील या ओळींमध्ये ग्रेसने मांडलेला पाऊस मला खूप विचार करायला लावतो. ग्रेसच्या अद्वितीय वेगळेपणाचे एक छोटेसे निरीक्षण नोंदवायचे झाल्यास त्याच्या कवितेतला पाऊस सुगंध घेऊन येत नाही, तर सुगंध पाऊस घेऊन येतो. ‘संध्याकाळच्या कविता’ या काव्यसंग्रहातील ‘पाऊस’ या कवितेत-

‘पाऊस कधीचा पडतो

झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली

दु:खाच्या मंद स्वराने

..ग्रेसच्या अशा कवितांचा अर्थ सांगण्याचा व शोधण्याचाही प्रयत्न करू नये, त्यांचा अनुभव घ्यावा, असे मला वाटते.

– निरंजन तांबे

 

पावसाची उत्स्फूर्त साथ

मला बालपणापासून ‘येरे येरे पावसा’, ‘टप टप टप टप थेंब वाजती’, ‘नाच रे मोरा’पासून ते ‘आई, मला पावसात जाऊ  दे’ अशा किती तरी जुन्या कविता मनात घर करून आहेत. त्या सदैव ताज्या, टवटवीत फुलांसारख्याच वाटतात. तसेच बालकवींची ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ ही कविताही सदैव मनात असतेच. माझ्या तरुण मनाला पाऊस काव्यातून उत्स्फूर्तपणे साथ देत असतो. गुरू ठाकूर यांची ‘पाऊस’, मयूरी देशमुखची ‘तू आणि पाऊस’, स्पृहा जोशीची ‘पहिला पाऊस’ या कविताही मला विशेष आवडतात. पाऊस प्रत्येक कवी-कवयित्रीला लिहायला भाग पाडतो. लेखणी जणू साहित्यकाराला साद घालते. साहित्यात कविता या प्रकारातच पाऊस मोठय़ा प्रमाणात दिसून येतो; परंतु काही लेखकही आहेत ज्यांनी पावसावर कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मारुती चित्तमपल्ली यांची ‘केशराचा पाऊस’, आनंद विंगकर यांची ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ यातही पाऊस थोडा वेगळ्या प्रकारे बरसला आहे. – धनंजय आंबेरकर

 

घनु वाजे घुणघुणा!

काळ्या मेघांची गर्दी आसमंतात होते आणि गडगडाट सुरू होतो. मग मला एका अजरामर रचनेची आठवण होते. ७०० वर्षांपूर्वी ‘विश्वात्मक’ झालेला एक देवमाणूस! मराठी भाषेला कैवल्याचं लेणं चढवणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली. या माऊलींची

‘घनु वाजे घुणघुणा,

वारा वाहे रुणझुणा,

भवतारकु हा कान्हा,

वेगी भेटवा का!

ही विराणी मला आवडते. विराणी म्हणजे विरहभावनेतली रचना. गडगडाट करणारा ढग आणि पैंजणासारखा रुणझुणता वारा, जणू श्रीकृष्णाची चाहूल घेऊन आले आहेत, असं त्या विरहात बुडालेल्या स्त्रीला वाटतं.

‘दर्पणी पहाता रुप, न दिसे वो आपुले, बापरखुमादेवीवरे, मज ऐसे केले’

अशी मनाची अद्वैतावस्था शेवटी प्राप्त होते. ही रचना मोठय़ा कठीण विषयाला खूप सोपे करून सांगते.

– चिन्मय वालावलकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 12:30 am

Web Title: the beauty of monsoon season
Next Stories
1 सेल्फीस कारण की..
2 मस्त मॉकटेल : मोकाचीनो
3 हसत खेळत कसरत : स्नायुंच्या बळकटीसाठी..
Just Now!
X