|| व्हिंटेज वॉर : वैभव भाकरे

नासाची १९५९ सालची चंद्रवारी यशस्वी झाल्यांनतर अत्याधुनिक भविष्याचे वेध मानवाला लागले. या भविष्यातील तंत्रज्ञानाच्या कल्पना इतक्या अचाट होत्या की, २१व्या शतकाच्या सुरुवातीला हवेत उडणाऱ्या मोटारी हे वाहतुकीचे सामान्य माध्यम असेल, २०३० पर्यंत माणूस भूतकाळ आणि भविष्यकाळात कालयात्रा देखील करू शकेल, फ्रिज, वॉशिंग मशीन घ्याव्या तसे लोक घरकामासाठी यंत्रमानव घेतील, असे कल्पनारंजन होऊ  लागले. पुढे या कल्पनांचा वापर केवळ ‘पल्प’ कथा आणि ‘साय-फाय’  चित्रपटनिर्मितीसाठी झाला. आकाशात उडणारी गाडी तयार करण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण अशी गाडी कधी उत्पादनात आली नाही. मात्र पाण्यात आणि जमिनीवर चालणाऱ्या उभयचर मोटारींची निर्मिती मात्र यशस्वी झाली. चांगली कार किंवा चांगली बोट यापैकी काहीच होता न आल्याने या गाडीचे मोटार बाजारातील स्थान कायम तरंगतेच राहिले.

अँफिकार मॉडेल ७७० ही एक उभयचर मोटार आहे. १९६१ साली न्यूयॉर्क ऑटो शोमध्ये ही मोटार सर्वप्रथम दाखवण्यात आली. पश्चिम जर्मनीमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या या गाडीची निर्मिती १९६१ ते १९६८ दरम्यान करण्यात आली. हान्स ट्रिप्पेल यांनी ही उभयचर मोटार डिजाइन केली होती. क्वाण्डत ग्रुप लुबेक येथे या गाडीची निर्मिती झाली. एकूण ३,८७८ गाडय़ांची निर्मिती करण्यात आली होती.

फॉक्सवॅगनच्या स्विमवॅगन या गाडीवर अँफिकार आधारित होती. अँफिबिअस आणि कार हे दोन शब्द एकत्र करून अँफिकार हे नाव गाडीला देण्यात आले.

१९६०च्या दरम्यान जवळपास ३००० लोकांनी ही पाणी आणि जमिनीवर चालणारी गाडी विकत घेतली होती. आजकालच्या आधुनिक एसयूव्हीदेखील करू शकत नाही अशी करामत ही गाडी करून दाखवत होती. अँफिकार ७७०ची बॉडी स्टीलची होती, त्याचे छत फोल्ड करता येण्यासारखे होते.  पाण्यात गाडीला पुढे ढकलण्यासाठी बम्परच्या खाली दोन प्रोपेलर देण्यात आले होते. गाडीचा पाण्यातील वेग हा ७ मैल प्रतितास होता तर जमिनीवर सर्वाधिक वेग हा ७० मैल प्रतितास होता म्हणून या गाडीला ७७० असे नाव देण्यात आले होते.

या गाडीचे इंजिन हे मागच्या बाजूला लावण्यात आले होते. गाडीत ४ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले होते. पाण्यात वापरण्यासाठी याच इंजिनमधून प्रोपेलर्सला ताकद मिळत असे. अँफिकारमध्ये ब्रिटिश ट्रायम्फ हेराल्ड १२००चे ११४७ सीसीचे इंजिन देण्यात आले होते. या पाण्यात आणि जमिनीवर व्यवस्थितरीत्या प्रवास करण्यासाठी कोणत्या प्रकारचे इंजिन योग्य ठरेल यासाठी विविध इंजिनच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. अँफिकारच्या इंजिनमधून ४३ बीएचपीची ऊर्जा  निर्माण केली जात होती. नंतरच्या आवृत्त्यांमध्ये मोटारीची इंजिन क्षमता वाढवून १२९६ सीसी आणि १४९३ सीसी करण्यात आली होती.

ही एक चांगली मोटार नाही, ही एक चांगली बोटही नाही, पण ही ठीकठाक काम करते, अशी प्रतिक्रिया या मोटारीच्या मालकांची होती. पाण्यात आणि जमिनीवर देखील स्टेअरिंगचा वापर करून गाडी वळवता येत होती. पाण्यात वळताना ही गाडी पुढच्या चाकांचा वापर करायची म्हणून इतर बोटींच्या तुलनेत या गाडीला हाताळणे थोडे कठीण होत असे. अँफिकार तासन्तास काठावर पाण्यात पार्क केली तरी पाणी गाडीत शिरत नसे ही या गाडीची सर्वात मोठी जमेची बाजू होती.

१९६५ मध्ये दोन अँफिकारनी अलास्कातील योकॉन नदी पार केली होती. सप्टेंबर १९६५ मध्ये दोन अँफिकारने ब्रिटिश खाडी यशस्वीरीत्या पार केली. अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन हेदेखील अँफिकारचे मालक होते. त्यांच्या टेक्सास येथील रँचला भेट देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना घाबरवण्यासाठी ते या गाडीचा वापर करीत. गाडीच्या ब्रेकमध्ये बिघाड झाला अशी बतावणी करून ते खोटेखोटे आरडाओरडा करीत आणि गाडी टेकडीवरून थेट तलावात उतरवीत.

बहुतांश अँफिकारची विक्री ही अमेरिकेत झाली. ब्रिटनमध्ये या मोटारीची विक्री १९६४ पासून सुरू झाली. बर्लिन पोलिसांकडून काही मोटारींचा वापर करण्यात आला, तर काही मोटारी बचाव कामासाठी वापरल्या जात होत्या. पाण्यात आणि रस्त्यावर प्रवास जातात यावा यासाठी अँफिकार हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. इंजिनीअरिंगच्या मर्यादांमुळे ही गाडी ग्राहकांच्या मनात छाप पडू शकली नसली तरी आजही ही गाडी लोकांच्या कुतूहलास पात्र आहे.