नाटय़गृहात नाटकाचा प्रयोग सुरू असताना खणखणारे मोबाइल फोन हा गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय ठरला आहे. प्रेक्षकांच्या या अनास्थेबद्दल एकीकडे कलाकारवर्गातून संताप व्यक्त होत असताना, मुंबई महापालिकेने सर्व नाटय़गृहांमध्ये मोबाइल जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मोबाइल वापराचे शिष्टाचार केवळ नाटय़गृहांतच नव्हे तर, सर्वत्रच पायदळी तुडवले जात आहेत. काय आहेत हे शिष्टाचार?

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
article about society s attitude towards sports careers
चौकट मोडताना : सहज स्वीकार नाहीच
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे

एखाद्या समाजात राहायचे म्हटले तर अर्निबध किंवा मनमानी पद्धतीने वागून चालत नाही. सारेच जण मन मानेल त्या पद्धतीने वागू लागले की समाजात अराजक निर्माण होण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वागण्याची, बोलण्याची एक आदर्श चौकट आखून देण्यात आली आहे. त्या चौकटीत राहणे किंवा वागणे यालाच शिष्टाचार म्हणतात. दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही सार्वजनिक ठिकाणी अशा शिष्टाचारांचे सर्रास उल्लंघन होते. रेल्वेस्थानकाच्या फलाटावर किंवा गाडीतून प्रवास करताना मित्रमंडळींशी मोठय़ा आवाजात गप्पा मारताना त्याचा त्रास आजूबाजूला असलेल्या लोकांना होत असतो, याचा विचारही आपल्या मनात येत नाही. सिनेमागृहात चित्रपट सुरू असताना गप्पा मारत बसलेले अनेक महाभाग असतात. ही मंडळी शिष्टाचार वगैरे गोष्टी सरळ धाब्यावर बसवत असतात. शिष्टाचाराच्या ऐशीतैशीचा असाच एक मुद्दा काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तो म्हणजे नाटय़गृहात खणखणाऱ्या मोबाइल फोनचा.

खरंतर गेल्या काही वर्षांत याचा त्रास वाढल्याने नाटय़गृहांत प्रयोग सुरू करण्यापूर्वीच प्रेक्षकांना मोबाइल बंद करण्याची वा ‘सायलेंट मोड’वर ठेवण्याची विनंती करण्यात येते. मात्र त्यानंतरही प्रयोग सुरू असताना मोबाइल फोन वाजणे, तो उचलणे आणि मोठय़ा आवाजात संभाषण करणे असे प्रकार सुरूच असतात. यामुळे रंगमंचावर भूमिका सादर करत असलेल्या कलाकारांच्या एकाग्रतेत व्यत्यय होतो. याबद्दल अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या माध्यमांतून आपली नाराजी उघड केली. मध्यंतरी अभिनेता सुबोध भावे यांनी तर मुंबईतील एका नाटय़गृहाच्या प्रवेशद्वारावर उभे राहून जातीने सर्व प्रेक्षकांचे मोबाइल बंद आहेत का, याची तपासणी केली. तर मुंबई महापालिकेने अगदी दोन-तीन दिवसांपूर्वीच नाटय़गृहांमध्ये मोबाइल जॅमर बसवण्याचा निर्णय घेतला. नाटय़गृहात मोबाइल जॅमर बसवल्याने कुणाचाही मोबाइल वाजणार नाही, याची काळजी महापालिकेने घेतली आहे. मात्र अशा प्रकरणांतून एक गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित होते, ती म्हणजे, मोबाइलच्या वापराबाबतचे शिष्टाचार.

