घरातील सर्वात महत्त्वाची पण लहान आकाराची वस्तू म्हणजे चावी. एक चावी असो वा चाव्यांचा जुडगा असो, व्यवस्थित जागेवर ठेवलेला नसेल तर शोधाशोध नशिबी आलीच. त्यामुळेच चावी अडकवण्यासाठी ‘की होल्डर’ घरात असणे महत्त्वाचे आहे. मात्र, साधासुधा किंवा केवळ चावी अडकवण्यापुरती फळी असून उपयोग नाही. ‘की होल्डर’मुळे घरातल्या भिंतीची शोभा जाता कामा नये. अशा प्रकारे शोभा वाढवणारे असंख्य ‘की होल्डर’ तुम्हाला मिळतील; पण घरातल्या घरात पटकन एखादा की होल्डर बनवायचा असेल आणि पैसे वाचवायचे असतील तर हा पर्याय.

साहित्य

छायाचित्राची जुनी लाकडी चौकट (फ्रेम). साधारण ५ बाय ७ इंच आकाराची ‘फ्रेम’ योग्य.

आकर्षक रंग आणि ब्रश.

तीन ते पाच स्क्रू हूक.

कृती

छायाचित्राची जुनी चौकट घरात अडगळीत पडलेली असतेच. यातलीच साधारण पाच बाय सात इंच आकाराची एखादी फ्रेम घेऊन ती घासून स्वच्छ करा. त्याच्या मागचा पुठ्ठा किंवा पुढची काच काढा.

त्यावर तुमच्या भिंतीवरील रंगापेक्षा ठळकपणे उठून दिसेल असा रंग चढवा. या फ्रेमच्या वरच्या पट्टीच्या आतल्या कडेला स्क्रू हूक फिरवून घट्ट बसला. जुन्या पातळ पट्टीत घडवलेल्या फ्रेममध्ये हे स्क्रू सहज हाताने फिरवूनही बसवता येतील. मात्र, चौकट जाड लाकडाची असेल तर तुम्हाला थोडी मेहनत घेऊन त्यात ‘ड्रिलिंग’ करावं लागेल.

अशाच प्रकारे फ्रेमच्या खालच्या पट्टीच्या बाहेरच्या कडेलाही तुम्ही स्क्रू बसवू शकता. आता ही फ्रेम भिंतीवर अडकवून त्यात चाव्या ठेवणे सोपे आहे. हा ‘की होल्डर’ अधिक आकर्षक करायचा असेल तर फ्रेमच्या मागच्या बाजूला असलेल्या जाड लाकडी पुठ्ठय़ावर तुम्ही आकर्षक चित्रही चिकटवू शकता किंवा स्वत: एखादे चित्र रेखाटूही शकता.