25 September 2020

News Flash

अध्यात्म आणि कलेचा संगम

इतिहासकाळात ‘पुद्दुचेरी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या भागाचे वैशिष्टय़ म्हणजे इथे स्वातंत्र्यपूर्व काळात फ्रेंच राजवट होती.

|| मकरंद जोशी

भारताच्या बहुरंगी परंपरेचं, या परंपरेतील अनोख्या एकात्मतेचं दर्शन घडवणारी काही खास आहेत. त्यातलं एक आहे भारताच्या दक्षिणेकडील सागर किनाऱ्यावर. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्याच्या शेजारी, एका कोपऱ्यात असलेला असाच एक भाग म्हणजे पाँडेचेरी.

इतिहासकाळात ‘पुद्दुचेरी’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या भागाचे वैशिष्टय़ म्हणजे इथे स्वातंत्र्यपूर्व काळात फ्रेंच राजवट होती. १६७४ मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने या ठिकाणी आपले व्यापारी ठाणे थाटले आणि पाँडेचेरी हे भारतातील फ्रेंच वसाहतींचे केंद्र झाले. पुढच्या काळात ब्रिटिश आणि फ्रेंचांमधील सत्ता संघर्षांत या प्रदेशावरची हुकमत सतत बदलत गेली. अखेर १८५० मध्ये ब्रिटिशांनी उर्वरित भारतावर कब्जा मिळवला आणि फ्रेंचांचे भारतातील अस्तित्व पाँडेचेरीपुरतेच मर्यादित राहिले. पुढे तब्बल १०० वर्षे पाँडेचेरी आणि भोवतालच्या प्रदेशावर फ्रेंचांची सत्ता नांदली. त्यामुळेच पाँडेचेरीला ‘पॅरिस ऑफ द ईस्ट’ असे म्हटले जाऊ  लागले. आजही पाँडेचेरीमध्ये फिरताना हा फ्रेंच माहौल सतत जाणवतो. कधी इथल्या टिपिकल फ्रेंच शैलीत उभारलेल्या वास्तूंमध्ये तर कधी रेस्टॉरंट्सच्या मेन्यूकार्डवर. फेसाळत्या सागरकिनाऱ्यावरच्या पाँडीला पर्यटक फ्रेंच फ्लेव्हरसाठी भेट देतात, पण पाँडीचे नाव एका आध्यात्मिक प्रकल्पाशीही जुळलेले आहे. याच शहरात क्रांतिकारक अरबिंदो घोष हे आत्मिक शांतीच्या शोधात येऊन स्थायिक झाले आणि या शहराला एक अनोखे वलय लाभले. श्री अरबिंदोंच्या तत्त्वचिंतनाचा वारसा पुढे नेणाऱ्या माताजी अर्थात मिरा अल्फास्सा यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘ऑरो विले’ म्हणजेच ‘उषा नगरी’ आज जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणस्थळ  ठरले आहे. युनिव्हर्सल टाउन म्हणून वसवण्यात आलेल्या ऑरोव्हिलामध्ये जगभरातील ५४ वेगवेगळ्या देशांचे नागरिक एकोप्याने नांदतात.

ऑरोव्हिलामधील मातृमंदिर ही वास्तू म्हणजे या प्रकल्पाचा आत्मा म्हणता येईल. सुवर्णाचा मोठा गोळा भासावा अशा या वास्तूत शांतता राखण्यासाठी मौन पाळावे लागते आणि इथल्या वातावरणात आपोआप स्वत:शी संवाद साधला जातो. तुम्हाला अध्यात्मात रस नसला तरीही ऑरोव्हिलाची शिस्त, टापटीप आणि सौंदर्यपूर्ण रचना पाहण्यासाठी या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.

पाँडीमधले सर्वात गजबजलेले आणि लोकप्रिय ठिकाण म्हणजे तिथला प्रोमेनेड बीच. हा सागर किनारा शहरातील मुख्य रस्त्याला लागून पसरलेला आहे. शिवाय लगतच्या रस्त्यावर खाण्या-पिण्याचे बरेच पर्याय आहेत. याच रस्त्यावर इथले सुप्रसिद्ध जीएमटी आइस्क्रीम पार्लर आहे. या पार्लरमध्ये अगदी आंबा, फणसापासून ते चिली चॉकलेटपर्यंत विविध स्वादांची आइस्क्रीम मिळतात.

