आत्माराम परब

लडाख म्हटलं, की गगनाला भिडलेल्या राकट पर्वतरांगा, लांबलचक निर्मनुष्य रस्ते, निळेशार सरोवर आणि तुरळक झाडं असं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. हा परिसर आता पर्यटकप्रिय झाला असला, तरी जुलै ते सप्टेंबर एवढाच काय तो इथला सिझन. पण लडाखमधला हिवाळा कसा असतो, तेव्हा हा प्रदेश कसा दिसतो, याची आपल्याला फारशी कल्पना नसते. पण लडाखच्या थंडीची गोष्टच वेगळी आहे..

नोव्हेंबर ते मे दरम्यान जम्मू आणि मनालीहून लडाखकडे जाणारे रस्ते बर्फाच्छादीत असतात. पण विमानसेवा सुरू असते. पर्यटन मंदावलेले असते. स्थानिक लडाखींचाच वावर असतो. या काळात लडाखमध्ये भटकण्यात एक वेगळाच आनंद असतो. या काळात तिथे खेळला जाणारा आइस हॉकी, त्याच्या टूर्नामेन्ट्स, प्रचंड गारठय़ात तगून राहण्यासाठी लडाखींकडून केले जाणारे उपाय हे अनुभवण्यासारखं असतं. सिंधू आणि झंस्कार नद्याच नाही तर अख्खं पँगाँग लेक गोठलेलं असतं. नोव्हेंबर ते मार्च या काळात हे सारं अनुभवावं.

या काळात काही तुरळक हॉटेल्स वगळता, अन्य सर्व हॉटेल्स बंद असतात. स्थानिकांचे होमस्टे सुरू असतात. स्थानिकांच्या घरात मस्तपैकी बुखारी (घर गरम करणारी मध्यवर्ती शेगडी) असतेच. त्याची मजा वेगळीच आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात शाळा-महाविद्यालये पूर्ण बंद असतात. जणू काही सारं जगणंच गोठून गेलंय असं वाटू लागतं. पण याच वेळी-नोव्हेंबर ते मार्च दरम्यान इथल्या मोनेस्ट्रीजमध्ये बौद्ध धर्माचे अनेक उत्सव साजरे केले जातात. हे उत्सवच बहुधा लडाखी लोकांना अशा प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचं बळ देतात.

या वातावरणात आणखी एक चांगली संधी दडलेली असते ती म्हणजे छायाचित्रणाची. जणूकाही काळही थांबलेला आहे अशी परिस्थिती, कॅमेऱ्यात टिपायची असेल तर लडाखला नक्कीच भेट द्यावी. ३६० अंशात असा नजारा असतो की अवाक व्हायला होते.

पँगाँग लेकला भेट दिल्याशिवाय ही सफर पूर्ण होत नाही. लेकला जाताना लागणारा छांगला पास ही हटकून थांबण्यासारखी जागा आहे. पाढऱ्या चादरीवरच्या रंगीत देवळाचं दर्शन घेतल्यावर आपण पुढे जातो तेव्हा कधी एकदा पँगाँग लेक पाहातोय, असं होऊन जातं. एरव्ही साधारण तीन किलोमीटरवर असतानाच पँगाँगचं दर्शन होतं, पण हिवाळ्यात गोठलेला हा तलाव आजूबाजूच्या बर्फात मिसळून जातो आणि अगदी जवळ जाईपर्यंत त्याच्या भव्यतेची कल्पना येत नाही. एकदा का आपण पँगाँग लेकजवळ पोहोचलो की खरंच स्तिमित व्हायला होतं. १४७ किलोमीटर पसरलेल्या या खाऱ्या पाण्याच्या तलावाचा दोनतृतीयांश भाग चीनमध्ये आहे. गोठलेला तलाव मन मोहून टाकतो. एवढय़ा उंचीवरही समोरचे डोंगर रंगांचे विभ्रम दाखवत असतात. सर्वत्र पसरलेलं बर्फ, धवल शिखरं आणि गोठलेला तलाव, पांढऱ्या रंगाच्या विविध छटा एकमेकांत मिसळलेल्या असतात. दूरवर तलावाच्या पलीकडे सूर्य किरणांचा झोत पडलेला असेल तर तो तेवढाच भाग सोनेरी दिसतो.

या मोसमात चार भिंतींआडची दुनिया थंडीशी सामना करायला सज्ज असते. लडाखींचं आदरातिथ्य वाखाणण्याजोगं असतं. नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या वातावरणात आलेल्या पर्यटकांना काही कमी पडू दिलं जात नाही.

चादर ट्रेक

गोठलेल्या झंस्कार नदीवरचा चादर ट्रेक हा या सफरीतला परमोच्च बिंदू असतो. याच काळात झंस्कार व्हॅलीतून उदरनिर्वाहाच्या उद्देशाने हिवाळ्यात गावातले लोक याच प्रवाहावरून चालत लेहला येतात. हौशी पर्यटकही या अद्भुत ट्रेकचा आनंद घेऊ लागले आहेत. नदी प्रवाहावर चालणं, त्यावर तंबू ठोकून राहणं हा प्रकार आयुष्यात एकदा तरी करण्यासारखा आहेच आहे. वर काही फूट गोठलेला बर्फ आणि त्या खालून खळाळत जाणाऱ्या प्रवाहाचा आवाज कान लावून ऐकण्यात जी मजा, जो थरार आहे तो क्वचितच एखाद्या गोष्टीत जाणवेल. चादर ट्रेक हा तसा साहसी खेळातला प्रकार आहे. त्यासाठी नावनोंदणी, परवानगी बंधनकारक आहे.

आइस हॉकी

झंस्कार आणि सिंधू नद्याही गोठलेल्या असतात. या नद्यांवर आइस हॉकीच्या दर्दी खेळाडूंचा पदन्यास सुरू असतो. गेल्या काही वर्षांत कॅनडासारख्या देशातून आलेले खेळाडू तिथे या खेळाची मजा लुटताना दिसू लागले आहेत. ते स्थानिक खेळाडूंनाही प्रशिक्षण देतात. पांढऱ्या चादरीवर रंगीबेरंगी कपडे परिधान करून लिलया वावरणारे हे खेळाडू पाहणे आनंदाचा भाग ठरतो. हल्ली तर येथील प्रशिक्षित खेळाडूंची टीम आइस हॉकीच्या जागतिक करंडकावर आपले नाव कोरत असते.

atmparab2004@yahoo.com