मोबाइल हा वैयक्तिक मालकीचा असल्याने तो कसा व कधी वापरावा, याचे काही नियम नाहीत. मात्र ज्याप्रमाणे समाजात वावरताना आपण काही सामाजिक भान ठेवून वागत असतो, त्याचप्रमाणे मोबाइल वापरतानाही थोडेसे भान ठेवणे आवश्यक आहे. हे भान अनेक जणांना येत नसल्यामुळे मग मोबाइल वापरास मज्जाव करणाऱ्या सूचना द्याव्या लागतात. मात्र असे काही करायची वेळ येण्यापूर्वी आपणच मोबाइल वापराचे काही शिष्टाचार पाळले तर चारचौघांत आपली प्रतिमा अधिक उठून दिसेल. त्यामुळेच घर, कार्यालय किंवा अन्य ठिकाणी मोबाइल वापरताना काय काळजी घ्यावी, याच्या काही टिप्स.

अन्य ठिकाणी..

  • घरात किंवा अन्य कुठेही जेवत असताना मोबाइल हाताळण्याची सवय वाईट. ही कृती हमखास टाळा.
  • वाहन चालवताना फोनवर बोलणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे एकतर वाहन एका बाजूला उभे करून संभाषण करा किंवा फोन कट करा.
  • सिनेमागृहे, देवस्थाने, नाटय़गृहे, खासगी बैठका अशा ठिकाणी मोबाइल सायलेंट मोडवर असलेलाच बरा.
  • प्रवासादरम्यान संगीत ऐकणे चांगले. मात्र मोबाइलच्या स्पीकरवर गाणी लावून इतरांना त्रास देण्याऐवजी हेडफोनचा वापर करा.

सार्वजनिक ठिकाणी मोबाइल फोनवर संभाषण करताना इतर व्यक्तींपासून आपण किमान तीन मीटर अंतरावर राहू, याची काळजी घ्या. ज्या ठिकाणी इतके अंतर ठेवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संभाषण मोजके असावे. यामुळे इतरांना तुमच्या संभाषणाचा त्रास होणार नाहीच पण त्यासोबतच तुमचा खासगीपणाही अबाधित राहील.

कार्यालयात..

  • तुमचा मोबाइल नेहमी ‘सायलेंट’ किंवा ‘व्हायब्रेट’ मोडवर ठेवा. मोबाइलची मोठय़ा आवाजाची रिंगटोन तुमच्या सहकाऱ्यांच्या कामात व्यत्यय आणू शकते.
  • तुमच्या मोबाइलमधील नंबर कार्यालयाकडून देण्यात आला असेल तर त्याचा वापर कार्यालयीन कामांसाठीच करा. हा मोबाइल क्रमांक मित्र किंवा नातेवाईकांशी शेअर करू नका. त्यासाठी दुसरा मोबाइल क्रमांक वापरायला हरकत नाही.
  • कार्यालयातून दिलेल्या मोबाइल फोनची कॉलर रिंगटोन म्हणून गाणी किंवा डायलॉग ठेवू नका. तुम्हाला कार्यालयीन कामासाठी फोन करणाऱ्यांच्या मनात त्यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते.
  • मोबाइलवर बोलताना मोठय़ाने बोलू नका. संभाषणादरम्यान आपला स्वर मृदू आणि नम्र राहील, यावर भर द्या. संभाषणादरम्यान शिवीगाळ किंवा असभ्य भाषेचा वापर टाळा.

कुठेही जात असाल तर आपला मोबाइल डेस्कवर ठेवून जाऊ नका. अशा वेळी मोबाइलची रिंग मोठय़ाने वाजल्यास इतरांना त्रास होऊ शकतो. मोबाइलवर संभाषण करताना स्पष्ट भाषेत संवाद साधा. काही तरी खात असताना फोनवर बोलणे टाळा. कार्यालयात एखादी बैठक सुरू असेल किंवा कुणी बोलत असेल तर त्या वेळी मोबाइल कॉल घेणे टाळा. कार्यालयीन कामकाजासाठी वेळीअवेळी मोबाइल करू नका. कार्यालयीन वेळेच्या अवधीतच अशाप्रकारचे संभाषण करणे उत्तम.