पाँडेचेरीच्या इतिहासाचे धावते दर्शन घ्यायचे असेल तर इथल्या म्युझियमला जरूर भेट द्या. सेरेनिटी बीच, ऑरोविले बीच, पॅराडाइज बीच असे एकापेक्षा एक उत्तम किनारे इथे आहेत. त्यामुळे समुद्रात डुंबण्याची हौस पुरेपूर पूर्ण करता येते. तीन-चार दिवस एका वेगळ्या वातावरणात राहण्यासाठी, सागर किनारा मनसोक्त अनुभवण्यासाठी आणि स्वत:च्या आत डोकावून पाहण्यासाठी पाँडीतील पर्यटन हा उत्तम पर्याय आहे. पाँडेचेरीला जाण्यासाठी चेन्नईचा विमानतळ सोयीचा आहे. तिथून अडीच-तीन तासांत पाँडीला पोहचता येते. तिथे होमस्टे आणि हॉटेलांचे अनेक पर्याय आहेत.

चेन्नईहून जाताना किंवा येताना वाटेत महाबलीपुरमला थांबायला विसरू नका. पाँडेचेरीचा लिखित इतिहास जरी फ्रेंच राजवटीपासून सुरू होत असला तरी त्या आधीपासून या सगळ्या प्रदेशावर पल्लव, चौल या राजघराण्यांनी आपली सत्ता गाजवली होती. ७ व्या शतकातील पल्लव राजघराण्यातील सम्राट नरसिंहवर्मन याने वसवलेले नगर म्हणजे मम्मलापूरम. या राजाला महामल्ल असेही नाव होते, त्यावरूनच या नगराला नाव मिळाले. आज महाबलीपूरम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाकडे पर्यटक आकर्षित होतात ते इथल्या अप्रतिम शिल्पांनी नटलेल्या मंदिरांमुळे आणि खडकात खोदलेल्या भव्य शिल्पांमुळे. या शिल्पांमधील सर्वात भव्य आहे ‘अर्जुनाची तपश्चर्या’ नावाने ओळखले जाणारे शिल्प. रॉक रिलिफ प्रकारातले हे शिल्प ९६,७४३ फूट इतके मोठे आहे. दोन शिलाखंडामध्ये मिळून गंगावतरण आणि अर्जुनाची तपश्चर्या असे दोन प्रसंग दाखवले आहेत. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच्यावरील विजय साजरा करण्यासाठी पल्लव सम्राट नरसिंहवर्मन याने हे शिल्प घडवल्याचे सांगितले जाते.

इथला ‘पाच रथ’ हा शिल्पसमूहही पाहण्यासारखा आहे. पाच पांडवांचे हे रथ आहेत असे मानले जाते. निर्मितीच्या काळात म्हणजे ७ व्या शतकातच या रथांचे काम अर्धवट सोडण्यात आले असले तरी त्यावरील कोरीव काम मोहक आहे. महाबलीपुरम हे गावच बंगालच्या उपसागराच्या काठावर वसलेले आहे, पण त्यातही ‘शोअर टेम्पल’ नावाने ओळखले जाणारे मंदिर अगदी समुद्र किनाऱ्याला लागून आहे. मार्को पोलोने त्याच्या प्रवासवर्णनामध्ये भारताच्या किनाऱ्यावरील ज्या ‘सात पॅगोडां’चा उल्लेख केला आहे, ती सगळी मंदिरे याच किनाऱ्यावर असावीत आणि त्यातले हे एकच शिल्लक राहिले असावे असे मानले जाते.

या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे तर मधल्या गाभाऱ्यात विष्णूची मूर्ती आहे. मंदिराच्या आवारातील सिंहाचे शिल्प लक्ष वेधक आहे. या सिंहावर दुर्गा आरूढ झालेली दाखवली आहे. महाबलीपुरमची मंदिरे आता युनेस्कोच्या विश्ववारसा यादीत समाविष्ट झालेली आहेत. हजारो वर्षांपूर्वीचा हा कलाकौशल्याचा नमुना थक्क करणारा आहे.

makarandvj@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 1:59 am

Web Title: the confluence of spirituality and art akp 94
Next Stories
1 झँडर मासा
2 विना साखरेची बर्फी
3 वेलभाज्यांची लागवड
Just Now!
X